March 30, 2023
importance-of-reading-holy books
Home » पारायण का करावे ?
मुक्त संवाद

पारायण का करावे ?

पारायण शब्द सतत आपल्या कानावर पडतो. परंतु पारायण का करावे ? व पारायण म्हणजे निरर्थक बाब आहे. असा समज केला जातो. कधी कधी हा समज देखील बुद्धीच्या कसोटीवर त्याचा विचार केल्यास योग्यही आहे व नाहीही. पण ती निरर्थक गोष्ट नाही !.हे सांगण्याचा हा प्रयत्न…

पुष्पा सुनीलराव वरखेडकर
पी. डी. कन्या शाळा वरुड
मोबाइल – +91 95791 58482

पारायण म्हणजे त्यांच त्या गोष्टींची पुनरावृत्ती होय, वारंवारीता अभ्यासणे होय. संत वाड्मयाचा अभ्यास एका दृष्टी क्षेपात अवलोकन करण्या इतके साधे काम नाही. पारायण करणे ही गोष्ट मानसशास्त्राच्या दृष्टीने मनाशी संबंधित आहे. साधकाची किंवा वाचकाची मनोवृत्ती व त्याची भावधारा व मनाचे आरोग्य त्यांचे नियमन करण्याकरता देखील पारायणाची आवश्यकता आहे. पारायणामुळे मनाची स्थिरता निर्माण होते. अनिर्बंध मनाला एका सूत्रात, एका भावात बांधल्या जाते. अनुशासन, संयम, मनोनिग्रह इत्यादी गोष्टी पारायणाद्वारे साध्य होतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतकरणात वास करतात. या सर्वांना काही क्षणापुरते नियंत्रण करण्याचे कार्य देखील पारायणाच्या माध्यमाने होते. माझ्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे. हा पूज्य भाव देखील मनात निर्माण होतो. माणसाची दृष्टी पवित्र शब्दांनी पवित्र होते. इंद्रियांना संयमीत करण्याकरता पारायण फार महत्त्वाचे आहे.

ज्ञानेश्वरी वाचनाने बुद्धी प्रगल्भ बनते. मन परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होते. मनुष्य नेहमी सत्संगाची इच्छा करतो यामुळेच मनुष्य खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाच्या प्राप्तीची वाटचाल करतो. पारायण करताना ती वैखरीतून प्रगट होते. वैखरीतून मध्यमा मध्ये जाते. तिथून तिचा प्रवास पश्यंती व नंतर परावाणीत जातो. हा प्रवास परावाणीत थांबला तर तेथे असणारे कुविचार नष्ट होऊन विचारांचे शुद्धिकरण करणाचे काम सूक्ष्म रीतीने होते. विचारांना स्थैर्य प्राप्त होते. उलट सुलट विचारांना योग्य दिशा देण्याचे कार्य, पारायणातील पवित्र शब्द करतात. यासाठी, शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. त्या शब्दाचे अंतरंग, गाभा समजून घेणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वरी बद्दल सांगायचे झाल्यास संत नामदेव म्हणतात.

“नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी
एक तरी ओवी अनुभवावी”

पारायण करून त्यातील शब्दांना अनुभवा व आपली क्षमता आपण ओळखून जीवनात उतरविल्यास आनंदाला पारावार राहणार नाही. ज्ञानेश्वरीत चमत्काराला प्राधान्य नाही कुठल्याच प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलेले नाही . कर्मालाच प्राधान्य दिलेले आहे. पारायण करणे म्हणजे सदॄ विचारांचा वारंवार अभ्यास केल्यास. विचारांचे शुद्धीकरण होईल हातून सत्कर्म घडेल सेवाभाव त्याग सहकार्य इत्यादी भावना वाढीस लागतील.

तसेच संत वाड्मयाचे समाज, सुधारकांचे चरित्र, कार्य वारंवार पठण करणे म्हणजे पारायण करणे होय. समाजाचे कल्याण, आत्म कल्याण करण्याकरिता वारंवार तीच गोष्ट दृष्टीसमोर ठेवली तर मनाचं परिवर्तनाचा कार्य पारायणाच्या माध्यमातून होते परंतु या सर्व गोष्टी डोळसपणे व्हायला हव्यात. शब्दांचे अंतरंग समजून घ्यायलाच हवे. आत्म कल्याणाची पहिली पायरी म्हणजे पारायण होय.

पारायणामुळे जरी इंद्रिय नियमन शिस्त, अनुशासन मनाचे स्थैर्य या गोष्टी जरी घडल्या तरीही आध्यात्मिक विकासाची पहिली पायरी होईल. दुसरी पायरी म्हणजे शब्दांचे अंतरंग आवर्जून समजून घेणे व ते कृतीत उतरविणे. हा सूक्ष्म अभ्यास केल्यासच त्या पारायणाची फलप्राप्ती होईल. पारायण हाच स्थूल अभ्यास होय जीवनाचे उत्थान करण्याचे काम सूक्ष्म अभ्यासच करते. म्हणून पारायण करता करता सूक्ष्म अभ्यास वाढवावा. वरवर पाहता पारायण करणे ही गोष्ट जरी शुल्लक वाटली तरी पारायण अध्यात्माची पहिली पायरी होय.

Related posts

सद्य:स्थितीचे वास्तव दर्शन घडवणारी भुईभेद

पौष्टीक अन् कुरकुरीत कोबीची वडी

Neettu Talks : आला उन्हाळा ! अशी घ्या काळजी..

Leave a Comment