March 17, 2025
The elegance of my Marathi Classical language
Home » माय मराठीची अभिजातता…
विशेष संपादकीय

माय मराठीची अभिजातता…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, हे ऐकून आनंद झाला. सुमारे १४ कोटी लोकांची मराठी भाषा, मराठी अस्मिता ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. मराठीची श्रीमंती आपल्याला कळायला खूप वेळ लागला. आता ही श्रीमंती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवी, ते आपले कर्तव्यच आहे. यासाठीच हा लेखप्रपंच…

डॉ. दीपक चिद्दरवार,
मराठी विभागप्रमुख,
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर जिल्हा लातूर.
भ्रमणध्वनी : ७७०९४२७७०७

मराठीचे प्राचीनत्व शोधायला लागल्यावर आपल्याला असे दिसते की, कोणत्याही भाषेची जन्मतिथी किंवा जन्मस्थळ सांगणे अशक्य असते. कारण भाषानिर्मिती ही घटना नसून प्रक्रिया आहे. म्हणूनच भाषेच्या विकासावर प्रकाश टाकावा लागतो. “गंगातीर आणि वऱ्हाड मिळून तिचे माहेर होय”असे शं.गो. तुळपुळे यांना वाटते. (यादवकालीन मराठी भाषा पृष्ठ क्रमांक – २५) यादवकालीन मराठी साहित्यात मराठवाडी आणि वऱ्हाडी मंडळी यांची भाषा कानावर येते. तर डॉ. ना. गो. नांदापूरकर यांच्या मते गोदावरीच्या दक्षिणोत्तर असलेल्या पैठणच्या आसपासचा प्रदेश हा मराठीच्या अभ्यासाचा मध्य किंवा प्रारंभबिंदू असावा. (मराठी भाषा, मराठी विश्वकोश खंड बारावा पृष्ठ क्रमांक – ११९७) भाषा अभ्यासक सुधाकर देशमुख  ‘अश्मक’ प्रदेशाला मराठीचे उगमस्थान मानतात. त्यामुळे ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आले. त्याप्रसंगी जी स्मरणिका तयार केली त्या स्मरणिकेला ‘अश्मक’ हे नाव दिले होते.

मराठीचे उगमस्थान कुंतल असावे, हे सांगून म. रा. जोशी लिहितात की, “कुंतल प्रदेशात ते सोलापूर, उस्मानाबाद, बिदर व गुलबर्गा जिल्हे होते. आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र या देशश्रेष्ठ जोडणारा दुवा म्हणजे कुंतल देश अशीही व्याख्या करतात. “ इ. स. ५०० ते इ. स. १००० या कालखंडाला वाङ्मयाच्या इतिहासात अपभ्रंशाचा कालखंड असे संबोधले जाते. याच काळात अपभ्रंशाच्यापोटी मायमराठीचा जन्म झाला असावा. निश्चित असे स्थळकाळ सांगता येत नाही तरीसुद्धा गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली कोरलेल्या

“श्री चावून्डराजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले” या  ओळी म्हणजेच मराठीतील लिखित आद्य वाक्य होय. हा काळ इ.स. ९८३ चा असावा. परंतु अभ्यासकात मतभिन्नता जाणवते.

मराठीचे प्राचीन उल्लेख इतरत्र कुठे आले याचा शोध घेऊ –

१) ताम्रपट :  शके ६०२ (इ. स.६८०) मधल्या विक्रमादित्य सत्याश्रेयाच्या ताम्रपटातील पन्नास, प्रिथवी हे दोन शब्द मराठी शब्द म्हणून सांगितले आहेत.

२) मानसोल्लास : सोमेश्वर नावाच्या राजाने ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ हा संस्कृत ग्रंथ शके १०५८ (इ.स. ११३६) साली लिहिला. हा ग्रंथ  ‘मानसोल्लास’ या नावाने ओळखल्या जातो. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे म्हणतात की,  “या ग्रंथात ठिकठिकाणी मराठी रूपं व मराठी शब्द आले आहेत.”

३) पंडित आराध्य चरित्र: पालकुरीकी सोमनाथ नावाच्या तेलगू कवीने पंडित आराध्य चरित्र हे काव्य लिहिले असून त्यात मराठी भाषेतील काही शब्दांचा उल्लेख आला आहे.

४) गाथा सप्तशती : महाराष्ट्रात लिहिल्या गेलेला आद्यग्रंथ होय. ‘गाथा सप्तशती’ मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण असून त्यात मानवी भावना, व्यवहार आणि प्रकृतीचे सुंदर चित्रण केलेले आहे. सातवाहन राजा हाल यांनी जनतेकडून मोठ्या प्रमाणात गीते गोळा करून त्या सातशे गाथांचा संग्रह संपादित केला. (काळ इ.स. पूर्व २०० ते इ.स.२०० उदा.गाथा क्रमांक ११६)

“जेणे विणाण जिवीज्ज अणुणिज्जइ सो कआवराहो
पत्ते विण अरदाहे भण कस्सण वल्ल हो अग्गी ॥ “

अर्थ: “ज्याच्या वाचून जीवन जगताच येत नाही त्याने अपराध केला तरी उलट त्याचीच मनधरणी करावी लागते. आगीमुळे गाव जळून खाक झाल्यास कधी कुणाला अप्रिय होईल काय?”

५) प्राकृत प्रकाश: वररुचिने इसवी सन पूर्व २५० च्या सुमारास  ‘प्राकृत प्रकाश’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात चार मुख्य प्राकृत भाषेचे वर्णन आहे- १) महाराष्ट्र, २) शौरसेनी, ३) मागधी, ४) पैशाची.

