February 22, 2025
bhoomi Literature and Arts Conference on February 15th at Osargaon
Home » ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी कोकणभूमी साहित्य कला संमेलन
काय चाललयं अवतीभवती

ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी कोकणभूमी साहित्य कला संमेलन

  • कोकणभूमी साहित्य कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर
  • प्रमुख पाहुण्या गायिका डॉ. शकुंतला भरणे
  • एम.व्ही.डी.कला अकादमीतर्फे ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी रोजी आयोजन
  • जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी यांचीही उपस्थिती

कणकवली – ओसरगांव येथील एम. व्ही. डी. कला दालनतर्फे कलादालनच्या नाट्यगृहात शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायं.४.३० वा. कोकणभूमी साहित्य कला संमेलन आयोजित केले आहे.

ज्येष्ठ कवी तथा भारत सरकार साहित्य अकादमीचे (मराठी) माजी सल्लागार सदस्य अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला मुख्य प्रमुख पाहुण्या म्हणून गोवा येथील गायिका, लेखिका डॉ. शकुंतला भरणे यांना निमंत्रित केले आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, मेडिकल कॉलेज फिजोथेरपी कसालचे चेअरमन सुरज बांदेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी कविता शिंपी, ओसरगांव शाळा मुख्याध्यापक तथा सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष कवी किशोर डी.कदम आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती एम. व्ही. डी. कला अकादमीचे चेअरमन कॅप्टन विलास सावंत यांनी दिली.

एम. व्ही. डी. कॉलेजच्या कोकण कला अकादमीतर्फे यापुढे डॉ. शकुंतला भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी घेताना ऑडिशन घेण्यात येणार आहे. तर दरवर्षी विद्यार्थ्यांची दशावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धा विजेत्या संघाला फिरता चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कोकणातील संगीत कला कलाक्षेत्रात नव्या कलावंतांना प्रेरणा मिळावी हा उद्देश यामागे आहे. या पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित केले आहे.

संमेलनाचे अध्यक्ष कवी अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर त्यानी चित्रपटाची गाणीही लिहिली असून त्यांच्या कवितासंग्रहावर अनेक नाटकांची निर्मिती झालेली आहे. तसेच त्यांच्या कवितांवर विविध विद्यापीठांमध्ये एम. फिल., पीएचडीचे संशोधन झाले आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग साहित्य कला मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या पहिल्या एक दिवशी साहित्य संगीत संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले आहे. तर संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शकुंतला भरणे या गोव्यातील ज्येष्ठ गायिका असून गोवा आकाशवाणी, तसेच भारतातील विविध राज्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवांमध्ये त्यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. अर्थशास्त्र या विषयात त्यांनी एमबीए केले असून स्वरानंद आणि नादब्रह्म हे संगीतावरील दोन ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. कोकणी साहित्य अकादमी पुरस्काराने तसेच कोकणी भाषा मंडळ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर दुसऱ्या सत्रात समूह नृत्य सादर करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या सत्रात कवयित्री मनीषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे. यात कवी मधुकर मातोंडकर, निशिगंधा गांवकर, सत्यवान साटम, संदीप कदम, तन्वी मोहिते, आर्या कदम, श्रवण वाळवे, सोनिया आंगणे आदींचे काव्यवाचन होणार आहे.

तर संमेलनाच्या चौथ्या सत्रात बाल दशावतार कलाकारांचा दशावतार खेळ आयोजित केला आहे. या मध्ये प्रथामिक शाळा हळवल नंबर 1,कळसुली हायस्कूल, सिध्दभराडी बाल दशावतार ओसरगाव हे संघ सहभागी आहेत.सदर साहित्य कला संमेलनात रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कॅप्टन सावंत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – मो. 84120 39966 / 7499856776/ 9422963655.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading