आज फिनलँड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. नागरिकशास्त्र व स्त्रीपुरुष बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे, शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीतही क्रमांक एकवर आहे. भ्रष्ट्राचारमुक्त व्यवहारात ,लैगिंक समानतेत, सुरक्षितेत व शांततेत फिनलँड जगात एक नबंर देश आहे, म्हणूनच जगात सर्वात आनंदी देशांमध्येही फिनलँड क्रमांक एकवर आहे .
अॅड विलास पाटणे
रत्नागिरी

फिनलँडची शिक्षणपद्धती –
- शिक्षकाला समाजाची सन्मानाने वागणूक
- खेळातून शिक्षण
- समानतेमधून उत्कृष्टता
- अभ्यासाचे ओझे नाही
- प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत ज्ञान
- मुल्यांकनावर आधारीत परीक्षा
- शिक्षक प्रयोगशिल व संशोधक
- सात वर्षाच्या आत मुलाना शाळेत टाकणे गुन्हा
- विद्यार्थ्याला शिक्षकाच मुल्यमापन करण्याचा अधिकार
जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड उत्तर युरोपामध्ये आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. रत्नागिरी तालुक्याची लोकसंख्या 56 लाख आहे व असे भारतात 5650 तालुके आहेत. थोडक्यात फिनलँड किती चिमुकला देश आहे याची कल्पना येते. इथली शिक्षव्यवस्था जगातली ती सर्वात चांगली मानली जाते. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या देशानाही त्यांनी मागे टाकले आहे.
फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. त्यांच्यात नापास होण्याचं प्रमाण जवळ जवळ शून्य असतं. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, तर त्या संस्थेच्या निकषांत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात.
फिनलंडमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आणि अनिवार्यसुद्धा आहे. त्यासाठी त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तकं, वह्या, संगणक, कलाक्रिडा याकरीता लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं. देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तिथलं सरकार चालवतं आणि सर्व खर्च सरकार उचलतं.
या देशात एकही शाळा खाजगी नाही. या शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना उच्च दर्जाच दुपारचं जेवणही मोफत दिलं जातं. विद्यार्थ्याना गणवेष नसतो. इथलं कोणतंही मूल सात वर्षांचं होईपर्यंत शाळेत जात नाही. सात वर्षांच्या आधी मुलांना शाळेत ‘टाकणं’ हा गुन्हा समजला जातो. सात वर्षापर्यंत मुलांनी आपलं बालपण जगून घेतलं पाहिजे, असं तिथं मानलं जातं. सात वर्षाच्या आतील मुलांना पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही, तर तिथं त्यांना खेळणं, मोकळेपणानं जगणं, इतरांशी मैत्री करणं, दुसऱ्या मुलांना समजून घेणं, परस्पर सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल हे पाहणं, अशा गोष्टी त्यांच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी म्हणून शिकवल्या जातात. त्यानंतर सात ते सोळा या वयोगटासाठी तिथं शिक्षण अनिवार्य आहे.
प्रवेशपरिक्षा नसतात केवळ इच्छा व अभ्यासाची प्रेरणा जाणून घेतात. प्रत्येक वर्गात फक्त वीस मुल आणि तिन शिक्षकांना ठेवलं जातं. दिवसातले फक्त चार तास. त्यातच दुपारची जेवणाची सुट्टीही असते. आणि घरी जाताना मुलांना गृहपाठ अजिबात दिला जात नाही. त्यांनी आपल्या घरी अभ्यास करावा, असं तिथल्या शाळांना, सरकारला आणि त्यांच्या पालकांनाही वाटत नाही. अर्थात तिथंही काही मुलं अभ्यासात कच्ची असतात. पण अशा मुलांना कुणी नावं ठेवत नाही, अशा मुलांवर शिक्षक आणि शाळा विशेष लक्ष देतात. वातावरण मोकळे व अनौपचारीक असते . शिस्त धाकामुळे नव्हे तर वागण्यातून आतून येते.
विद्यार्थ्याच्या वेगळेपणाचा आदर केला जातो. फिनलँडमध्ये शिक्षक होणं हे फारच महत्वाचं आणि मानाचं समजलं जातं. समाजात शिक्षकांना मोठ्या विशेषत्वानं आणि सन्मानानं वागवलं जातं. निवडक आणि पारखून घेतलेल्या लोकांनाच शिक्षक केलं जातं. शिक्षकाला पदविके बरोबर इतरही सवयी, वर्तणुक योग्य असावी लागते. शिक्षकाच वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच शिक्षक होण्याचं प्रशिक्षण सुरू केलं जातं. बाकीच्या शिक्षणाबरोबरच त्यांना शिक्षक होण्याचा वेगळा आणि विशेष अभ्यास करावा लागतो. त्यात अभ्यासूपणा, कल्पकता, ज्ञान, नाविन्याची ओढ आणि विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव तपासला जातो.
