गोवा सीबीसी कडून मडगाव रेल्वे स्थानकावर पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन
गोवा – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो-गोवा येत्या 14 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत 78 व्या स्वातंत्र्य दिन 2024 चे औचित्य साधून मडगाव रेल्वे स्थानकावर विविध संकल्पनांवर आधारित पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मडगावचे आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात देशाच्या फाळणी काळातील भयावहतेची अनुभूती देणारे पुनर्संचयित आभासी वास्तव, नव्या फौजदारी कायद्यातील बदलांची माहिती देणारे संवादात्मक प्रदर्शन आणि इतर दृक-श्राव्य कार्यक्रमांव्यतिरिक्त भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शित केली जातील. या कार्यक्रमात नशा मुक्त भारत अभियानावरील सृजनात्मक डिजिटल आशयही प्रदर्शित केला जाईल.
हे प्रदर्शन 18 ऑगस्टपर्यंत सकाळी 10.00 ते रात्री 08.00 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्रीय संचार ब्युरो दक्षिण गोव्यातील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केली आहे. 16 ऑगस्ट रोजी दक्षिण गोवा जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला कोकण रेल्वेचे प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक बी. बी. निकम गोव्यातील पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम, दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक दीपाली नाईक या देखील उपस्थित राहणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.