गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने व्यापला आहे.
– गिता खुळे
कोल्हापूर निसर्ग संपन्न जिल्हा. अनेक पौराणिक मंदिरे आणि गडकिल्ल्यांचा वारसा या जिल्ह्याला लाभला आहे. त्यातील आपल्या नावाने आपल्या तालुक्याची ओळख बनलेला गड म्हणजे भुदरगड होय. या गडाच्या बांधणीचे श्रेय दुसरा राजा भोज यांना जाते. सन १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीच्या ताब्यातून पुन्हा एकदा भुदरगड जिंकून स्वराज्यात आणला आणि त्यावर एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले.
कोल्हापूरपासून गारगोटी ५३ किलोमीटर आणि तिथून १२ किलोमीटरवर भुदरगड वसलेला आहे. याआधी तालुक्याचा संपूर्ण मुलकी व्यवहार भुदरगडावरून पाहिला जात होता. या गडाचे क्षेत्रफळ 167 एकर असून तटबंदीची लांबी अंदाजे साडेचार किलोमीटर इतकी आहे. गडावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, आंबामाता आणि जखुबाई अशी देवस्थाने असून राजसदर, समाध्या आणि अनेक वैशिष्ट्य जपणारी अखंड तटबंदी ही आहे.
पण, याशिवाय गडाला वेगळी ओळख देणारे आणि आणि गडाचे वैभव असणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दूधसागर तलाव.. गडाच्या मध्यावर असणाऱ्या या तलावाजवळ जाण्यासाठी बांधीव रस्ता बांधला आहे. सुमारे २० एकर परिसर या तलावाने व्यापला असून कदाचितच इतका मोठा तलाव कुठल्या गिरीदुर्गावर असावा. दुपारच्या वेळी तलाव पाहताना उन्हामुळे पाण्यात चांदण्या विखुरल्याचा भास होतो. या तलावात असणाऱ्या मातीच्या गुणधर्मामुळे याचे पाणी पांढरे दुधट रंगाचे झाले असून त्यास दुधसागर किंवा पांढऱ्या पाण्याचा तलाव म्हणून ओळखले जाते. सूर्यास्तावेळी हेच अवखळ पाणी शांत होऊन जातं. त्यावेळी तलावा शेजारी बसण्याचा मोह मनाला आवरता येत नाही. पाण्यात हलकेच उठणारे तरंग, इथलं शांत वातावरण, गोठवणारा वारा, पक्ष्यांचे आवाज आणि आभाळात सांडलेले विविध रंग ही खरंतर गडप्रेमी साठी पर्वणीच ठरते.
अन्य छायाचित्रे –
http://instagram.com/durg_kanya
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.