सर्वात महत्वाचं म्हणजे या देशात प्रत्येक शिक्षकानं स्वतःचे शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी पूर्ण मुभा दिली जाते. उलट प्रत्येक शिक्षकाकडून तीच मोठी अपेक्षा केली जाते की, जुन्या गोष्टींचा घाण्याचा बैल होण्यापेक्षा प्रत्येक शिक्षकानं अभ्यासात, शिकवण्याच्या पद्धतीत सतत नाविन्य आणावं, नव्या नव्या गोष्टी कराव्यात आणि नियमितपणे काळाच्या पुढं राहावं. एका अर्थानं तिथला प्रत्येक शिक्षक हा संशोधकच असतो. फिनलँडच्या शिक्षणव्यवस्थेत मुलांची परीक्षा घेण्याची पद्धत नाही. त्यामुळं मुलांवर परीक्षेचा ताण अजिबात नसतो. तिथं मुलांनी शिकणं महत्वाचं मानलं जातं, परीक्षा देणं नाही. आपलं नऊ वर्षांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रत्येक मुलाची राष्ट्रीय स्तरावर एक चाचणी घेतली जाते. त्या मुलाला पुढच्या शिक्षणात प्रवेश घेता येण्यासाठी ही चाचणी महत्वाची असते, आणि तिच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं. त्या चाचणीत सहसा कुणी अनुत्तीर्ण होत नाही. पण पुढं मूल कोणत्या क्षेत्रात जाणार हे या चाचणीत ठरतं.
इथल्या शाळांमध्ये आणि शिक्षणात ज्ञान आणि इतरांशी सहकार्याची भावना या गोष्टींवर भर दिला जातो. मुलांना आपापसात स्पर्धा करू दिली जात नाही. सोबतच मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातल्या आणि व्यवहारी गोष्टी शिकवल्या जातात. इथली शिक्षणपद्धती मुलांना नुसतं शिक्षित बनवत नाही, तर सुशिक्षित बनवते आणि त्याबरोबर प्रत्येक मूल चांगलं माणूस होईल, आदर्श जगेल-वागेल, हेही शिकवते. इथल्या शिक्षणात जास्त जोर असतो तो गणित आणि विज्ञानात. त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आणि शिक्षक विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताच्या बाबतीत आधुनिक राहिले पाहिजेत याची दक्षता घेतली जाते. सोबत त्यांनी मुलांना शिकवण्याच्या नव्या नव्या पद्धती शोधल्या पाहिजेत, हेही अपेक्षित केलं जातं. चांगल्या शाळा आणि खराब शाळा यांच्या गुणवत्तेत अगदी रेषभर अंतर असतं.
वर्गातल्या अभ्यासाचे तासही बंधनकारक नसतात. कोणतंही मूल त्याला हवा तेवढा वेळ वर्गात बसू शकतं. त्याला वाटलं, वर्गाच्या बाहेर जावं, खेळावं किंवा मस्त आराम करावा, तर ते मूल ते करू शकतं. शाळा त्याला त्या सोयी पुरवते. सर्व शाळांमध्ये मुलांच्या अभ्यास सोडून खेळण्याच्या किंवा आराम करण्याच्या सोयी असतात. प्रत्येक वर्गात दर पंचेचाळीस मिनिटांनंतर मुलांना पंधरा मिनिटांची सुट्टी दिली जाते. मुलं त्या वेळात खेळू-बागडू शकतात, शाळेच्या बागेत फेरफटका मारू शकतात, हवं ते करू शकतात. अर्थात वर्ग चालू असतानाही मुलं हवं ते करू शकतात आणि बाहेरही जाऊ शकतात. वर्गात शिक्षकांशी किंवा इतर मुलांशी गप्पाही मारू शकतात. वर्गात मुलांची आणि शिक्षकांची बसण्याची व्यवस्थाही मजेशीर असते. शिक्षक सहसा टेबल-खुर्ची वापरत नाहीत. मुलंही स्वतःला हवं तिथं बसतात. त्यांनी बाकड्यांवरच बसलं पाहिजे असं बंधन नाही. .
वर्गाला वाटलं तर वर्ग शिक्षकांच्या भोवती गोल करून जमिनीवर बसतो. शिक्षकही मुलांमध्ये जमिनीवर बसतात. कधी कधी वर्ग शाळेच्या गच्चीत किंवा बागेतही बसतो. मुलं आणि शिक्षक मित्र होऊन ती गोष्ट ठरवतात. सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक मुलांचे चांगले मित्र असतात. प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांच मुल्यमापन करतात. अशी ही शिक्षणव्यवस्था आजच्या जगात पहिल्या क्रमांकाची मानली जाते.
आज फिनलँड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. नागरिकशास्त्र व स्त्रीपुरुष बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे, शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीतही क्रमांक एकवर आहे. भ्रष्ट्राचारमुक्त व्यवहारात ,लैगिंक समानतेत, सुरक्षितेत व शांततेत फिनलँड जगात एक नबंर देश आहे, म्हणूनच जगात सर्वात आनंदी देशांमध्येही फिनलँड क्रमांक एकवर आहे आणि फिनलँडच नेतृत्व करताहेत जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरिन बालवाडींच्या कोंडवाडयात घुसमटलेली, अभ्यासाच्या ओझ्यात दबलेली, मार्क्स व परिक्षा पद्धतीत फसलेली, शिक्षकाच मुल्यांकन नसलेली आपली शिक्षणव्यवस्था फिनलँडच्या दिशेने नेता येईल काय ?