ग्राम देशासी पोषक
मूल्यात्मक समाज निर्मितीसाठी आणि प्रत्येकाला जीवनाचा ऐहिक आनंद उपभोगण्यासाठी ग्रामगीतामय व्यवस्था गावोगावी होणे काळाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड आणि घाटकुळ या गावांनी आपल्या सामुदायिक श्रमदान सेवाकार्याचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव, पर्यावरण पुरक समृद्ध गाव म्हणून या गावानी अनेक यश मिळविले आहे.
बंडोपंत बोढेकर
शिवाजीनगर चंद्रपूर
9975321682
brb.rastra@gmail.com
थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता या ग्रंथात लिहितात,
‘ विश्वाचा मुळ घटक गाव । ग्रामगीता त्यासाठी ।।’
कुठलेही गाव म्हणजे केवळ दगड, विटांनी बांधलेल्या घरांचा समुह नव्हे तर गावात राहणारी मानवी समाज, त्यांचा एकमेकांशी होणारा सुखसंवाद , तेथील एकंदरीत ग्रामसंस्कृती होय. सामुहिक कल्याणासाठी अर्थात ग्रामाच्या उत्थानासाठी योग्य ती पावले विचारपूर्वक सामुदायिक पध्दतीने उचलली गेली पाहिजेत , ही ग्रामगीता ग्रंथाची अपेक्षा आहे. वं. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाची महत्त्वाची सूत्रे ग्रामगीता ग्रंथात पानोपानी लिहून ठेवलेली आहे. वाचकांनी ती वाचून त्यानुसार कृती करावी , याबाबत ते लिहितात ,
” परि ऐसी नसावी भावना । अर्थहिन करीता पारायणा ।
ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ।।
आयुष्यभर नुसत्या पोथ्या वाचणारे आणि केवळ पारायणाचीच मानसिकता बाळगणा-या पंडीताकडून ग्रामसुधारणेचे कार्य होणे शक्य नाही. समुदायासाठी पुण्यकार्य करू इच्छिणाऱ्या मंडळींनी नव्या दृष्टीसह ग्रामगीतेनुसार कृती करावी.
” प्रथम हीच महत्वाची खुण । ग्रंथवाचनाचे कळावे ज्ञान ।
आपुले वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ।।
ग्रंथातील शब्दांचा नीट अर्थ समजून घ्यावा आणि त्या शब्दांचा अर्थ इतरांनाही समजावून द्यावा . प्रसंगी बोलीभाषेचा उपयोग करुन साध्या शब्दात आपल्या मित्रमंडळींना पटेल अशा स्वरुपात समजावून देण्याचा यथाशक्ति प्रयत्न करावा.
मराठीचा आद्यकवी मुकुंदराज यांनी ” विवेकसिंधू ” या ग्रंथाची रचना शके १११० मध्ये अंभोरा ( ता.कुही जि.नागपूर ) या श्रीक्षेत्री केली. हा ग्रंथ प्रादेशिक व प्राकृत भाषेत आहे. ओवीबध्द असलेला हा ग्रंथ पुर्णत: आध्यात्मिक असून त्यात अनेक झाडी बोलीशब्द आलेले आहे. या संदर्भातील आख्यायिका अशी आहे की,त्याच काळात बैतुल जवळ खेडला येथे जयत्पाळ राजा राज्य करीत होता. तो चिकीत्सक होता , तेव्हा त्यांनी अनेक विद्वानांना ब्रम्ह दाखविण्याची आज्ञा केली. परंतु त्यांना ब्रम्ह कुणीही दाखवू शकले नाही . शेवटी आद्यकवी मुकुंदराजांनी विवेकसिंधू च्या माध्यमातून ब्रम्हज्ञानाची माहिती देऊन शंका समाधान केले. एकदंरीत ग्रंथाद्वारे मुकुंदराजानी राजा जयत्पाळांचा उद्धार केला , असा उल्लेख ग्रामगीता ग्रंथात दिसून येतो.
