September 9, 2024
Students lives have been made artful through Vakan Katta
Home » वाचन कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन बनवले कलासक्त
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वाचन कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन बनवले कलासक्त

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया

प्रा. डॉ. विश्वधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील चार वर्षे वाचन कट्टा चालविला. आणि त्याला पूरक अन्य कलांचीही या उपक्रमांमध्ये सांगड घालून विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन जीवन कलासक्त बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. एका माणसाच्या सुंदर विचाराच्या कृतीतून अनेकांचे जग बदलत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.देशमुख यांचा हा उपक्रम होय !

प्राध्यापक काय करतात ? ते विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी तरी बनवतात का ? असा सवाल अलिकडे केला जातो. सर्व क्षेत्रांचे सपाटीकरण झालेले असताना प्राध्यापकांबद्दलही असा प्रश्न उपस्थित साहजिक होत असला तरी सर्वच प्राध्यापकांना एका तराजूत जोखता येत नाही. नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा. विश्वधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी मागील सुमारे चार वर्ष सातत्याने ‘वाचन कट्टा’ ही चळवळ राबवून मराठी सांस्कृतिक क्षेत्रात, महाविद्यालयीन कार्यक्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हे करताना ‘कला माणसासाठी’… याला पूरक अन्य कलांचीही या उपक्रमांमध्ये सांगड घालून विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन जीवन कलासक्त बनविण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच !

महाविद्यालयीन वर्गांमधील अध्यापन विद्यार्थ्यांना भरपूर माहिती देते, एक वेळ ज्ञानाकडे जाण्याची ओढही निर्माण करतं; परंतु आपल्यामध्ये कोणती कौशल्ये आहेत ? आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी लागणारा आत्मविश्वास कसा संपादन करायचा ? या कामात मात्र वर्ग अध्यापन अपुरे ठरते. या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंत महाविद्यालयाच्या ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाचे मोल आजच्या काळात महत्वाचे असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्यामधील निरनिराळ्या कौशल्यांची जाणीव पहिल्यांदा झाली आणि त्यांचे प्रकटीकरण करायचे असेल, तर आत्मविश्वास कमवावा लागेल, हेही हळूहळू लक्षात यायला लागले.

या आत्मविश्वासातून ते स्वतःला आकार देत गेले. यातूनच कोणी उद्योग व्यवसायाकडे वळले, तर कोणी ब्लॉग लेखन आणि स्तंभ लेखनाचाही पर्याय निवडला. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल्स सुरू केले, तर काही विद्यार्थी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्राकडे वळले. याशिवायही अनेक विद्यार्थी आपला अभ्यास, अभ्यासक्रमाविषयक लेखन आणि संवाद यामध्ये आत्मविश्वासाने वावरू लागले आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना प्रा. डॉ. विश्वधार देशमुख म्हणतात, ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत कोरोना काळात कविता वाचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात जेष्ठ कवयित्री अनुराधा पाटील ते लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूरपर्यंत नव्या – जुन्या अनेक मान्यवर कवींचा सहभाग होता. यात महाराष्ट्र बरोबर बृहन महाराष्ट्रातील कवींही सहभागी झाले होते. याची दखल प्रादेशिक आणि राज्य साखळी दैनिकांनी जशी घेतली तशी मराठी वृत्तवाहिन्यांनी घेतली आणि बघता बघता हा एका महाविद्यालयाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचा होऊन गेला. पुढे प्रेरणेचा प्रवास ही 25 एपिसोडची मालिका सादर करण्यात आली. यात माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर ते साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्यापर्यंत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

बदलत्या काळात नेमकं काय करायला पाहिजे. या संदर्भातले योग्य मार्गदर्शन यानिमित्ताने विद्यार्थ्यांना झाले. याचा असा फायदा झाला, की विद्यार्थ्यांनी छोटे-मोठे स्वतःचे व्यवसाय सुरू केले. यात ‘अभिरुची संवाद’ हाही उपक्रम राबविण्यात आला. यात दृश्य साक्षरतेचे सजग भान यावे म्हणून जागतिक स्तरावर चर्चा झालेले काही निवडक इराणी, इंग्रजी, हिंदी, मराठी चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवले; याला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘लघुपट महोत्सव’ घेऊन २५ लघुपट विद्यार्थ्यांना दाखवले तसेच या क्षेत्रातील मान्यवरांच्या संवादाची मालिका चालू ठेवण्यात आली. खरं तर विद्यार्थ्यांचे सर्वांगाने व्यक्तिमत्व घडायला हवे, म्हणून वाचन साहित्य लेखन, चित्रपट, वक्तृत्व, धारिष्ट्य, वैचारिक जडणघडण आधी उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून त्या त्याप्रकारे सुमारे 35 उपक्रम आजवर राबविण्यात आले. असेही डॉ. देशमुख म्हणाले.

जीवनातील वेगवेगळी क्षेत्रे तसेच त्या क्षेत्रांना आवाहन करणाऱ्या कला याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कमालीचे कुतूहल असते; परंतु त्यांना परीक्षेच्या घाण्याला जुंपल्यामुळे ते या कलांकडे साधे डोळे वर करून देखील पाहत नाहीत. मात्र यशवंत महाविद्यालयाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदा विद्यार्थी साहित्याच्या वाचनाकडे वळले. त्यातूनच पहिल्यांदा नाटक, नंतर चित्रपट, त्यानंतर लघुपट, माहितीपट याबद्दल त्यांना कुतूहल वाटायला लागले.

काही विद्यार्थी चित्रकला आणि फोटोग्राफीदेखील समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. जीवनाचा खरा आनंद केवळ यश किंवा पैसा मिळवण्यात नाही, तर त्याहीपेक्षा आपणाला स्वतःला, स्वतःच्या आयुष्याला स्वतंत्र अर्थ देता येतोय का ? हे पडताळून पाहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे यामध्ये आयुष्यातील आनंदाच्या असंख्य शक्यता दडलेल्या असतात. विद्यार्थी या उपक्रमातून अशा असंख्य शक्यतांचा शोध घेणारे होऊ पाहतायत, याबद्दल डॉ. देशमुख यांना वाटणारे समाधान मोठे आहे. खरे तर वर्गाच्या आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीत बंद होणे तरुण मुलांना अजिबात आवडत नाही; पण यातून बाहेर कसे पडायचे ? नव्या शक्यतांचा शोध कसा घ्यायचा ? याबद्दलचे अनुकूल पर्यावरण तरुण मुलांच्याभोवती नाही. परिणामी ती समाज माध्यमाकडे लवकर आकृष्ट होतात.

माध्यमांवरचा वावर त्यांना सुरुवातीला आकर्षक वाटत असला तरी थोड्याच काळात ते त्यालाही कंटाळतात; पण हा कंटाळा आल्यानंतर या तरुणाईला नवनवीन पर्याय देणारी कोणती व्यवस्था आपल्याकडे आहे ? समाज माध्यमांची बाजारपेठ तरुणाईला हाका मारून बोलावते आहे आणि एकंदरीत शैक्षणिक पर्यावरण या तरुण पोरांना ‘परतीचा रस्ता नाही’ हे जणू बजावून सांगते आहे.

अशावेळी समाजमाध्यमेच साह्याला घेऊन वेगवेगळे पर्याय देणारे तरुणाईचे डिजिटल व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न प्रा.डॉ.देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे. एका माणसाच्या सुंदर विचाराच्या कृतीतून अनेकांचे जग बदलत असतं. डॉ. विश्वधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हाच प्रयत्न केला आहे. आजच्या व्यक्तिकेंद्री काळात अशा माणसाला व्यक्ती केंद्रित गटातून वेडा ठरवण्याची शक्यता राहते; पण या जगात वेडा ठरवल्या गेलेल्या लोकांनीच सकारात्मक इतिहास घडवला आहे, हे लक्षात ठेवायला हवे!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पेरणी सुक्षेत्रात हवी

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

हर शख्स परेशानसा क्यों हैं ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading