July 27, 2024
ubalat-gopal-gavade-book-review
Home » चंदगडी बोलीतील समृद्ध व्यक्तिचित्रे
मुक्त संवाद

चंदगडी बोलीतील समृद्ध व्यक्तिचित्रे

नागणवाडी आणि परिसरातील अफलातून नऊ व्यक्तिचित्रांचा हा संग्रह आहे. डोंगर झाडीत, खेड्यापाड्यात राहणारी आणि स्वतःची जीवननिष्ठा असणारी ही माणसे आहेत. त्यांचे स्वभाव एका बाजूला सरळसोट आहेत, तर दुसऱ्या बाजूला छंदीफंदी आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडल्याने एकाच परिघात फिरणारे आहेत.

डॉ. श्यामसुंदर मिरजकर,
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
दूरभाष : ९४२१२१२३५२

ज्या भाषेला अनेक बोली असतात, ती भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध असते. अर्थांच्या अनेक छटा व्यक्त करणारे शब्द, विविध भाषिक ढंग, उच्चारणाच्या विविध पद्धती यांची मोलाची भर बोलीभाषा या नेहमीच मुख्य भाषेत घालत असतात. यादृष्टीने मराठी ही समृद्ध भाषा आहे आणि या मराठीची चंदगडी ही बोली अनोखी आहे. कोकणी आणि कन्नड या भाषांचा शेजार लाभलेल्या चंदगड-हलकर्णी या सीमा प्रदेशात बोलली जाणारी ही बोली सुलभीकरणातील स्वरवर्णलोप करण्याच्या प्रवृत्तीतून वेगळी शब्दरूपे घेऊन वावरताना दिसते. बोलीभाषा खऱ्या अर्थाने सर्वपरिचित होतात, त्या ललित साहित्यातून. म्हणूनच गोपाळ गावडे लिखित ‘उंबळट’ हे चंदगडी बोलीतील व्यक्तिचित्रणाचे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे.

नागणवाडी आणि परिसरातील अफलातून नऊ व्यक्तिचित्रांचा हा संग्रह आहे. डोंगर झाडीत, खेड्यापाड्यात राहणारी आणि स्वतःची जीवननिष्ठा असणारी ही माणसे आहेत. त्यांचे स्वभाव एका बाजूला सरळसोट आहेत, तर दुसऱ्या बाजूला छंदीफंदी आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडल्याने एकाच परिघात फिरणारे आहेत.

आयुष्यभर स्वतःच्या शेतात राबणारा आणि रानावनातील लाकूड फाटा तोडून तो विकून स्वतःचा शौक पुरा करणारा आण्णूबाबा आहे. त्याचे खरे नाव सट्टू ओम गावडा म्हणजेच सट्टू ओमाणा गावडे. सगळे गाव त्याला मेघा म्हणे, तर भाऊबंदातील मुले आण्णूचा बाबा या अर्थाने अण्णूबाबा म्हणत. हा आण्णूबाबा घर, शेत, परडे, जनावरे यांची चांगली निगा राखी. शेतातील आंब्याची राखण करी. कष्टात कुठेही कसर नाही. खरे तर तो सरळमार्गी माणूस. परंतु रात्री दारू पिऊन काळ्या आंब्याखाली आला की जणू काही त्याच्यामध्ये संचार होत असे. तो तीन मोठे हुंकारे देई. शिट्या वाजवी आणि येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना बघून डोळा मारी. बायका त्याला रागाने काहीतरी म्हणत, परंतु कुठल्याच बाईने त्याला वाईट म्हटले नाही. तक्रार केली नाही. असा हा आण्णूबाबा दीर्घायुषी होता. लेखक लिहितो, ‘…तरीबी आण्णूबाबा ऐंशी वर्सापतर शेतात राबला. जास्तीच खरं कम्मी न्हाय. तेला आत्तं व्हईनासं झालं. बयलाबबरनं झेपेना. औताबबर तर हेलपाटोन पडोलाला. तेचेक्नं जनावरांचंबी व्हईनास झालं. आण्णूबाबा डेंगोन यला. पाणयाच्या घागरी उचलूस गावेनात.’ इतके काबाडकष्ट करणारा आणि दावणीतल्या जनावरांवर मनपूत प्रेम करणारा अाण्णूबाबा शेवटच्या दिवसात मात्र धरणीला पडला. त्याची आबाळ झाली. “मी मेलो त या पैशाचं कपान घे. माज्या कपनास कुणाक्नबी पैसे घू नकोस.” म्हणणारा हा म्हातारा स्वाभिमानाने जगला आणि मेला, असे या व्यक्तिचित्रात दिसते.

रोंगा हा कष्टकरी मवाळ आणि जगण्याच्या संघर्षात खोल बुडालेला माणूस. रोंगा म्हणजे मेंगळट किंवा आजारी माणूस. त्याच्या आईसह सगळे गाव त्याला रोंगा म्हणते. मुळचे गरीब कुटुंब. लेखक वर्णन करतो, ‘भाऊबंदांनी जो हिस्सा देल्यानी, तो तेनी गप्पगुमान घेटल्यानी. तेनी काय कुरकूर करूस न्हाईत. तेंच्या हिस्स्यास सगळी चिरक्याची जमीन यलेय. चिरका म्हणजे खडकाळ जमीन गा! पाऊस पडला की उंबळट होई. उंबळट झाली की, चिखल करून भात रुईत. पाऊस पडला त थोडेफार मिळताय, न्हाय आसं न्हाय. खरं जोमान पीक यलंय आसं कधी व्हन्नाय.’


उंबळट म्हणजे जमिनीतून वर येणारा उमाळा. पाऊसपाणी जास्त झाले की जमिनीतून अशी उंबळट येते. गोपाळ गावडे यांना गावाकडच्या या माणसांबद्दल असाच उमाळा येतो. त्यातून ही व्यक्तिचित्रे साकारली आहेत. हा रोंगा शेताच्या कामात पूर्ण बुडलेला. दिसायला कुरूप, पण त्याला नक्षत्रावाणी बायको मिळते. तरी त्यांच्या मनाचे धागे जुळत नाहीत. ती पुन्हा पुन्हा माहेरी जाते. शेवटी पंचायत बसून न्याय होतो. तिच्या हातापायात, कमरेला गवताचा तोडा बांधून आणि चाबकाचे फटकारे देऊन रोंगा बायकोला स्वतःच्या घरी घेऊन जातो. अशी धिंड काढल्यामुळे ती वटणीवर येईल, नांदू लागेल, असे सगळ्यांना वाटते. परंतु तसे घडत नाही. शेवटी रीतसर काडीमोड होतो. पुढे रोंगा पाटलाची दुसरी बायको करतो. त्याला मुलेही होतात.

‘किंवडा तुक्का’ ही वेगळीच वल्ली होती. कमी ऐकू येणारा तुका गावात थोरामोठ्यांच्या घरीदारी गडी म्हणून राबे. त्याचे बोलणे वागणे बायकी ढंगाचे होते. त्यामुळे सगळे लोक त्याची चेष्टा करत. तो चिडे. शिव्या देई. परंतु सगळ्यांशी बोलून चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करी. ‘तुक्यास पुरुशात्न मिसळोसखं वाटे. खरं जमोस नसे. आपणी पुरुष हाय का नाय? हे गणितच तेला कव्व उलगाडाेस न्हाय. आनि ह्या न सुटतल्या गणिताडे सगळ्यानी काणाडोळाच केल्यानी. कधीच न सुटतल्या ह्या गणिताच्या गोंधळात तुक्का मातर चेष्टा मस्करीचा इषय हून ऱ्हाला. लोकास्नं, तुक्क्यान दिल्ल्या गाळ्या दिसल्या. खरं चेष्टा मस्करीन मनातल्या मनात फाटतंला तुक्का कधीच कुणास दिसोस न्हाय….या तुक्क्याची बायको सोभावानं लई साजरी व्हती. तेस्नं याक प्वॉर बी व्हत्तं. घट्टचं पातळ करून कसं त जगेत.’ अशा या तुक्याला त्या परिसरातील सगळी लोकगीते पाठ होती. लग्न समारंभात तो ती म्हणत असे. तो स्वतःचे दुःख कधी बोलून दाखवत नसे. त्याच्या बायकोने म्हातारपणी नदीत उडी टाकून जीव दिला आणि तेव्हापासून तुक्याची जगण्यावरची वासना गेली.