” वाचतानाचि बोध होतो ।अंगी स्फुरणभाव उठतो ।
कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरी ।।”
वाचतांना अर्थ कळणे सर्वाधिक महत्वाचे आहे . त्या आधारेच आपल्या चिंतनाची दिशा ही निश्चित होत असते.
” काहे को हरदम बाचत पोथी , क्या सीखा पोथी मॉही !
काम क्रोध मे फॅसा दिवाने, तनउमरी सारी खोई !
चंचल मन तो निसदिन भटके , स्थीर जरा कीन्हा नाही ! ,
कर्मकांड में उमर गुजारी , पत्थर हो बैठा ताही !”
ग्रंथातील शब्दांमध्ये दडलेली विचारशक्ती ही वाचकांच्या एकूणच कौशल्यावर अवलंबून असते. आणि म्हणुन प्रत्येक शब्द वाचतांना त्याचा अर्थ समोरच्या श्रोत्यांपर्यंत तेवढ्याच सक्षमतेने पोहचेल याची दक्षता घेणे ,अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय वाचक आणि श्रोता याचा संवाद होणे कठीण आहे.
” त्या सर्वातूनि शोधुन घ्यावे । जे तात्वीक बोध ग्रंथस्वभावे ।
कर्मठतेच्या भरी न भरावे । अथवा शुष्क पांडित्याच्या ” ।।
हेच ओळखुन वं. महाराजांनी प्रत्येक वाचकांची कर्तव्य आणि कार्ययोजना स्पष्ट सांगीतलेल्या आहेत . विशेष म्हणजे सामाजिक परिवर्तन संदर्भात तर या दृष्टीने खुपच काळजी घेण्याची गरज आहे.
केवळ एक परंपरा म्हणून ग्रंथाचे वाचन योग्य नव्हे . या संदर्भात राष्ट्रसंत लिहीतात –
” वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यावरि परिणाम करील ।”
जी व्यक्ती आचारशुन्य आहे आणि केवळ विचार सांगतो आहे. त्याच्या संदर्भात समाजात चांगल्या भावना निर्माण होणे अशक्य आहे. ग्रंथ वाचन म्हणजे मौखीक कसरत करणारे आणि त्या उलट घरी वागणारे महाभाग हे जनतेचे शत्रुच होत.
वं. राष्ट्रसंत आचारशिलतेचे महत्व स्पष्ट करतांना या अध्यायात पुढील उदाहरणे देऊन समजवितात की , धन संग्रह करणारा धनवान असेल आणि धनाचे दान न करणारा असेल तर तो उदारदाता कसा ? तहानेने व्याकुळ झालेल्यांना साधे पाणी न देणाऱ्या स्त्रीला दानशुर म्हणता येईल काय ? . सार्वजनीक कार्यक्रमात पान, तंबाखू खाऊन येणे आणि व्यसने सोडा असा उपदेश केल्यास तेथील श्रोते हसणार नाही काय ? .
भोजनाप्रसंगी शांतीपाठ म्हणणे आणि भोजन वाढण्यास उशिर झाला म्हणुन पंडीताने बायकोला मारणे , तो खरा पंडीत असेल काय ? म्हणून वाचक , उपदेशक हा आचारशिल असावा अशी अपेक्षा वं. राष्ट्रसंत करतात .
“ऐसे न व्हावे आता तरी . असोत वाचक वक्ते , शिक्षक भारी ।
आहे सर्वावारीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ।।”
वाचक हा जागृत असावा . ग्रंथ वाचतांना कुठे थांबावे , कुठे जोर देऊन वाचावे आणि गंभीर वातावरण उभे करावे याचे ज्ञान वाचकांस असायला हवे. जेणेकरुन विषय समजावून देण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होईल .मूल्यात्मक समाज निर्मितीसाठी आणि प्रत्येकाला जीवनाचा ऐहिक आनंद उपभोगण्यासाठी ग्रामगीतामय व्यवस्था गावोगावी होणे काळाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड आणि घाटकुळ या गावांनी आपल्या सामुदायिक श्रमदान सेवाकार्याचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव, पर्यावरण पुरक समृद्ध गाव म्हणून या गावानी अनेक यश मिळविले आहे.
