इचलकरंजी – येथील आपटे वाचन मंदिर आणि १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मृती जपणाऱ्या इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतींना गौरविण्यात येते. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांची स्मृती जपणारे हे पुरस्कार आहेत. यंदा पुरस्काराचे २६ वे वर्ष आहे.
महाराष्ट्राच्या साहित्य जगतात आपटे वाचन मंदिराच्या साहित्यकृती पुरस्काराने वेगळी ओळख निर्माण केली असून गेल्या दोन तपाच्या वाटचालीत अनेक प्रतिथयश साहित्यिक, लेखक, कवी, समिक्षक, पत्रकार वगैरे नामवंत मान्यवरांनी नीरक्षीर विवेकाने व निःपक्षपातीपणाने परीक्षण केले आहे. दरवर्षी मराठीतील साहित्यिक व प्रकाशक या पुरस्कारांसाठी भरभरून प्रतिसाद देत आहेत.
यंदाच्यावर्षी उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार योजनेमध्ये इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी रु. १०००० /- व गौरव पत्र तसेच वसंतराव दातार व सुलभा मगदूम यांच्या स्मरणार्थ दोन लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कारासाठी प्रत्येकी रु.४०००/- व गौरव पत्र देण्यात येणार आहे.
मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कारासाठी इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने उत्कृष्ट गद्य साहित्यकृतीसाठी रु. १०००० /- व गौरव पत्र तर दोन लक्षणीय गद्य साहित्यकृतींसाठी प्रत्येकी रु. ४००० /- व गौरव पत्र देण्यात येणार आहे.
सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कारासाठी रु. १००००/- व गौरव पत्र. तर विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी रु.१००००/- व गौरव पत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. भारतीय लेखकाच्या अन्य भाषेतील साहित्याच्या मराठी भाषेतील अनुवादासाठी महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार रु.१००००/- व गौरव पत्र देण्यात येणार आहे.
सौ. वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर यांचे स्मरणार्थ उत्कृष्ट ललित गद्य पुरस्कारासाठी रु. १००००/- व गौरव पत्र व पार्वतीबाई शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कारासाठी रु.६०००/- व गौरव पत्र देण्यात येणार आहे.
रागिणी दादासो जगदाळे स्मरणार्थ ३० वर्षे व त्याच्या आतील वय असणाऱ्या लेखकाच्या प्रथम प्रकाशित पुस्तकासाठी युवा पद्मरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी रु.५०००/- व गौरव पत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन मराठी साहित्यकृतीच्या (प्रथम आवृत्ती) या सर्व पुरस्कारासाठी पाठविण्यात याव्यात. कवी, लेखकाने किंवा प्रकाशकानी पुस्तकांच्या प्रत्येकी २ (दोन) प्रती कार्यवाह, आपटे वाचन मंदिर, राजवाडा चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर. – ४१६११५ या पत्त्यावर २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९१७५६३६२५७ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