पिठाची गिरण चालविणारा परोपकारी बाबूभावो त्याच्या सुस्वाभावामुळे सोसायटीचा चेअरमन म्हणून निवडला जातो. त्याची थोरामोठ्या माणसात उठबस होते. हळूहळू दारूचे व्यसन लागते. त्यातूनच तो कर्जबाजारी होतो. सर्वांचा विश्वास गमावतो. त्याची कर्मकहाणी माणसाच्या अध:पतनाची कहाणी म्हणून पुढे येते.

नागणवाडी या गावातील सगळे लोक गरीब. परिस्थितीशी टकरा घेणारे. मात्र प्रामाणिक. दुसऱ्याच्या मदतीला धावणारे. या माणसांचा प्रतिनिधी वाटावा असा भीमराव चिमणे. तो सोसायटीत सेक्रेटरी होता. भरमू अण्णा पाटील आणि नरसिंगराव पाटील यांच्या राजकारणाच्या चुरशीत नोकरी करणाऱ्यांचे हाल होत. मात्र भरमू पाटील गटात असणारा भीमराव त्रास होतो म्हणून कधी बदलला नाही. “आज तरास हूलाय म्हणून गट बदल्लो त इश्वासघाताचा शिक्का माझ्या कपाळावर बसंल, तो डिसोस नसला तरी पुसोन जाऊचा न्हाय,” असे म्हणणारा भीमराव शेवटपर्यंत प्रामाणिक माणूस म्हणून ओळखला गेला. घरचे खाऊन समाजाच्या भाकरी भाजणे, अशी त्याची ओळख होती. हे व्यक्तिचित्र मुळातून वाचावे असेच आहे. अशाच पद्धतीचेच एक व्यक्तिचित्र हरहुन्नरी कलाकार व खेळाडू असणारा रामचंद्र बारवेलकर याचे आहे. थोडासा एककल्ली असणारा रामा अभ्यासात, व्यवहारात हुशार नव्हता. त्यामुळे मैदानावरच्या शर्यतीत सर्वात पुढे असणारा रामा आयुष्याच्या शर्यतीत मागे पडत गेला. त्याचेही अनेक प्रसंगांतून उभे राहणारे व्यक्तिचित्र लक्षणीय आहे.

“तुमास्नं सांगतो, माण्सान उपकार इसरोचे नसतात. माण्साच्या चकोटल्या चकोटल्या गोष्टी आयुक्षभर ध्येनात ठूस व्हयेत. वाईट गोष्टी इसरोच्या, म सगळं जग चकोट वाटताय,” असे म्हणणारा शिवनाथ आप्पा गोसावी आख्या गावासाठी भाऊसाहेब होता. दुसऱ्याच्या मदतीस धावणारा, दुसऱ्याबद्दल चार चांगले शब्द बोलणारा भाऊसाहेब अनेक उद्योग करून पोट भरू पाहतो. कधी सायकल दुकान काढतो, कधी भटजीपणा करतो. परंतु त्याचा कुठेच जम बसत नाही. आयुष्यभर तो गोसावीच राहतो. तरीही त्याचा सुस्वभावीपणा वाचकांच्या मनात घर करून राहतो.

असंख्य उचापती करणारा थापाडा गण्या, स्थानिक राजकारणातून गावात सतत आडवा-आडवीचे आणि जिरवा-जिरवीचे उद्योग करणारा शंकर डायरेक्टर म्हणजे शंकर भावकाण्णा तावडे या दोन व्यक्तिरेखा चंचल आणि अपस्वार्थी माणसाच्या ऱ्हासाची कथा उभी करतात. ‘डायरेक्टराच्या मोठेपणाच्या वझ्याबुडी हुशार आनि चांगला माणूस मातीमोल झाला. आनि आत्तं शेतात, धंद्यात, राजकारणात यशासाठणं चाचपाडोलाय.’ हे लेखकाचे भाष्य यावर नेमका प्रकाशाचे टाकणारे आहे. एकंदर चंदगडी मातीत उगवलेली अस्सल आणि टणक माणसे आपल्या नैसर्गिक रंग रूपासह या व्यक्तीचित्रणांमधून भेटतात हेच ‘उंबळट’चे वेगळेपण आहे.

पुस्तकाचे नाव – उंबळट
लेखक – गोपाळ गावडे
प्रकाशक – स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर
पुस्तकासाठी संपर्क – ९४२१२१२३५२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

महावितरण डबघाईस…!

विनावाहक धावणारी रिक्षा…!

विविध क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या प्राची दुधाने

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading