अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर
हंबरमधील दहाही कथा वाचताना, गावगाड्यातील ग्रामीण आणि कृषी जीवनाबरोबर, लोकांच्या परिस्थितीचा, हतबलतेचा असहाय्यतेचा, नियतीशरणतेचा आणि परिस्थिती शरणतेचा अनुभव वाचकाला येतो. कथा वाचताना वाचक त्यात गुंतून अंतर्मुख तर होतोच पण भयाण समाज वास्तव पाहून तो विचारप्रवणही होतो.
प्रा. डॉ. श्रीकांत पाटील
कथा हा लोकप्रिय साहित्यप्रकार आहे. आबालवृद्धांच्या मनावर मोहिनी घालणारा आणि रसिक वाचकांना खिळवून ठेवणारा तर कधी कथनातून थेट वाचकांच्या हृदयाला भिडणारा असा हा साहित्य कला प्रकार आहे. सन १९६० नंतर मराठी साहित्यात ग्रामीण आणि दलित साहित्य असे प्रवाह उदयाला आले. आपल्या परिसरातील, गावातील, शेतीमातीतील, तळागाळातील माणसांचे, त्यांच्या व्यथा वेदनांचे चित्रण विविध साहित्य प्रकारातून प्रतिबिंबित होऊ लागले. तर दलित साहित्यातून वेदना, विद्रोह, आणि नकाराचा आविष्कार होऊ लागला. याला कथा साहित्यप्रकारही अपवाद नव्हता. साठोत्तरी मराठी ग्रामीण कथेत शंकर पाटील, आनंद यादव, रा. रं. बोराडे, जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, द. ता. भोसले, चारुता सागर, भास्कर चंदनशिव, रंगराव पाटील यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांचेच बोट धरून ग्रामीण जीवनातील प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, मने, नमुने यांचे चित्रण आज नवी लेखक पिढी करू लागली आहे. यामध्ये आपणास हरिश्चंद्र पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. संस्कारफुले हा लघुकथा संग्रह तर शिरवाळ हा कथासंग्रह लिहून त्यांनी कथालेखन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. बांधेसूद कथानक, वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली आणि अस्सल ग्रामीण भाषा यामुळे ते अनेक साहित्य पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
आपण ज्या परिसरात राहतो, त्या परिसराचा तेथील निसर्गाचा, माणसांच्या जीवनपद्धतीचा, सण-संस्कारांचा, चालीरीतींचा, रिती-भातींचा परिणाम माणसाच्या मनावर आणि जडणघडणीवर होत असतो. कवी लेखकही त्याला अपवाद नाहीत. आपल्याच सभोवारच्या सामाजिक पर्यावरणातील घटना, प्रसंग, पात्रे, बोली यांचा अवलंब करून हरिश्चंद्र पाटील यांनी आपली कथा अस्सल ग्रामीण बाज असणारी आणि मातीशी नातं सांगणारी साक्ष शिरवाळ मधून दिली. त्याहून अधिकच साहित्यमूल्यांचा कित्ता त्यांनी हंबर या कथासंग्रहातून गिरवला आहे.
तीन अक्षरांची शीर्षकं असणाऱ्या हंबरमधील दहाही कथा वाचताना, गावगाड्यातील ग्रामीण आणि कृषी जीवनाबरोबर, लोकांच्या परिस्थितीचा, हतबलतेचा असहाय्यतेचा, नियतीशरणतेचा आणि परिस्थिती शरणतेचा अनुभव वाचकाला येतो. कथा वाचताना वाचक त्यात गुंतून अंतर्मुख तर होतोच पण भयाण समाज वास्तव पाहून तो विचारप्रवणही होतो. माणसाला गंभीर विचार करायला लावण्याचे सामर्थ्य हंबरमधील कथांमध्ये असल्याचे दिसून येते.
अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या पारधी जमातीतील झिंगऱ्या आणि त्याची चांदणी गाय व घरधनीन साखरी तसेच मुलगा ताल्या यांचे दुःख काकूळ मध्ये आले असून ही कथा वाचकाला विचारप्रवणातून गंभीर बनवते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली आणि दु:खान्त शेवट असलेली हंबर ही कथा आहे. येसूची करूण कहाणीच ही कथा मांडते. परिस्थितीशरण माणसाला कसे ओरबाडले जाते, नियतीही त्याचा सूड घेते अशा दुहेरी कात्रीत सापडलेली येसू अंतिम दु:ख भोगते. प्रचलित समाज व्यवस्थेचे भयाण, विदारक वास्तव ही कथा चित्रीत करते.
आज लोकसंख्या वाढीमुळे वहिवाटीच्या शेतीचे तुकडे पडत असून शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. त्यातही तो जर खुल्या प्रवर्गातला असला तर त्याच्या पोरांना सवलतीही मिळत नाहीत. याचे सोस भोगणारे कैलास आणि चिंगी आपणास वाळीत या कथेत भेटतात. मास्तर कथेतला पांडू मास्तर विभक्त कुटुंब पद्धतीचा बळी ठरतो. तो घराला समृद्धी देतो, ऐश्वर्य बहाल करतो पण अखेरीला नव्या पिढीतील विचार बदलामुळे वृद्धाश्रमात त्याची होणारी रवानगी कुटुंब व्यवस्थेतील मूल्यांच्या घसरणीवर बोट ठेवते. याउलट बाप आपल्या मुलाला संपत्तीतून बेवारस करतो असे कथानक असणारी वारस कथा तरूण पिढीच्या मूल्यांची घसरणच दाखवून देते.
माणसाने शेती मातीशी इमान ठेवून काळ्या आईची सेवा केली पाहिजे. पण हीच जमीन जर विकली तर माणूस बेदखल होतो. त्याची अतिशय वाईट अवस्था होते. तो उपरा बनतो. याचा उहापोह १९६० या कथेत आलेला आहे., अज्ञान, अंधश्रद्धा आणि भयानक रोग माणसाला अवनतीकडे नेतात. एड्स सारख्या रोगाने व्यक्ती जीवनाबरोबर त्याचे कुटुंबही उध्वस्त होते. याचे चित्रण नशिब या कथेत तर सार्थक लागीर आणि झणाटा या ही कथा अंधश्रध्देचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडवतात. त्यातल्या कथानकामुळे आणि मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
आज आपण लौकीक अर्थाने २१ व्या शतकात पदार्पण केले आहे. माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नेत्रदीपक प्रगती केली आहे. पण माणसाची नैतिक, सामाजिक व कौटुंबिक अधोगती झाली आहे त्याचे काय? हा अनुत्तरीत प्रश्न या सर्व कथांच्या मुळाशी आहे. आजही अनेक गावातून मूलभूत सुविधांची वानवा आहे. अज्ञान, अंधश्रद्धा समाजात खोल तळीबुडी रुजल्या असून त्या समाजाच्या प्रगतीस मारक आहेत. पण गोरगरीब भोळ्या- भाबड्या लोकांना कसे समजवायचे? हा प्रश्न ज्वलंत आहे. आजही ते अंधश्रद्धेचे बळी ठरत आहे. आजची तरुणाई बेधुंद झाली असून त्यांच्या ठायी अनाचार, दुराचार, व्यभिचारासारखे गंभीर प्रश्न समाजात आवासून उभे राहिले आहेत. एडस सारख्या रोगावर औषध नाही. हे माहीत असूनही बेताल वागणारी तरुणाई कुसंस्कारामुळे एड्सची बळी ठरते आहे. थोरा-मोठ्यांना कुटुंबात, समाजात आदराचे स्थान नाही. याउलट वृद्धाश्रमांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. अशा प्रश्नांवर समाजाच्या मर्मावर आणि वर्मावर बोट ठेवण्याचे काम कथाकाराने आपल्या लेखणीने अफलातून केलेले आहे.
जीवनातील प्रचलित सामाजिक प्रश्नांचा वास्तवदर्शी आविष्कार हंबर मधील कथांमधून झाल्याचे दिसून येते. नेटके व बांधेसूद कथानक, वैशिष्ट्यपूर्ण साहित्य भाषाशैली, घटना-घडामोडी, पात्रे आणि चपखल संवाद यांची सुंदर सांगड, बोली भाषेचा प्रभावी वापर, आकलन सुलभ अलंकारिक भाषा, नव्या म्हणी, नवे वाक्यप्रचार, नवी विशेषणे, नवे शब्द वापरले आहेत. हे यापूर्वी कुठेही वाचायला मिळाले नाहीत. ते लेखकाने स्वतः तयार केलेले आहेत. ही हंबर कथासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
पुस्तकाचे नाव – हंबर (कथासंग्रह)
लेखक – हरिश्चंद्र पाटील टेंभुर्णी
प्रकाशक – शब्दशिवार प्रकाशन मंगळवेढा, जि. सोलापूर मोबाईल – ९४२३०६०११२
मूल्य – १८०/