घडलेला सारा प्रसंग नक्कीच वेदनादायी होता. मात्र, काळ सर्व वेळ जुळून कशी आली ? याचं कोडं कधीही सुटणारं नाही. कदाचित यालाच ‘ नशीब ’ असं म्हणत असावेत. हा सारा नियतीचा खेळ असतो, यातील आपली भूमिका ही पुढे मागे हलवल्या जाणाऱ्या सोंगट्यांसारखीच असते.
जे.डी. पराडकर 9890086086
विवाहाला खूप वर्षे झाल्यानंतर देखील मूल होत नसल्याने कुंदा, घरातून मारल्या जाणाऱ्या सततच्या टोमण्यांना कंटाळली होती. ज्यांनी ज्यांनी जे जे उपाय सुचवले, ते सर्व उपाय कुंदाने करण्यात कोणतीही कुचराई केली नव्हती. अखेरीस नशिबापुढे तिने हात टेकले. घरातील स्त्रीला सर्वच कामे पहावी लागतात. यासाठी अविरत कष्ट देखील घ्यावे लागतात. या सर्व आघाड्यांवर लढत असताना कुंदाला स्वतःच मूल नसल्याने घरातून आणि आजूबाजूच्या पोक्त महिलांकडून ऐकावे लागणारे टोमणे तिला असह्य झाले होते. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर रात्री उशिरा अंथरुणाला पाठ टेकल्यानंतर, तिच्या संसारात असणाऱ्या या पोकळीमुळे तिचे डोळे नेहमी भरून येत. डोळ्यातून सुरू झालेले अश्रू मग कुंदाला थेट तिच्या बालपणाकडे घेऊन जात. माहेरी आपल्या बालपणात केलेल्या सगळ्या बाळलीला तिला आठवू लागत. काही वेळात तर संपूर्ण रात्र तिचा डोळ्याला डोळा लागत नसे. अश्रू ढाळून हा प्रश्न सुटणारा नव्हता. कुंदा घरात एकाकी पडली होती. आजूबाजूला खेळणारी लहान मुले पाहिल्यानंतर यातील एखादं मुल उचलावं आणि ते आपल्या हृदयाला घट्ट बिलगावं , असं कुंदाला सारखं वाटे. आपल्याला मूल व्हावं अशी कुंदाची जबरदस्त इच्छा होती. मात्र केवळ इच्छाशक्तीमुळे कुंदाच नशीब पालटणार नव्हतं. अखेरीस कुंदाने उपास तापास करत असताना पारायणं देखील सुरु केली. जवळच राहणाऱ्या आणि कुंदा बद्दल सहानुभूती असणाऱ्या कविता नावाच्या एका सुशिक्षित महिलेने कुंदाला एका स्त्री रोग तज्ञाकडे तपासणीला नेले. नामस्मरण, उपास, पारायणं आणि वैद्यकीय उपचार हे सारं एकाच वेळी सुरु होतं. एका रात्री पहाटेच्या सुमारास कुंदाच्या स्वप्नात घराच्या अंगणात दुडदुड धावणारं एक मूल दिसलं आणि ती अत्यानंदाने स्वप्नातून जागी झाली. क्षणाचाही विलंब न लावता ती उठली, तीने तोंडावर पाणी मारलं आणि परमेश्वरापुढे जावून मनोभावे हात जोडूत “ हे स्वप्न खरं व्हावं ” अशी प्रार्थना केली.
