जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी संन्यास घ्यायचा आहे म्हणजेच आपण मुक्तीसाठी आवश्यक कार्य साधायचे आहे. आवश्यक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती घेऊन ज्ञानी व्हायचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा ।
ते फळभोगसोसा । मुकले गा ।। २६१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास अर्थात कर्मत्याग साधला, ते कर्मफलभोगाच्या अर्थात जन्ममरणाच्या त्रासापासून मुक्त झाले.
संन्यास म्हटले की आपल्यासमोर घरदार सोडून मठात राहाणे किंवा हिमालयात वा वनवासात जाणे असाच समज होतो. पराक्रमी राजेही संन्यास घेत. राज्याभिषेकानंतर म्हणजे कार्यसमफलतेनंतर, उद्दिष्टपूर्तीनंतर राजगादी सोडून संन्यास आश्रम स्वीकारत. भारतीय संस्कृतीमधील या संन्यासी वृत्तीचा, या कार्याचा अभ्यास करणे गरजेचे वाटते. याचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणे हे महत्त्वाचे आहे.
माचनूरचे महान संत बाबा महाराज आर्वीकर यांनी संन्यास ही संकल्पना समजावून सांगताना म्हटले आहे की संन्यास ही एक पवित्र वृत्ती आहे. पण त्याचा अर्थ सर्वतः दुर्लक्षिणे आणि किंकर्तव्य होणे असा वेदांतरी नाही. संन्यासी म्हटले की जगाला विटलेला, भोगाला नव्हे तर श्रमाला कंटाळलेला. इंद्रियरुचीला नव्हे तर जबाबदारी घेण्यास निरहंकार असलेला असा अर्थ लावला जातो. पण हे खरे नाही. आर्वीकर यांच्या मते संन्यास या पवित्र धर्माचा स्वीकार होताच त्यानें सकळ विश्वशांतीसाठी झटावें, दैन्य दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावें, जीवजीवाची अध्यात्मसंवेदना जागी करावी व त्रिभुवन आनंदाने भरावे, असा वेदोक्त आदेश आहे.
हे विचारात घेतले तरच आपणास संन्यास याचा अर्थ लक्षात येईल. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी संन्यास घ्यायचा आहे म्हणजेच आपण मुक्तीसाठी आवश्यक कार्य साधायचे आहे. आवश्यक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती घेऊन ज्ञानी व्हायचे आहे. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज आहे. संसारात राहूनही हा कार्यभाग साधता येणे शक्य आहे. इथे देहवृत्तीचा त्याग आहे. आत्मतत्त्वाचा स्वीकार करायचा आहे. आत्मा हा अमर आहे. तो स्वतंत्र आहे. फक्त देहात आल्यामुळे तो आपणास देहाचा वाटत आहे. त्याग गुंतल्याचा भास होतो आहे. पण तो देहाचा नाही. ही जाणीव करून घ्यायची आहे. याची अनुभूती घ्यायची आहे. अन् ज्ञानी व्हायचे आहे.
आत्मा देहाचा नाही. मग जन्म कुणाचा अन् मृत्यू कोणाचा ? देहात आल्याने तो जन्मल्याचा भास होतो अन् देहातून गेल्यानंतर मृत्यू झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात आत्मा आणि देह वेगळा आहे. त्यामुळे आत्म्याचा जन्मही होत नाही अन् मृत्यूही होत नाही. हे जाणण्यासाठी साधना आहे. साधनेने याची अनुभूती घेऊन जन्ममृत्यूचा हा खरा खेळ ओळखायचा आहे. त्यानुसार अन् जन्ममृत्यूतून मुक्त व्हायचे आहे. अर्थात आत्मज्ञानी व्हायचे आहे. मी आत्मा आहे याची अनुभूती घेऊन अमर व्हायचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
