चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटते. पण रंग जरी गोरा असला तरी काळे डाग आपले सौंदर्य हिरावून घेतात. यावर उपाय काय ? महागड्या रसायनांचा मारा करून तात्पुरते सुंदर होता येते पण कायमस्वरूपी हे सौंदर्य टिकवायचे असेल तर आयुर्वेदकीय उपायच उपयुक्त ठरतात. यासाठी त्वचेवरील काळे वर्तुळ, चेहऱ्याचे सौंदर्य अन् डोळ्यांची काळजी यावर असे करा घरगुती उपाय.
डॉ. मानसी पाटील
1) अमूल्य बदामाचं तेल…
बदाम केवळ तुमच्या केसांसाठी नाही तर तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असणारे विटामिन ई त्वचेसाठी वरदान ठरतं.
- झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या काळ्या वर्तुळांना बदामाचं तेल लावा.
- लावल्यावर मसाज करा जेणेकरून तेल तुमच्या त्वचेमध्ये मुरू द्यावं.
- रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुवा.
2) ताजे टॉमेटो…
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात असणारी पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याची क्षमता वाढते. दृष्टी, पचनक्रिया, रक्तप्रवाह यांची देखभाल करण्यासाठीही टॉमेटोचा उपयोग होतो. टॉमेटो हा एक ब्लिचींग एजंटदेखील आहे.
- एका वाटीत एक चमचा टॉमेटोचा रस आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण तुम्ही तुमच्या डोळ्यांखालच्या काळ्या झालेल्या वर्तुळांना लावा.
- 10 मिनिट्स हे तसंच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
३) कच्चा बटाटा…
टॉमेटोप्रमाणेच बटाटादेखील तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतो. काळ्या डागांना हे काढून टाकण्यासाठी मदत करतं आणि त्याशिवाय झोपल्यानंतर डोळ्याखाली येणारी सूजही कमी करतो.
- 1 अथवा 2 थंड बटाट्याचा रस काढून घ्या.
- या रसामध्ये कापसाचा बोळा घालून मग तुमच्या eyelids ठेवा आणि 10-15 मिनिट्स तसंच ठेवा.
- नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या
४) टी बॅग्ज…
चहामध्ये कॅफेन आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी चहा पिऊन तुम्हाला ताजंतवानं वाटतं. तुमच्या डोळ्यांच्या पफीनेससाठी हा पर्याय खूपच चांगला ठरतो.
- 2 Green tea bags फ्रिजमध्ये ठेवा.
- थंड झाल्यानंतर तुमच्या दोन्ही डोळ्यांवर ठेवा.
- 10-15 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग थंड पाण्याने डोळे धुवा.
५) गुणकारी हळद…
हळद हे फक्त पदार्थांमध्ये वापरण्याची वस्तू नाही. तुमच्या त्वचेसाठीही हळद गुणकारी असते. चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे सर्वांना माहीत आहेच. पण तुमच्या डोळ्यांखालील डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो.
- एका वाटीत अननसाचा रस काढून घ्या.
- यामध्ये 2 चमचे हळद घालून मिक्स करा.
- ही पेस्ट व्यवस्थित तयार झाली की काळ्या वर्तुळांवर लावा आणि सुकण्यासाठी साधारण 10 मिनिट्स वाट पाहा.
- सुकल्यावर ओल्या कपड्याने पुसून घ्या.
६) नैसर्गिक गुलाबपाणी…
गुलाबपाणी तुम्हाला नेहमी फ्रेश आणि ताजंतवानं करतं. केवळ चेहऱ्यासाठीच नाही तर डोळ्यांनाही यामुळे थंडावा मिळतो.
- एका भांड्यात थंड गुलाब पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 कापसाचे बोळे बुडवा.
- कापसाचे हे बोळे 15 मिनिट्स तसंच राहू द्या.
- नंतर तुमच्या डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांवर हे 10 मिनिट्स ठेवा.
- कोमट पाण्याने डोळे धुवून घ्या..
७) काकडी…..
काकडी अतिशय थंड असते आणि त्वचेवर तजेलदारपणा आणण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. डोळ्यांखालील काळे डाग काढण्यासाठी ही उपयुक्त ठरते. याचा वापर करणंही सोपं आहे.
- काकडीचे गोलाकार काप काढून घ्या.
- हे काप काही वेळ फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा.
- अर्ध्या तासानंतर फ्रिजमधून काढून तुमच्या डोळ्यांवर ठेवा
- 15 मिनिट्स नंतर काढून डोळे धुवा.
८) कोरफड….
कोरफड हे त्वचेसाठी उत्कृष्ट औषध आहे. याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच एक फायदा म्हणजे डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी होतो. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून चेहरा अधिक उजळवण्यासाठी तुम्ही कोरफडचा वापर करू शकता.
- कोरफडमधील जेल काढून तुमच्या डोळयांखालील काळ्या वर्तुळांवर लावा.
- साधारण 1 मिनिट मसाज करा.
- रात्री झोपताना हे करा आणि रात्रभर तुम्ही हे मिश्रण तसंच डोळ्याखाली मुरू द्या.
- सकाळी उठल्यानंतर हे धुवा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज हे करा.
९) केशर…
अगदी अनादी काळापासून सौंदर्यासाठी केशराचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी तत्व तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- एक चमचा दूध घेऊन त्यामध्ये केशर भिजवून ठेवा.
- काही वेळानंतर हे मिश्रण तुमच्या डोळ्याखाली लावा आणि मसाज करा.
- रात्री झोपताना हे करा आणि रात्रभर तुम्ही हे मिश्रण तसंच डोळ्याखाली मुरू द्या.
- सकाळी उठल्यानंतर हे धुवा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही रोज हे करा.
१०) संत्र्याचा रस
संत्र्याच्या रसामध्ये विटामिन सी जास्त प्रमणात असतं जे तुमच्या डोळ्यांखाली आलेल्या काळ्या डागांसाठी उपयुक्त ठरतं. तसंच यामध्ये असणारं सायट्रिक अॅसिडदेखील तुमच्या काळ्या डागांवर चांगला परिणाम दर्शवतं.
- संत्र्याचा रस काढून घ्या
- डोळ्यांखालील काळ्या डागांवर ते लावा आणि साधारण 30 मिनिट्स तसंच ठेवा.
- अतिशय हळूवारपणे कापसाच्या सहाय्याने हे पुसून काढा आणि नंतर चेहरा धुवा.
११) थंड दूध…
थंड दूध हा अगदी पूर्वीपासून करण्यात येणारा उपाय आहे. दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे डोळ्यांखालील डाग जाण्यास मदत मिळते. तसंच डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
- एका वाटीत दूध घ्या आणि कापसाचा तुकडा त्यात बुडवून ते शोषून घ्या.
- डोळ्यांखालील काळ्या डागांवर ते लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच ठेवा.
- थंड पाण्याने त्यानंतर चेहरा धुवून घ्या आणि स्वच्छ करा.
१२) ताक आणि हळदीची पेस्ट…
ताक आणि हळदीची पेस्ट जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा हे अतिशय उत्तम मिश्रण आहे. या दोन्हीतील घटकांमुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
- ताक आणि हळद नीट मिक्स करून पेस्ट करून घ्या.
- डोळ्यांखालील काळ्या डागांवर ते लावा आणि साधारण 30 मिनिट्स तसंच ठेवा.
- चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून किमान तीन वेळा तरी हा प्रयोग नक्की करा.
१३) नारळाचं तेल…
नारळाच्या तेलाचा वापर केल्याने तुमची त्वचा अधिक नरम आणि मुलायम होते त्याशिवाय निरोगी राहते. काळ्या डागांना काढून टाकण्यासाठी हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे.
- डोळ्यांखाली नारळाचं तेल तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटिक्लॉकवाईज लावा.
- रात्रभर तुम्ही हे तेल त्वचेमध्ये मुरू द्या आणि सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा धुवा.
१४) बेकिंग सोडा…
बेकिंग सोड्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे तुमच्या डोळ्याखाली झालेले काळे डाग काढून टाकण्यास मदत करतात. पुन्हा डाग न येण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
- एक चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात घाला आणि नीट मिक्स करा
- यामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि नंतर त्याच बोळ्याने तुमच्या डोळ्यांखालील झालेल्या काळ्या डागांवर मसाज करा.
- असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा तरी चांगल्या परिणामांसाठी करणं फायदेशीर ठरेल.
१५) हर्बल टी…
हर्बल टी तुमच्या डोळ्यांखालील काळे डाग कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये असणाऱ्या विविध वनस्पतींमुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. तुमची त्वचा अधिक सुंदर होण्यासाठीही याचा उपयोग तुम्हाला होतो.
- एक कप पाण्यामध्ये टी बॅग घालून ठेवा.
- ही टी बॅग तुम्ही तुमच्या डोळ्यांखालील काळ्या डागांवर लावा आणि काही वेळ तसंच ठेवा. नंतर चेहरा धुवा.
डॉ. मानसी पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.