सर्वास असावा संतोष !
दुःख न व्हावे प्राणी मात्रास ! याचा सक्रिय कराया अभ्यास ! धर्म निती बोलली !! .
याकरिता श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या निष्ठावान सेवकांनी, समाजातील साहित्य सेवकांनी तसे प्रेरक लेखन करणे गरजेचे आहे. ग्रामगीता ग्रंथापासून प्रेरणा घेऊन
‘गाव रामायण ‘ नामक कथा गीत संग्रह गडचिरोली येथील डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी लिहुन काढला आहे.
कुठल्याही कवीचे काव्य म्हणजे त्यांच्या मनात आलेले विचार,जीवनात घेतलेली अनुभूती याचे कमीतकमी शब्दात प्रभावीपणे कागदावर प्रगटीकरण . अनेक कवी आपापल्या क्षमतेनुसार कविता करून त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाचा लिहिण्याची लेखनशैली ही वेगवेगळी असते. कवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांचा “गाव रामायण” कथागीत संग्रह असून यात कथानक आणि काव्य यांचे मिश्रण. यातील लेखन ग्रामीण जीवनाची नाडी ओळखणारे असून त्यात गाव विकासाचे,गावाच्या आरोग्याचे हीत जोपासले गेले आहे.लोकांना स्वच्छतेचा मंत्र देत , राष्ट्रसंतांच्या विचारांवर चालणारा “गाव रामायण” हा त्यांचा प्रभावी काव्यप्रकार वाटतो .हा संग्रह वाचतांना आपल्याला गदिमांच्या गीत रामायणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
गावातील अतिशय घाणेरडी जागा,म्हणजे गावालगतची “गोदरी”. गोदरी गावी असणे म्हणजे कारण गावातील लोकांची सामाजिक , आर्थिक,मानसिक स्थिती उत्तम नसने .
“संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान” हे शासनाच्या वतीने राबविले गेले होते. त्या काळात त्यांनी जलस्वराज्य प्रकल्पात डॉ. लेनगुरे यांनी आरोग्य व स्वच्छता तज्ञ म्हणून काम केल्याने ग्राम जीवनाच्या समस्येंशी,तेथील कर्मचारी,शिक्षक,मुख्याध्यापक,अधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामसभा या सर्वांशी ते जवळून परिचित होते.त्यामुळे त्यांच्या या संग्रहात विविध मानवी पात्रांची विश्लेषणात्मक, उद्बोधक,प्रतिकात्मक अशा स्वभावचित्रणाची सर्वत्र रेलचेल दिसून येते. या सर्वांचा त्यांना आलेला चांगला – वांगला अनुभव शब्दबध्द करून ते विनोदी शैलीत निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहे.
या संग्रहात वराहपूर नावाच्या गावची काल्पनिक कथा दीर्घ काव्यरूपात गुंफलेली आहे.यातील ५० ही कविता एकमेकांशी संबंधीत आहेत.काव्यकथा पूर्ण वाचल्यानंतर गाव हे “कोण होतास तू ,काय झालास तू” असे मुखातून सहज उद्गार निघाल्याशिवाय राहात नाही.स्त्री शक्ती एकवटली म्हणजे वंगाळ गाव पलटून त्याचे बक्षिसपात्र गावात रूपांतर होऊ शकते, ह्याचे चित्रण काव्यरूपात त्यांनी उभे केले आहे.
जे आपल्या मनाला सतत आनंदाच्या गुदगुल्या करतात. आणि वाचतांनी आपणही या कथेचे कोणतेतरी पात्र आहे, असे जाणवते.
गोदरीतील स्त्रीची भावना व्यक्त करताना कवी म्हणतो… ,
हागणदारीच्या पटांगणी
धनी जोखीम रे मोठी
हिच्या परीस बरी
आहे वेश्येची कोठी
वेश्येच्या कोठीत जे काही चालते ते चार भिंतींच्या आत चालते. पण गोदरीत स्त्रियांना सर्वांसमक्ष उघड्यावर बसावे लागते.त्यामुळे कवीला गोदरी ही वेश्येच्या कोठीपेक्षा भयानक वाटून या समस्येला संग्रहाच्या रूपात वाचा फोडून गावात शौचालय बांधा रे,असे सतत ओरडून सांगत आहेत..
शौचालय बांधण्यासाठी …
‘आतल्या गाठीतील काढा धन
आसू आले तरी झाका नयन’
प्रत्येक स्त्री पै पै साठवून काही ना काही बचत करीत असते. यास आपण “खमोरा” म्हणतो. हा खमोरा जमा करण्याची प्रथा ग्रामीण स्त्रियांमध्ये आहे. तो बाहेर काढून शौचालय बांधण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा ते उपायही सांगतात.गाव
गोदरीमुक्त करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चारही प्रकाराचा उपयोग करावा लागतो, त्याचे यथार्थ वर्णन गाव रामायणात केलेले आहे.
गावातील सरपंचाला “देवाच गाव” गोदरी मुक्त नसल्याची खंत असते. कारण शेजारचे राजगड हे मुक्त झाले आहे.तेव्हा सरपंचाच्या भावना कवी शब्दात व्यक्त करतो…
‘आज कां जीव माझा रडे?
बघ शेजारी निर्मल गाव गडे’
स्त्रिया एका सुरात गाव गोदरीमुक्तीचा ठराव घ्यायला गावलोकांना भाग पाडतात. हा ठराव पारीत झाल्यानंतर त्या एवढ्या आनंदीत होतात कि,लाखो मैल दूर असलेला सुर्यदेव सुध्दा यामुळे खुष झाल्याचा त्यांना भास होतो.या प्रसंगी त्या आनंदाने फुगड्या खेळून गातात….
स्त्री शक्ती पाहून,
आज सुर्य हासला
ठराव जाहला ग
सखे ठराव जाहला
शौचालयात समरस होण्यासाठी कवी छोट्या बालकांना शौचालयाची कट्टी न धरता गट्टी जमविण्याचा, तेथेच मन रमविण्याचा आपल्या शैलीत सल्ला देतानीच तो वापरासंबधी शपथ घ्यायला भाग पाडतात.
ग्रामगीतेतील ग्राम आरोग्य या अध्यायातील स्वच्छता मोहीमेचा विचार मोठ्या शिताफिने कवी डॉ.लेनगुरे यांनी रंगवत नेलेला आहे. प्रथम प्रसंगाची कथा सांगून नंतर त्या अनुरूप लगेच गीत सादर करणे. इथे कवीच्या प्रतिभेची उत्तुंगता,भरारी दिसून येते. गाव रामायणाचे इंद्रधनूष्य त्यानी लिलया पेललेले दिसून येते.
राष्ट्रसंतांच्या कल्पनेतील “स्वच्छ गाव” ही संकल्पना साकार होण्यासाठी या कथा गीत संग्रहाचा उत्तम वापर होऊ शकतो.जे सर्वांसाठी प्रबोधनात्मक, प्रेरक अशी सुंदर कलाकृती आहे. कलापथकांनी या काव्याचे मंचीय सादरीकरण केल्यास हे काव्य ग्रामस्वच्छतेचा विचार समजावून देण्यात सहाय्यक ठरेल.
मनुष्य ग्रामाचा संरक्षक ! ग्राम देशासी पोषक !!
यासाठी तसे लेखन आणि कृती सातत्याने झाली पाहिजे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.