कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन वाघमारे, पोस्ट मास्तर जनरल गोवा विभाग आर. के. जायभाये, कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर मराठी विभाग प्रमुख नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी पोस्टमास्तर जायभाये म्हणाले, समाज कार्यात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावे टपाल विभागातर्फे विशेष अनावरण करण्यात येते. स्वातंत्र्यपूर्व काळात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे मोलाचे कार्य केले आहे. केरळमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. शेतीच्या प्रश्नावर विविध ठिकाणी शेती परिषदा घेतल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हे विशेष अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, सगळे धर्म हे चांगले आहेत. यासाठी सगळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास करायला हवा. तरच आपणास वैश्विकदृष्टी प्राप्त होईल, असा विचार विठ्ठल रामजी शिंदे यांचा होता. महर्षी शिंदे यांनी ही वैश्विकदृष्टी प्राप्त केली होती. या दृष्टिकोनातून त्यांनी समाजाकडे, जगाकडे पाहीले. त्यांनी धर्माची चिकित्सा केली. तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
श्रद्धा आणि ज्ञान यांचे मिश्रण महर्षी शिंदे यांच्या आयुष्यात पाहायला मिळते. ज्ञानचा उत्कट इच्छा, समाजसेवची उत्कट इच्छा आणि अस्पृश्यता नष्ट करण्याची इच्छा अशा तीन पॅशन म्हणजे उत्कट इच्छा त्यांच्या आयुष्यात होत्या. या तीन गोष्टींसाठी त्यांनी त्याचे आयुष्य वाहीले असे म्हणायला काहीच हरकत नाही.
डॉ. जनार्दन वाघमारे
महर्षी शिंदे हे आयुष्यभर विद्यार्थी होते. ते थोर संशोधक होते. संशोधन म्हणजे सत्य शोधन. जो शब्द शोधतो तो खऱ्या अर्थाने संशोधक असतो. कोणताही विषय असो त्या विषयाच्या तळागाळापर्यंत जाऊन त्या ज्ञानाचा आशय प्राप्त करून घेणे. याला आपण संशोधन म्हणतो. महर्षी शिंदे यांनी ही अभ्यास पद्धती आपणाला दिली आहे. तौलनिक अभ्यासक्रम कोणत्याही गोष्टीची तुलना करायची. त्याच्यामध्ये काय भेद आहेत ते पाहायचे. अशा पद्धतीचा अभ्यास त्यांनी केला, असे डॉ. वाघमारे म्हणाले
आपल्या समाजाच्या मते धर्मामध्ये बदल होत नाही असे सांगतो, पण महर्षी शिंदे यांच्या मते धर्म हा स्थिर नसतो. धर्मामध्येही कालानुरुप बदल करावे लागतात आणि म्हणूनच धर्माकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहाण्याची गरज आहे, असे डॉ. वाघमारे म्हणाले.
डॉ. वाघमारे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न आजही जसेच्या तसेच आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच आहेत. आज तर शेतीचे चित्र खूपच अवघड झाले आहे. प्रत्येक वस्तू शेतकऱ्याला विकत घ्यावी लागते आहे. हा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणे हीच तर खऱ्या अर्थाने महर्षी शिंदे यांना श्रद्धांजली अर्पन करण्यासारखे आहे.

टिळकांच्याकडे महर्षी शिंदे मोठ्या आशेने गेले पण त्यांच्या प्रश्नावर टिळकांची स्वाक्षरी मिळाली नाही…तो प्रश्न कोणता हे ऐकण्यासाठी ऐका डॉ. जनार्दन वाघमारे यांचे शिवाजी विद्यापाठात झालेले भाषण…