आजूबाजूला रहाणाऱ्या काही स्त्रीयांना कुंदा बद्दल सहानुभूती वाटे. कुंदाचा पती कुंदन मात्र कधीही याबाबत तिला दोष देत नसे. कदाचित त्याला आपल्यातील काही उणीवांची बहुधा कल्पना असावी. मात्र घरातील अन्य महिला अथवा सदस्यांनी कुंदाला दोष देवू नये असं सांगण्याची हिंमत त्याच्याकडे नव्हती. कुंदनची नोकरी साधारण असल्याने घरातील उत्पन्नाचे स्रोत देखील मर्यादित होते. असं असलं तरी कुंदा मात्र छोटी मोठी कामं करुन संसाराला हाताभार लावत असे. दहावी नंतर अनेक अडचणीमुळे शिक्षणाची वाट बिकट झालेल्या कुंदाला तिच्या आईने शिवणकाम शिकवण्याचा निर्णय घेतला. शाळेत असल्यापासून कुंदा आईला काज बटण करायला, शिलाई उसवून द्यायला, हातशीलाई करुन द्यायला मदत करत असे. शिवणकामाची कला शिकलं तर, ती वाया जाणार नाही याची कुंदाच्या आईला जाणीव होती. बालपणी शिकलेल्या शिवण कलेमुळे कुंदा, नवऱ्याच्या संसाराला हातभार लावू शकत होती. दुपारची सर्व कामं आवरली की. कुंदाच्या शिलाई मशीनचे चक्र फिरु लागे. या चक्रा बरोबरच कुंदाचे विचार चक्र देखील वेग घेई. दररोज ठराविक शिवणकाम हातावेगळं करायचंच असा कुंदाचा नेम असे. शिवण नेण्यासाठी येणाऱ्या महिलांना कधीही काम अपूर्ण आहे असे सांगून कुंदाने परत पाठवलेलं नाही. कुंदाचे शिवणकाम सर्वांच्या पसंतीस उतरलं असल्याने तिच्याकडे कामही चांगलं येत असे. घरातील काम, बाजाररहाट, पाणी भरणं, शिवणकाम, दोन वेळचा स्वयंपाक अशा सर्वच आघाड्यांवर कुंदा मोठया जिद्दीने लढत होती. एवढे कष्ट करुनही माहेरी झालेल्या उत्तम संस्कारामुळे ती कधीही कष्टी होत नसे, ही तिची मोठी जमेची बाजू होती.
शिलाई मशीन चालवून कुंदाचा उजवा पाय काही वेळा खूप दुखायचा, पण या वेदना सांगणार कोणाला ? असा प्रश्न तिला पडे. संसाराचं चक्र चालवायला शिलाई मशीनचं चक्र तिला फिरवावंच लागणार होतं. तिच्या दुखऱ्या पायावर आपला हात अलगद फिरवायला तिचं हक्काचं असं कोणी नव्हतं. नाही म्हणायला कविता, हिच कुंदाच्या हक्काची आणि जवळची अशी सखी होती. कुंदाला मूल व्हावं आणि तिच्या घरी गोकुळ नांदावं यासाठी कविताची खूप मोठी धडपड सुरु होती. स्त्री रोग तज्ञाकडे, कुंदावर सुरु असणाऱ्या उपचारांचा उपयोग व्हावा यासाठी कविताचे प्रामाणिक प्रयत्न सुरु होते. कविता देखील यावरील सर्व औषधं वेळेवर आणि आठवणीने घेत होती. आपल्या आयुष्यरुपी वेलीवर लवकरच एखादी कळी उमालावी याची कुंदाला आस लागली होती. कुंदा मनाने हळवी, स्वभावाने सालस आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी सतत पुढे असे. कुंदाच्या चेहऱ्यावर कायम एक हास्य असायाचं. मात्र या हास्याला दुःखाची एक छोटी लकेरही होती . कुंदा रंगाने उजळ आणि उंचीने मध्यम बांध्याची, मोजकंच आणि मार्मिक बोलणारी, कुटुंबात संवाद घडत राहावा या मताची एक प्रेमळ स्त्री होती. दिवसभर शिवण काम करुन सायंकाळी, कुंदा सोबत कविताला घेऊन देवदर्शनाला जावून आली. मंदिरात जाऊन आल्यानंतर कुंदाचं मन आज अधिकच प्रसन्न झाल्यासारखं तिला वाटत होतं. कुंदा सकारात्मक विचारांची असल्याने ती कधी कोणत्याही प्रसंगात नाराज होत नसे. कुंदावर बालपणी झालेले संस्कार प्रत्येक वेळी तिला योग्य दिशा देत होते. सकारात्मक ऊर्जेमुळे कुंदाचे मन आज प्रसन्न होते. तिच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद पहायला मिळत होता. दिवसभारतील कामाच्या व्यापात रात्री कुंदाचा कधी डोळा लागला हे तिलाही कळलं नाही.
