February 12, 2025
Science should be used for good work article by rajendra ghorpade
Home » शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी व्हावा
विश्वाचे आर्त

शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी व्हावा

शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी केला तर समाजात अनेक सुधारणा होऊ शकतील. समाजात सुख, शांती नांदेल. गैर फायदा उठविण्याचा विचार केला तर समाजात अशांतता पसरेल. ज्योतिष शास्त्राबाबतही नेमके हेच घडले. या शास्त्राचा काही स्वार्थी व्यक्तींकडून दुरुपयोग केला गेला. अशाने हे शास्त्र थोतांड वाटू लागले.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

कर्मकांड तरी जाणें । मुखोद्त पुराणें ।
ज्योतिषी तो म्हणे । तैसेचि होय ।। 828 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – तो सर्व कर्मकांड जाणतो. पुराणे त्याला तोंडपाठ आहेत. आणि जो ज्योतिषशास्त्रांत इतका निष्णात आहे की, तो भविष्य करील तसेच घडते.

आत्मज्ञानी संतांना शिष्याची कुंडली तोंडपाठ असते. अंतर्ज्ञानाने त्यांना याचे ज्ञान असते. ज्योतिषी अंतर्ज्ञानी असतोच असे नाही. त्यामुळे पुस्तकी, पंडिती ज्ञानावर त्याचे भाष्य असते. पंचागाच्या आधारे तो कुंडली तयार करतो. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. पण हे शास्त्र पूर्वीच्याकाळी विकसित कसे झाले. ग्रहांचा शोध, पृथ्वी गोल आहे. याचा शोध तर अलीकडच्या काळात लागला आहे. मग त्याकाळात हे ग्रह कसे काय माहीत होते? आत्मज्ञानी संतांनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने हे सर्व शोध लावले. त्यातूनच हे शास्त्र विकसित झाले.

हाताची पाचही बोटे सारखे नसतात. तसे समाजामध्ये सर्वजण सारखे नसतात. काही चांगले तर काही वाईट विचारांचे असतात. काही दुष्टवृत्तीचे असतात. अशा व्यक्तींच्या विचारातून मग या शास्त्राचा दुरुपयोग झाला. तसे सर्वच शास्त्राचा गैरफायदा उठविणाऱ्या व्यक्ती प्रत्येक समाजामध्ये असतात. अणूचा उपयोग ऊर्जेसाठी करता येतो. पण त्यापासून अणूबाँबही तयार केला जातो. काही विध्वंसक व्यक्ती याचा गैरफायदा उठवितात. दहशतवाद माजविण्यासाठी स्फोट घडवितात.

शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी केला तर समाजात अनेक सुधारणा होऊ शकतील. समाजात सुख, शांती नांदेल. गैर फायदा उठविण्याचा विचार केला तर समाजात अशांतता पसरेल. ज्योतिष शास्त्राबाबतही नेमके हेच घडले. या शास्त्राचा काही स्वार्थी व्यक्तींकडून दुरुपयोग केला गेला. अशाने हे शास्त्र थोतांड वाटू लागले. यामध्ये आता जादूटोणा, कर्मकांडे शिरली आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठविणारे या समाजात अनेकजण आहेत. यावर कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही, हेही तितकेच खरे आहे. प्रबोधनाचा हा मार्ग आहे. संतांनी याबाबत जनजागृती केली.

कायद्याने शिक्षा केली जाऊ शकते. यावर धाक बसविला जाईल, पण मूळ समस्या सुटणार नाही. जादूटोणा, कर्मकांडे याबाबत प्रबोधन केल्यास या मार्गाकडे कोणी वळणार नाही. मुळात जनता अशा गोष्टी वळलीच नाही, तर गुन्हे घडणारच नाहीत. समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्याऐवजी गुन्हे घडणार नाहीत यावर अधिक भर द्यायला हवा. तरच समाजात सुखशांती नांदेल. गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन घाव घालायला हवा. तरच हे प्रश्न सुटणार आहेत. संतांनी हेच केले. समाज जागृत केला. सध्या ही जागृतीची प्रक्रियाच दूषित झाली आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रबोधनसुद्धा योग्य प्रकारे व्हायला हवे.

आत्मज्ञानी झाल्यानंतर या शास्त्राचा गैरफायदा घेऊ लागल्यास ते शास्त्र दुषित होते. यामुळे आज अनेक बुयेण्वा, भोंदू समाजात दिसून येत आहेत. यासाठी अध्यात्म शास्त्राचाही योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. समाजात शांती, सुखी समाधान नांदण्यासाठी हे शास्त्र आहे याचे भान असायला हवे. आत्मज्ञानी संतांनी हेच कार्य केले म्हणून ते महान झाले. ही महानता येण्यासाठी या शास्त्राचा, या ज्ञानाचा योग्य वापर करून संजिवन समाधी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading