१८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची शास्त्रशुद्ध मांडणी प्रस्तूत ग्रंथात असल्यामुळे तत्कालीन भाषिक जडणघडणीच्या अभ्यासासाठी प्रस्तुत ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.
प्रा. डॉ. फुला बागुल 9822934874
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत’ अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे मोठे योगदान आहे. या संमेलनांनी ‘मराठीभाषा व साहित्य समृध्दी बरोबरच मराठी भाषकांचे ऐक्य निर्माण करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका केले आहे. न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली १८७८ मध्ये पुणे येथे पहिले ग्रंथकार संमेलन झाले. आज या संमेलनांनी शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे ९८ मराठी साहित्य संमेलन लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ‘अभिजात मराठी’ हा सन्मान प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन अधिक उत्साहात होत असल्याचे जाणवते.
या साहित्य संमेलनांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘मराठीभाषासमृद्धी व स्वभाषासरंक्षण’ या जाणीवेतून महत्वाचे कार्य केले आहे. १८७८ ते १९४७ या कालखंडात ३१ साहित्य संमेलनाध्यक्षांनी आयत्या अध्यक्षीय भाषणांतून मराठीभाषेच्या जडण-घडणी संदर्भात भाषिक विचार मांडलेत. या विचारांचा संशोधनाच्या भूमिकेतून प्रा डॉ. प्रभाकर जोशी यांनी ‘मराठी साहित्य संमेलन आणि भाषाविचार’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशन यांनी तो ग्रंथ अमळनेर येथे झालेल्या ९७ व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित केला.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचे राज्य होते. त्यांनी राज्यव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील भाषिक व्यवहार इंग्रजीतून सक्तीने सुरु केला. मुंबई विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच होते. संस्कृत व मराठी भाषेचा, परिचय इंग्रजीतूनच होत होता. मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळाले होते. इंग्रजी मिश्रित मराठी सर्वत्र रूढ झाली. त्याच काळात संमेलनाध्यक्ष हे प्रसिद्ध मराठी साहित्य लेखक होते. तेच संमेलनाध्यक्ष झालेत या सर्वांनी मराठीभाषेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक आयत्या अध्यक्षीय भाषणातून भाषिक विचार मांडलेत.
या भाषिकविचारात मराठी प्रमाणभाषा, शुद्धलेखन, व्याकरणविचार, भाषाशुद्धीची चळवळ, प्राथमिक, माध्यमिक उच्च शिक्षणाचे माध्यम, मराठीभाषा, मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासनव्यवहारात मराठीचा वापर, परिभाषेची आवश्यकता, लिपीसुधारणा, भाषावार प्रान्त रचनेच्या मागणीतून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र प्रान्तरचना, मराठीचे अभिजात भाषा म्हणून असलेले वैभव इत्यादी प्रश्नांच्या संदर्भात विचार आपल्या अध्यक्षीय भाषणांतून प्रसिद्ध साहित्यिकांनी मांडले आहेत. या लेखकांमध्ये ह. ना आपटे, माधवराव पटवर्धन, न. चिं. केळकर, श्री. कृ.कोल्हटकर, शि. म. परांजपे, वा. म. जोशी, सयाजीराव गायकवाड, भवानराव पंत प्रतिनिधी, श्री. व्यं. केतकर, वि. दा. सावरकर, द. वा. पोतदार, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, न र फाटक, ग. त्र्यं. माडखोलकर इत्यादी प्रसिद्ध साहित्यिकांचा समावेश आहे.
- शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज
- केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे एका संस्थेद्वारे खोटी नोकर भरती प्रक्रिया
त्या काळात महाराष्ट्र एकसंघ नव्हता मराठी भाषिकांना एकत्र आणून त्यांच्यात ‘भावनिक ऐक्य’ निर्माण करण्याचे कार्य या संमेलनाच्या माध्यमातून झालेल्या भाषिकमंथनाने केल्याचा निष्कर्ष प्रस्तुत ग्रंथातून अभ्यासपूर्व पध्दतीने मांडलेला आहे. अध्यक्षांच्या या भाषिक विचारांची फलश्रुती म्हणजे ‘मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र पुणे विद्यापीठाची स्थापना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शिक्षणाचे माध्यम मराठी, शासनव्यवहारात मराठी होय. १८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची शास्त्रशुद्ध मांडणी प्रस्तूत ग्रंथात असल्यामुळे तत्कालीन भाषिक जडणघडणीच्या अभ्यासासाठी प्रस्तुत ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.
पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार (१८७८ ते १९४७)
लेखक – प्रा. डॉ प्रभाकर ज. जोशी
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन पुणे
किंमत – ३५० रुपये
पृष्ठे २४४
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.