सकाळ झाली आणि कुंदा झोपेतून जागी होताच तिला आपलं डोकं जड झालंय असं वाटू लागलं. ती उठून उभी राहिली, तर तिचा तोल जावू लागला. भिंतीला धरून धरून तिने चार-पाच पावले टाकली खरे, तेवढ्यातच तिला उलटी होतेय असे वाटू लागले. तिचं संपूर्ण शरीर आतून तळवटल्यासारखं होत होतं. कशीबशी ती न्हाणीघरात गेली आणि एकापाठोपाठ एक तिला कोरड्या उलट्या होऊ लागल्या. आज अचानक सकाळीच अशी आपली तब्येत का खालावली ? या विचाराने कुंदा अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यासमोर सकाळपासून सुरू होणाऱ्या कामांची यादी दिसत होती. अखेरीस काही वेळ आराम करावा आणि नंतरच कामाला लागावे, या हेतूने तिने परत एकदा जमनीला पाठ लावली. आडवं झाल्यानंतरही तिला सारं आपल्या भोवतीच फिरत आहे असं वाटू लागलं. अखेरीस डोळे बंद करून ती काही वेळ शांत राहिली. आज कविता बरोबर डॉक्टरांकडे जाऊन येणे आवश्यक आहे, याची कुंदाला जाणीव झाली. सकाळची सर्व आन्हीके आणि काही प्रमाणात कामे आटोपून कुंदा डॉक्टरांकडे जायला तयार झाली. आपली प्रकृती बरी नसल्याने आज कविता बरोबर आपण डॉक्टरांकडे जात असल्याचे कुंदाने आपल्या पतीच्या कानावर घातले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर घरी परतताना आणावयाच्या चार-पाच वस्तूंची तिने यादी तयार करून घेतली. पतीने कुंदाच्या हातात काही पैसे दिले. परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन कुंदा घरातून बाहेर पडली. कविताच्या घरासमोर येतात ती कुंदाची वाट पाहतच उभी होती. दोघीही लगबगीने डॉक्टरांकडे जायला घराजवळून मुख्य रस्त्याला वळताच एका ओळखीच्या रिक्षावाल्याने त्यांच्यासाठी आपली रिक्षा थांबवली. आपणही त्याच मार्गाने जात आहोत,वाटेत दोघांना दवाखान्याजवळ सोडतो, असे रिक्षावाल्याने कविताला सांगितले.
हॉस्पिटल जवळ रिक्षा थांबताच दोघीही वेगाने पावले टाकत हॉस्पिटलच्या काउंटर जवळ पोहोचल्या. कुंदाने आपली फाईल काढून काउंटर वर ठेवली. फाईल मध्ये काही जुजबी नोंदी करून , तपासणीचा तुमचा सातवा नंबर आहे, असे तिला सांगण्यात आले. कविता सोबत कुंदा डॉक्टरांच्या केबिन बाहेर असणाऱ्या बाकड्यावर विराजमान झाली. कुंदाच्या कानावर हॉस्पिटलमध्ये रडणाऱ्या काही बाळांचा आवाज येत होता. या आवाजाने कुंदा मधील मातृत्व जागृत होत होते. नंबर येईल त्याप्रमाणे एक एक महिला डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून बाहेर येत होती. अखेरीस कुंदाचा नंबर आला आणि कविता बरोबर ती तपासणीसाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. कुंदाचा चेहरा पाहिल्यानंतरच डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. डॉक्टरनी कुंदाची तपासणी केली आणि तिला कविता बरोबर खुर्चीत बसायला सांगितले. डॉक्टर खुर्चीत विराजमान झाले आणि त्यांनी कुंदाकडे पहात ‘ अभिनंदन ! तुम्ही आई होणार आहात ’ असे म्हणताच दोघीही अत्यानंदाने जागेवर उभ्या राहिल्या. हे वाक्य ऐकल्यानंतर कुंदा डॉक्टरना म्हणाली, ‘ आपण खरं सांगताय ना ’? यावर डॉक्टर म्हणाले, यामध्ये खोटं सांगण्यासारखं काही नाही. पुढच्या क्षणी कुंदाचे नेत्र अत्यानंदाने भरून आले. कविताच्या चेहऱ्यावर देखील आनंद आणि हास्य एकाच वेळी दिसून आलं. कविताने एका क्षणात कुंदाचा हात हातात घेतला आणि तिला बहिणीच्या नात्याने एक आश्वासक धीर दिला. कुंदाने स्त्रीरोग तज्ञांकडे घेऊन उपचार घ्यावेत यासाठी कविताने जे प्रयत्न केले, ते आज खऱ्या अर्थाने सफल झाले होते.
ही आनंद वार्ता कधी एकदा घरी जाऊन सांगतेय, असे कुंदाला झालं होते. बाजारातून आणायच्या चार-पाच वस्तू घेऊन कुंदा आणि कविता लगबत पावले टाकीत घराकडे पोहोचण्यापूर्वी मंदिरात गेल्या. कुंदाने अत्यंत मनोभावे परमेश्वराच्या पायावर डोके ठेवून प्रार्थना केली. कुंदाच्या नेत्रातील पाण्याचा अभिषेक परमेश्वराच्या चरणावर कधी झाला ? हे तिला देखील कळले नाही. घरी परतताना कुंदा प्रथम कविताच्या घरी गेली. घरी असणाऱ्या आजीच्या पायावर डोकं ठेवून कुंदाने त्यांचे आशीर्वाद घेतले. कविताने चमचाभर साखर कुंदाच्या हातावर घातली. घरी परतलेल्या कुंदाच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद पसरला आहे, हे पती कुंदनने एका क्षणात ओळखले. पतीला समोर पाहताच कुंदा भरल्या नेत्राने त्याच्या मिठीत सामावली. आपण आई-बाबा होणार आहोत , असे कुंदाने सांगताच ही मिठी अधिक घट्ट झाली. घरातील सर्वांनाच ही आनंदाची बातमी कळली आणि त्या क्षणापासून घरातील वातावरण पूर्णतः बदलून गेले. पूर्वी विविध प्रकारचे टोमणे ऐकायला लागणाऱ्या कुंदाला आता पावलोपावली मायेचे शब्द ऐकू येऊ लागले. बालपणी कुंदाची आई जशी तिची काळजी घेत होती, तशीच काळजी आता तिची सासरची माणसं घेऊ लागली. हे घर गेली अनेक वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहत होते, ती गोष्ट आता लवकरच घडणार होती. या एका गोष्टीमुळे कुंदाला मिळणाऱ्या वागणुकीत कमालीचा बदल झाला. कुंदाला अनेक पौष्टिक पदार्थ दिले जाऊ लागले. घरातील प्रत्येक सदस्याचे कुंदा जवळील वागणे आत्मीयतेचे बनले. घरात अक्षरशः आनंदी आनंद पसरला.
ही आनंदाची बातमी आईला सांगण्यासाठी, दोन दिवस माहेरी जाण्याचा मनोदय,कुंदाने घरी सर्वांसमोर व्यक्त केला. पती कुंदन आता आपल्या पत्नीला एकट्याने कोठे पाठवायला तयार नसल्याने तिच्याबरोबर माहेरी जाण्यासही तो तयार झाला. माहेरी दाखल होताच कुंदा आईच्या आणि बहिणीच्या गळ्यात पडून हुंदके देवू लागली. हुंदके देत असतानाच ती, आपण आई होणार आहोत, असं सांगत होती. ही आनंदाची वार्ता ऐकताच आईची मिठी अधिक घट्ट झाली. आईने देवाजवळ दिवा लावला, कुंदाच्या हातावर चमचाभर साखर घातली. घरातील सारं वातावरण आनंदाने भरून गेलं. कुंदाला मूल व्हावं म्हणून तिच्या आईने देखील उपासतापास आणि देवधर्म केला होता. वैद्यकीय उपचार, परमेश्वरा जवळ केलेली प्रार्थना, पारायणं या सर्वाचाच योग्य तो उपयोग झाला होता. परमेश्वराने कुंदाच्या अंतर्मनातील बाळा विषयीची ओढ ओळखली होती. एक दिवस माहेरी राहून कुंदा पती बरोबर सासरी परतली. अचानक कुंदाच्या मदतीला घरातील अन्य हात येवू लागले. कुंदावर असणारा कामाचा बोजा या एका आनंद वार्तेने आपोआप कमी झाला. या सर्व प्रवासात कुंदा माणसं ओळखायला शिकली होती . कुंदाचा स्वभाव सर्वांजवळ मिळून मिसळून रहाण्याचा असल्याने ती बदललेल्या वातावरणामुळे हूरळून गेली नाही. कुंदाच्या नित्य क्रमात तिने कोणताही बदल केला नाही. देवदर्शन, उपवास अशी तिची ईश्वरसेवा सुरूच होती. गरोदरपणात कुंदाने उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन सुरु केले. चांगलं संगीत ती ऐकू लागली. अधून मधून होणाऱ्या तपासणीत बाळाची उत्तम वाढ होत असल्याचे डॉक्टरांकडून समजत होते.
पाहता पाहता नऊ महिन्यांचा काळ सरकला आणि एक दिवस सकाळीच कुंदाला प्रसूती कळा सुरु झाल्या. पती कुंदनने लगबगीने घरातील अनुभवी महिला आणि शेजारच्या कविताला घेऊन हॉस्पिटल गाठले. काही वेळातच कुंदाची सुखरूप प्रसूती होवून तिला मुलगा झाला. ज्यावेळी मुलाला कुंदाच्या पुढ्यात देण्यात आले, त्यावेळी ती खूप वेळ, एक तर आपल्या मुलाकडे पाहत होती. मुलगा झाल्याच्या वार्तेने सारं कुटुंब आनंदी झालं. कुंदा साठी खटपट करणाऱ्या कविताचे डोळे भरून आले. कुंदाच्या माहेरी देखील ही आनंद वार्ता कळवण्यात आली. नैसर्गिक प्रसुती झाल्याने कुंदाला अल्पावधीतच दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. घरी सर्वांनाच कुणाला पुत्र प्राप्ती झाल्याने आभाळ ठेंगणे झाले होते. बाराव्या दिवशी थाटामाटात बारसं करून मुलाचे नाव ‘ कार्तिक ’ असं ठेवण्यात आलं. बारशाला असंख्य नातेवाईक एकत्र आले होते. लुकलुकत्या डोळ्यांनी कार्तिक देखील हा सारा सोहळा पाहत होता. कार्तिक रडवा नसल्याने अनेकांनी आपल्या मांडीवर घेऊन त्याचे कोडकौतुक केले. कार्तिकचे होणारे कौतुक पाहून कुंदाचा क्षीण कुठल्या कुठे हरवून गेला. काही दिवसातच कुंदा ठणठणीत झाली आणि हळूहळू ती दैनंदिन कामात हातभार लावू लागली. कार्तिकला आंघोळ घालणे, तेल लावणे, मॉलिश करणे अशा विविध कामात कुंदाचा चांगलाच वेळ जात होता. कार्तिककडे सर्वांचेच चांगले लक्ष असल्याने त्याची वाढ उत्तमच होत होती. कार्तिक हा कुंदासह घरातील सर्वांच्याच काळजाचा तुकडा बनला होता. रांगणारा कार्तिक हळूहळू चालू लागला. काळ झरझर सरत असताना कार्तिक अंगणवाडीतून शाळेत दाखल झाला.
शाळेमधील कार्तिकची प्रगती देखील उत्तम असल्याने शिक्षकही त्याचे कौतुक करत. अभ्यासाबरोबरच तो विविध कलांमध्ये देखील प्रवीण होता. कार्तिकचे अक्षर देखील वळणदार होते. घरी आईकडून होणारे उत्तम संस्कार हे कार्तिकच्या यशाचे खरे गमक होते. दहावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून कार्तिकने आपल्यातील हुशारी सिद्ध करून दाखवली. कार्तिकच्या दहावीतील यशाने कुंदा अक्षरशः भारावून गेली. आपल्या मुलाचे किती आणि कसे कौतुक करू, असे तिला झाले. परीक्षेतील उज्वल यशाबद्दल कुंदासह घरातील सर्वांनीच कार्तिकच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याला बक्षीसही दिले. पुढे बारावीपर्यंत विज्ञान शाखेचे शिक्षण घ्यायचे असा निर्णय कार्तिकने घेतला. दहावी उत्तम गुण मिळाले असल्याने कार्तिकला हव्या असणाऱ्या महाविद्यालयात त्याला सहज प्रवेश देखील मिळाला. थोड्याच दिवसात महाविद्यालय सुरू झाले आणि कार्तिक कॉलेज कुमार बनला. माध्यमिक शाळेतून महाविद्यालयात गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडतो. कार्तिकच्या बाबतीत मात्र असं काहीच घडलं नाही. कार्तिकने कधीही कॉलेज चुकवले नाही अथवा लेक्चरही बुडवले नाही. दैनंदिन अभ्यास वेळच्यावेळी करून तो युनिट टेस्ट मध्ये अपेक्षित गुण मिळवत होता. अभ्यासाबरोबरच कार्तिकला निसर्गात फिरायची खूप आवड होती. आईप्रमाणे मनाने हळवा असणारा कार्तिक निसर्गासमवेत खूप काळ रमायचा. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अन्य मुले विविध प्रकारच्या महागड्या वस्तू मिळाव्यात म्हणून पालकांकडे हट्ट करतात. कार्तिकला मात्र अशा कोणत्याही महागड्या वस्तूंची आज नव्हती. आईने केलेल्या संस्कारामुळे त्याला आपल्या परिस्थितीची देखील चांगलीच जाणीव होती.
कार्तिकला फारसे मित्र देखील नव्हते. त्याच्या स्वभावाशी मिळताजुता आणि त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा असणारा ‘ संदेश ’ नावाचा एक त्याचा जवळचा मित्र होता. संदेश अनेकदा कार्तिकच्या घरी देखील येत असे. संदेशकडे स्वतःची दुचाकी असल्याने काही वेळा कार्तिक, आपल्या आईची परवानगी घेऊन संदेश सोबत दुचाकी वरून फेरफटका मारण्यासाठी जायचा . असंच एकदा सुट्टीच्या दिवशी कार्तिकच्या घरापासून ५० किमी अंतरावर असणाऱ्या घाट रस्त्यातून निसर्ग सौंदर्य पहाण्यासाठी जाण्याचे त्या दोघांनी ठरवले. संदेश बरोबर दुचाकीवरून प्रथमच एवढे लांब अंतर जाण्यासाठी कार्तिकने आपल्या आईकडे परवानगी मागितली. आपला मुलगा कधीच कोणता हट्ट करत नाही, मग दुचाकीवरून एवढे लांब अंतर जाण्यासाठी त्याला नको कसे म्हणायचे ? असे कुंदाच्या मनात आले. आईने होकार देताच कार्तिकला आनंद झाला. सुट्टीच्या दिवशी संदेश आणि कार्तिक घाट रस्त्याकडे जाण्यासाठी तयार झाले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी कार्तिकने आपल्या आईला नमस्कार केला. का कोण जाणे, कुंदाचे नेत्र अचानक भरून आले आणि तिने कार्तिकला जवळ ओढून त्याला घट्ट मिठी मारली. बाळांनो सावकाश जा हा……! असं सांगायला ती विसरली नाही. परत यायला रात्र करू नका, अंधार व्हायच्या आत घरी या, असेही कुंदाने या दोघांना सांगितले. संदेशने दुचाकी सुरू केली आणि आईला बाय-बाय करत कार्तिकही त्याच्यामागे गाडीवर बसला. दोघेही निघून गेल्यानंतर खूप वेळ कुंदा या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दरवाज्यात उभं राहून पाहत होती.