६) समरादित्याची कथा : इ.स. ८०० च्या सुमारास हरिभद्र यांनी समरादित्याची कथा हा मौल्यवान ग्रंथ लिहिला. यात जादुई वास्तववाद हे निवेदनतंत्र वापरण्यात आले होते.

७) कुवलयमाला : उद्योत्तनसुरी यांनी इ.स. ७८० च्या सुमारास कुवलयमाला हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात अनेक भाषांचा उल्लेख असून त्यात मरहट्ट असे वर्णन आले आहे.

“दडमडह समलंगे सहीरे अहिमान कलहसीलेय।
दिण्णले गहिल्ले उल्लवीरे तथ मरहठ्ठे॥”

अर्थ: बळकट, ठेंगण्या, धटमूट, काळ्यासावळ्या रंगाच्या काटक अभिमाने भांडखोर सहनशील, कलहशील दिण्णले (दिले) गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मरहठ्यास त्याने पाहिले हे वर्णन मराठी माणसाचे आहे.

८) गुणाढ्याची बृहतकथा : ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ इसवी सनच्या पहिल्या शतकात लिहिण्यात आला. सातवाहन घराण्यातील हाल सातवाहन राजाच्या कारकिर्दीमध्ये या ग्रंथाची निर्मिती झाली.या ग्रंथात श्रेष्ठ दर्जाचे मराठी काव्य आहे. गाथा सप्तशती हा ग्रंथ प्राकृतातील आद्यग्रंथ असून त्यात ७०० गाथांचे संकलन आहे. या ग्रंथाचे  कर्ते अनेक स्त्री-पुरुष आहेत. (पन्नास पुरुष व सात स्त्रिया)’महाराष्ट्र प्राकृत अपभ्रंशाच्या माध्यमाने मराठी भाषा परिणत झालेली असल्याने मराठीच्या उद्‌गम विकासात या गाथेचे अपूर्व महत्त्व आहे. ग्रंथात मराठी ठसा व मुद्रेचे अनेक शब्द आहेत’ (देवीसिंग चौहान-उद्धृत -वसंत आबाजी डहाके- मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती- पॉप्युलर प्रकाशन मुंबई २००५ पृष्ठ क्रमांक २९)

९) अरे मराठी : डॉ. श्री. रं. कुलकर्णी यांनी तेलंगणातील ‘अरे मराठी समाज -भाषा आणि संस्कृती’ ह्या ग्रंथात वरंगल आणि करीमनगर या भागात राहणाऱ्या अरे मराठी समाजाची वसाहत ही मराठी स्थलांतरित लोकांची वसाहत आहे, असे संशोधन मांडले होते.

या संशोधनातील दोन निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत – अरे बोली अपभ्रंश भाषेची उत्तरकालीन अवस्था दर्शवते तर यादवकालीन वाङ्मयीन मराठी ही अपभ्रंशाची उत्क्रांत अवस्था आहे. अरे बोली ही महाराष्ट्र अपभ्रंशाची बोली मानली तरी ते अशास्त्रीय ठरणार नाही.

१०) ओवी, अभंग आणि धवळे: सोमेश्वराने लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ हा ग्रंथ शके १०५१ (इ.स. ११२९) मध्ये लिहिला. त्यात त्याने महाराष्ट्रीय स्त्रिया कांडत असताना ओव्या म्हणतात असा उल्लेख केला.ओवी हा एक छंद आहे आणि त्याचे नाते अपभ्रंशातील षटपदीशी जुळते. देशीभाषेतील ध्येय असलेला छंद त्याकाळी लोकप्रिय असावा असा कयास करता येतो. पुढे संत ज्ञानेश्वरांनी ओवी हा छंद आपल्या निरूपणासाठी निवडला. यादव काळातील अनेक कवींनी ओवी हा छंद प्रकार आपल्या लेखनासाठी निवडलेला दिसतो.

‘धवळे’हा सुद्धा ओवी सदृश्य वाङ्मयप्रकार आहे. महात्मा चक्रधर स्वामींची शिष्य महादंबाने वर विषयक गीते म्हणजेच धवळ्यांची रचना केलेली दिसते.

अभंग हाही ओवीचाच एक प्रकार आहे. यादवकालीन अभंग हा ओवीसारखाच होता. अभंगात ताल महत्त्वाचा असतो त्यानंतर अभंगकर्त्याची नाममुद्रा असा अभंगाचा प्रवास आपल्याला सांगता येतो.

११) गोंधळ आणि लावणी : देवीच्या उपासनेत गोंधळाला खूप महत्त्व असते. या लोकवाङ्मयप्रकाराचे उगमस्थान कल्याण असावे असे रामचंद्र चिंतामण ढेरे यांना वाटते. कल्याणीचा राजा सोमेश्वर याने आपल्या राजधानीत भूतमातृमहोत्सवाच्या निमित्ताने गोंडली नृत्य करविले’ हेच आज महाराष्ट्रात गोंधळाच्या रूपाने पहावयास मिळते.

मराठी भाषेचे वैभव मध्ययुगीन काळातील या समृद्ध वाङ्मयात पाहावयास मिळते. आपल्या भाषेची अभिजातता समजून घ्यायची असेल तर या ग्रंथांचा आपल्याला परिचय झाला पाहिजे या ग्रंथातील ज्ञानाची समृद्धता जाणून घेतली पाहिजे.

अभिजात भाषेचे निकष कोणते?

संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे लागते ,त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे लागते, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असला पाहिजे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading