शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. भाग एक अभ्यासक्रमासाठी नामदेव माळी यांच्या एका कोंबड्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या कांदबरीची निवड करण्यात आली आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. बालकुमार गटाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ओळख होण्यासाठी ही कांदबरी उपयुक्त ठरते.
सौ. वंदना हुळबत्ते,
सांगली, मो–९६५७४९०८९२
मानव नेहमी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागरूक असतो. आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्याची संघर्षाची तयारी असते. जसे मानवाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज असते तशीच पशुपक्ष्यांना ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज असते. हे अधोरेखित करणारी ही कांदबरी आहे. एका कोंबड्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातो तेव्हा त्याचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले गेले ?, त्यात कोणत्या, कश्या अडचणी आल्या ?, त्यावर मात कशी केली ? ही या कादंबरीची मध्यवर्ती भूमिका.
शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचे पालन होते. ते कोंबड्यांवर जीवापाड प्रेम करतात. या कादंबरीतील आजीचे गब्रूवर असेच प्रेम आहे. गौरवला गब्रू आवडू लागतो. या गब्रूच्या आरवण्यामुळे शेजाऱ्यांची झोपमोड होते. अशी तक्रार ते करतात. तेव्हा गब्रूच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येते. गब्रूच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी सृजन कट्टयावरील मुले उभी राहतात. ते प्रयत्न करत असताना लेखकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? त्याची गरज काय ? हे विशद केले आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत?विषयाची मांडणी कशी केली पाहिजे ? या साऱ्या गोष्टींचा उहापोह या कादंबरीतून केला आहे.
’एका कोंबड्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या कांदबरीचा खरा हीरो तर गब्रु कोंबडा आहे. कादंबरीचे कथानक कोंबड्यां भोवती घडते. मुलांचे हात लिहिते ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असणारे एक व्यक्तीमत्व म्हणजे नामदेव माळी. शैक्षणिक क्षेत्रात गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सहायक संचालक पदावर कार्यरत होते. त्यांनी नेहमी मुलांना प्रोत्साहित करून, वेळोवेळी मार्गदर्शन करून, त्यांच्याकडून सकस लिखाण करून घेतले. सेवानिवृत्तीनंतर ही त्यांचा उत्साह कमी झाला नाही मुलांच्या लेखनासाठी उपक्रम घेत असतात. मुले नक्की लिहिती होतील हा त्यांचा विश्वास आहे.
एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही कांदबरी सोप्या भाषेत आहे. मुलांच्या अभिव्यक्तीला प्रेरणा देणारी आहे. कांदबरी साधना प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. या कांदबरीचे मुखपृष्ठ गिरीश सहस्रबुद्धे यांनी अतिशय समर्पक केले आहे.
लेखकांनी मुलांचे भावविश्व लक्षात घेऊन या कादंबरीचे लेखन केले आहे. गौरवचे बहाद्दूरमध्ये झालेले रूपांतर रंजक आहे. मुलांचे कुतूहल जागृत करणारे आहे. पानोपानी उत्सुकता वाढवणारे प्रसंग आहेत. कांदबरीची भाषा सोपी आहे. लेखकाचे बालमानसशास्त्र चांगले आहे. पशुपक्ष्यांना समजून घेण्याची उत्सुकता मुलांना असते, पशुपक्ष्यांचे भावविश्व, त्यांचे विचार,समजूती गैरसमजुती या बद्दल सविस्तर चर्चा या कादंबरीत आहे. गौरव त्यांचे सृजन कट्टयावरील मित्र, आजी, मार्गदर्शक शिक्षक यांच्या संवादातून ही कादंबरी उलगडत जाते.
अभिव्यक्त कसं व्हावं याच प्रशिक्षण काही वेळेस मिळते पण अभिव्यक्तीवर बंधने आली तर काय करावं हे सांगितले जात नाही. तो उपाय कादंबरीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते.
‘दुसऱ्याच्या सुरळीच्या तोड्याला हात लावू नये.’
‘ नमून वागवं पण लाचार होऊ नये.’
‘मानानं पान खावं.’ या सारखी अनेक सुवचने आजीच्या तोंडी आहेत.त्यातून लेखक सहज संस्कार करतात.
केवळ शाळेत जावून अभ्यास होतो असे नाही.अभ्यास तर घरात,समाजात, निसर्गात ही होतो. एके ठिकाणी लेखक म्हणतात ‘चार भिंतींच्या आत मुलांना शिकवणं म्हणजे मुलांना खुराड्यात कोंडल्यासारखं आहे.’शाळा,परीक्षा,गुण,शिकणं यावर सविस्तर चर्चा केली आहे.या कांदबरीतून खऱ्या शिक्षणाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे.बालका बरोबर मोठ्यांना ही कादंबरी दिशा देते.ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे. समजून घेतली पाहिजे.
मुलांच्या मनाची मशागत करणारा माळी मिळाला की फळा फुलांनी बाग बहरून येणार हे निश्चित.
पुस्तकाचे नाव – एका कोंबड्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ( कादंबरी )
लेखक – नामदेव माळी
प्रकाशक – साधना प्रकाशन
किंमत – १२५ रू
पृष्ठ संख्या – ९२
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
राजकिय फुलबाज्या…