नियमित वेगात दुचाकी चालवत दोघांचाही प्रवास सुरू होता. संदेशच्या दुचाकीने गावाची वेस ओलांडली आणि ते हळूहळू घाट रस्त्याकडे जाऊ लागले. काही अंतर गेल्यावर थोडा वेळ थांबून दोघांनी रस्त्यालगत असणाऱ्या एका टपरीवर वडापाव खाल्ला चहा घेतला. परत एकदा नव्या दमाने दोघांचाही दुचाकीवरून प्रवास सुरू झाला. घाटामधील निसर्गाचा अप्रतिम अविष्कार पाहण्यासाठी दोघांचीही मन आसुसली होती. रस्त्याला वाहनांची वर्दळ तुरळकच होती. मजल दरमजल करत दोघेही घाट रस्त्याच्या सुरुवातीला येऊन पोहोचले. सावकाशपणे घाट रस्ता चढून झाल्यानंतर निसर्गाचा अद्भुत नजारा दिसणाऱ्या मुख्य पॉईंटवर दोघेही येऊन थांबले. संदेशने एका बाजूला गाडी लावली आणि तो गाडी जवळच उभा होता. निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहून कार्तिक दरी जवळ असणाऱ्या कठड्याला टेकून निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. घार उडते आकाशी, परि चित्त तिचे पिलांपाशी ! या उक्तीनुसार कार्तिक आणि संदेश घरातून बाहेर पडल्यापासून कुंदाचे मन या दोघांच्यातच गुंतलेले होते. आज तिच्या हातून कोणतेच काम झटपट होत नव्हते. कार्तिकच्या आठवणीने आज तिचे मन सारखं हळवं होत होतं. कार्तिक पासून काही अंतरावरच आपल्या गाडीजवळ संदेश उभा होता. दोघांचेही लक्ष निसर्गाच्या अद्भुत नजाऱ्याकडे होते. याच दरम्यान आकाशातून एक घार तिला मिळालेली सापाची शिकार आपल्या पायात पकडून विहार करत होती . ही घार ज्यावेळी कार्तिकच्या डोक्यावरुन उडत होती त्याचवेळी तिने पायात पकडलेला साप तिच्या पकडीतून निसटला आणि तो थेट कार्तिकच्या खांद्यावर पडला. जखमी झालेल्या जातिवंत सापाने एका क्षणात कार्तिकच्या मानेला कडकडून चावा घेतला. एका क्षणात हे काय आणि कसे घडले ? हे ना कार्तिकला कळले ना संदेशला.
जातिवंत सापाने दंश केल्यानंतर कार्तिक जमिनीवर कोसळला. आता काय करावे, हे संदेशला कळेनासे झाले. कार्तिकच्या जवळ बसून त्याने अक्षरशा टाहो फोडला. घाटमाथ्यावर निसर्गाचे सौंदर्य न्याहाळणारे अन्य प्रवासी ताबडतोब या दोघां जवळ आले. काही वेळातच कार्तिकला होणारी विषबाधा त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली. घाटमाथावरून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्तिकला हलवण्याचा सल्ला उपस्थितांनी दिला. संदेशने आपली गाडी तेथेच ठेवून अन्य माणसांच्या मदतीने एका चार चाकी वाहनातून कार्तिकला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्तिकची तपासणी करताच नकारात्मक मान हलवून त्याचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. हे ऐकून संदेश जागेवरच खाली बसला आणि त्याची शुद्ध हरपली. निसर्ग सौंदर्य न्याहाळणाऱ्या कार्तिकच्या खांद्यावर आपली शिकार घेऊन जाणाऱ्या घारीच्या पकडीतून निसटलेला जातीवंत साप पडतो काय, आणि काही कालावधीतच त्याचा मृत्यू ओढवतो काय, हे सारेच अनाकलनीय होते. नशीब….. नशीब……. म्हणतात ते हेच का ? जन्माप्रसंगी तुमचे नशीब लिहिले जाते आणि ते टाळताही येत नाही असं म्हणतात. अल्पायुषी ठरलेल्या कार्तिकच्या नशिबात हा असा मृत्यू योग लिहिलेला होता. संदेश वर केलेल्या जुजबी उपचारानंतर त्याला शुद्ध आली. हा भयावह प्रसंग आता कार्तिकच्या घरी कसा सांगायचा ? त्याच्या घरी कसे तोंड दाखवायचे ? या चिंतेने संदेश हतबल झाला होता. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबतच नव्हते.
अखेर स्थानिक ग्रामस्थांनी संदेश कडून त्याच्या घरचा नंबर घेत संदेशच्या घरी घडलेली दुर्घटना कळवली. संदेशच्या घरी हे दुर्दैवी वृत्त ऐकून एकच हाहाकार उडाला. कार्तिकच्या घरी कोणतीही कल्पना न देता त्याच्या एका जवळच्या नातेवाईकाला सोबत घेऊन संदेशच्या घरातील माणसे घटनास्थळी रवाना झाली. संदेशचे नातेवाईक आरोग्य केंद्रात आल्यानंतर त्यांना पाहून संदेशने हंबरडा फोडला. रडत रडतच त्याने घाटात घडलेला दुर्दैवी प्रसंग सर्वांना सांगितला. नशिबाचा फेरा कसा दुर्दैवी असू शकतो ? हे ऐकून सर्वांनीच डोक्याला हात लावला. आरोग्य केंद्रातील सर्व सोपस्कार पूर्ण करून कार्तिकचे कलेवर रुग्णवाहिकेतून त्याच्या घरी आणण्यात आले. अंधार पडून गेल्यानंतर खूप वेळ झाला, तरी कार्तिक परत का येत नाही ? या शंकेने कुंदा अस्वस्थ झाली होती. ती दोन वेळा संदेश च्या घरी जाऊन आली, त्यावेळी तिला तेथील वातावरण गुढ वाटले. काहीतरी अघटीत घडले असावे, असं कुंदाच्या सारखं मनात येत होतं. रात्री उशिरा घरासमोर रुग्णवाहिका लागलेली पाहून कुंदाचे अवसान गळले. ती घरातून धावतच रुग्णवाहिकेच्या दरवाजा जवळ आली. आतील दृश्य पाहून तिने फोडलेली किंकाळी आकाश भेदून गेली. पुढच्या क्षणी कुंदा मधील सारं अवसान गळलं आणि ती जमिनीवर कोसळली. कार्तिकच्या घरातील सर्वच माणसांचा बांध फुटला आणि रडण्याचा आकांत सुरू झाला. सकाळी हसतं खेळतं असणारं हे घर, रात्रीला एका भयाण आणि असह्य प्रसंगात बदललं. कार्तिकच्या जन्मासाठी कुंदाला स्त्रीरोग तज्ञांकडे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या कविताला, ही दुर्घटना समजताच तिचीही शुद्ध हरपली.
विवाह नंतर अनेक वर्षे कुंदाला मूल नसल्याने, तिला घरात अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते. विविध प्रयत्न केल्यानंतर कुंदाला तिच्या नशिबाने साथ दिली खरी, मात्र कार्तिकच्या जन्मानंतर उण्यापुऱ्या सोळा वर्षात तिच्या नशिबाचे फासे परत एकदा फिरले. मुलाच्या जन्मानंतर कुंदा सोळा वर्षांचं जे आयुष्य जगली, तोच तिच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा आणि समाधानाचा काळ होता. कार्तिकचा मृतदेह पाहून बेशुद्ध पडलेल्या कुंदाच्या नाकाजवळ कांदे लावले गेले, वैद्यकीय उपचार झाले तरीही कुंदा शुद्धीवर येऊ शकली नाही. कार्तिक शिवाय आपण आयुष्य जगू शकत नाही, या भावनेने कुंदा अक्षरशा अर्धमेल्या अवस्थेत गेली होती. अथक प्रयत्न केल्यानंतरही कुंदा परत शुद्धीवर येऊ शकली नाही. अत्यंत जड अंत:करणाने कार्तिकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे सर्व दिवस कार्य देखील पूर्ण झाले. कुंदाची अवस्था मात्र पहिल्या दिवशी होती, तशीच कायम होती . नशिबाचे फासे उलटे फिरायचे असतील, तर ते एक ना एक दिवस फिरतातच हेच या प्रसंगातून दिसून आले . निसर्ग सौंदर्य पहायला जाताना संदेश कार्तिकसाठी असा कोणता ‘ संदेश ’ घेऊन आला होता ? यामुळे ‘ कुंदा ’ च्या आईपणातील ममतेचा गंधच हरवून गेला. या दुःखद प्रसंगामुळे शेजारची ‘ कविता ’ देखील अबोल होवून गेली. घडलेला सारा प्रसंग नक्कीच वेदनादायी होता. मात्र, काळ सर्व वेळ जुळून कशी आली ? याचं कोडं कधीही सुटणारं नाही. कदाचित यालाच ‘ नशीब ’ असं म्हणत असावेत. हा सारा नियतीचा खेळ असतो, यातील आपली भूमिका ही पुढे मागे हलवल्या जाणाऱ्या सोंगट्यांसारखीच असते.
प्रसंगानुरूप रेखाचित्र : हेमंत सावंत चित्रकार, पुणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.