December 9, 2024
Otter seen on Bank of Krishna River article by Ajitkumar Patil
Home » कृष्णेच्या काठावर दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन…
काय चाललयं अवतीभवती

कृष्णेच्या काठावर दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन…

पाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे. भारतात १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे.

अजितकुमार पाटील

कृष्णा नदीच्या पात्रात दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन 7 तारखेला डिग्रज बंधारा व 15 तारखेला अंकलखोप भागात झाले. मगरीच्या बंदोबस्तासाठी डिग्रज बंधाऱ्यावर कामावर असणारे वन मजूर इकबाल पठाण व ढवळे ह्यांना मुंगसासारखा वेगळाच प्राणी नदीच्या काठावर फिरत असलेला दिसला. खात्री करण्यासाठी जवळ जाऊन शोध घेतला असता तो मुंगूस नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खात्री करण्यासाठी काही छायाचित्रे माहिती मानद वन्यजीव रक्षक ह्यांना पाठवली व ते पाणमांजर असल्याचे स्पष्ट झाले.

दुसऱ्या दिवशी या परिसरातील शेतकऱ्यांना विचारले असता हा प्राणी काही दिवस झाले इथे दिसत आहे व मागच्या वर्षी पण थोडे दिवस इथे आढळल्याची माहिती मिळाली. 15 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 ते 4 दरम्यान अंकलखोप हाळभाग येथे डॉ. अनिरुध्द पाटील (अंकलखोप) आणि सुजित चोपडे (भिलवडी) यांनी पानमांजराला कॅमेऱ्यात टिपले. डॉ. पाटील हे शेतात काम करत असतानाच नदी काठावर हालचाल जाणवली व otter सदृश्य प्राण्याची छायाचित्रे घेतली.

ह्या पूर्वी असा प्राणी कृष्णेच्या पत्रात पाहीला नसल्याचे सांगत. याबद्दल त्यांनी अधिक माहितीसाठी वन विभागाला कळविले. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्राण्यांची अधिक माहिती संकलित करण्यात आली. तेव्हा शीतल चोपडे, राकेश चोपडे आणि तुषार घाडगे यांना याच भागात गेल्या तीन आठवड्यात 3 पाणमांजर पाहिले असल्याचे सांगितले.

पाणमांजराबद्दल थोडक्यात…

पाणमांजराली ऑटर असे इंग्लिश नाव आहे. तो मस्टॅलिडे (mustelidae) कुळात मोडतो. याचा मांजर कुळाशी थेट संबंध नाही. गुळगुळीत कातडीचे पाणमांजर सर्वात मोठे असून त्याचे वजन ७ ते ११ किलोग्रॅम आणि लांबी १ ते १·३ मीटर असते. शेपूट सुमारे ४५ सेंमी लांब असते. पाठीवरील केस तोकडे व मऊ असतात. रंग पिवळट तपकिरी असून पोटाकडे तो फिकट करडा असतो. त्याच्या मुस्कटावर केस नसतात. शरीर लांब व निमुळते असते. पायांचे पंजे बळकट असतात आणि बोटांना नख्या असतात. बोटे अपुऱ्या पडद्यांनी जोडलेली असून त्यांचा उपयोग सफाईदारपणे पोहण्यासाठी होतो. विशिष्ट स्नायूंच्या साहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधते. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते ३ ते ४ मिनिटे पाण्याखाली राहू शकते. त्याला शिट्टी मारल्यासारखा आवाज काढता येतो. भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारफुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पाणमांजरांच्या वसाहती असतात. नर, मादी व पिले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या टापूची मालकी प्रस्थापित करतात.

मासे हे पाणमांजराचे मुख्य अन्न आहे. याखेरीज उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते. पाणमांजरे बऱ्याचदा गटाने माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात व तात्पुरती घरे करतात. गर्भावधी ६१–६५ दिवसांचा असतो. मादी एका वेळी २ ते ५ पिलांना जन्म देते. नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ असतो. पिले दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. एका वर्षानंतर ती स्वतंत्रपणे राहू लागतात. पाणमांजराचे आयु:काल सुमारे ४ ते १० वर्षे असतो. मगर हा पाणमांजराचा नैसर्गिक शत्रू आहे.

पाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे. भारतात १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे. परिसंस्थेतील कमजोर घटकांना संपवून, त्याची गुणवत्ता राखण्यामध्ये भक्षक प्राण्याची महत्त्वाची भूमिका असते. हे कार्य नदी परिसंस्थेत पाणमांजर अमलात आणते. रोगट माशांची शिकार करून, या परिसंस्थेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम ते करतात. याचा सरळ फायदा मासेमारी उद्योगाला होतो.

नदीतील माशांना रोग आला, तर मासेमारीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो. असे प्रकार या आधी अनुभवास आले आहेत. नदीत पाणमांजर नसल्यास, हे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता उद्भवते.

आता प्रश्न उरतो, की या प्राण्याचे अस्तित्व कितपत सुरक्षित आहे ? साधारण १५ ते २० वर्षांपूर्वी पाणमांजराची भारतभरात खूप मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. या सुंदर आणि खेळकर प्राण्यांची कातडी मिळवून, त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जायची. त्याचा इतर देशांमध्ये पर्स, टोपी इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी उपयोग होत असे. आजही कमी-अधिक प्रमाणात ही तस्करी चालू आहे. सततच्या आणि मोठ्या प्रमाणावर चाललेल्या तस्करीने पाणमांजर दुर्मीळ प्राणी झाले आहे. उत्तर भारतात त्यांची संख्या इतकी घटली आहे, की आता नदीच्या काही संरक्षित पट्ट्यांमध्येच त्यांचे अस्तित्व दिसते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading