November 22, 2024
Birds are farmers friend article by rajendra ghorpade
Home » पक्षीसुद्धा शेतकऱ्यांचे मित्रच…
विश्वाचे आर्त

पक्षीसुद्धा शेतकऱ्यांचे मित्रच…

जंगलक्षेत्र घटू लागल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. विस्तृत वृक्षांची संख्याही घटत आहे. पारावरचे वृक्षही आता पाहायला मिळत नाहीत. वसाहती वाढल्या तसे हे पारच नष्ट झाले. खेड्यातही जंगले तोडून जमिनी लागवडीखाली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. बांधावरचे वृक्ष तर केव्हाच नष्ट झाले आहेत. याचा विचार करता देवराईचे महत्त्व आता वाटू लागले आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळें ।
कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीची ।।258।। ज्ञानेश्वरी अध्याय11

ओवीचा अर्थ – महाराज आकाशाच्या खोळेत ब्रह्मसमुदायाचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत.

शेतीमध्ये पक्ष्यांचा काय संबंध ? असा प्रश्न पडू शकतो. पण मनुष्य केवळ आपलाच विचार करू लागला आहे. इतरांचा विचार त्याने सोडून दिला आहे. अशांमुळे त्याचेच नुकसान होत आहे. निसर्गाच्या चक्रात विविध साखळ्या आहेत. मोठे प्राणी लहान प्राण्यांचे भक्षण करतात. ही साखळी मानवी हव्यासामुळे मोडली जात आहे. वाढत्या गरजांमुळे वृक्षांची तोड होत आहे. पूर्वीचे मोठ-मोठे विस्तार असणारे वृक्ष आज पाहायला मिळत नाहीत. अशा वृक्षांची संख्या घटल्याने पक्ष्यांचीही संख्या घटली आहे.

वृक्षांच्या डोलीमध्ये पक्षी घरटी बांधतात, अंडी घालतात; पण हे वृक्ष कमी झाल्याने अंडी घालण्यास त्यांना सुरक्षित जागा मिळेनाशा झाल्या आहेत. अनेक अंड्यांचे भक्षण होत आहे. अंड्याचे संरक्षण होणे आवश्यक आहे. मोठ्या वृक्षांवर सुरक्षित जागा असायची. तेथे प्राणी पोहोचू शकत नाहीत. पण हे वृक्षच आता नष्ट झाले आहेत. अशा अनेक कारणांनी पक्ष्यांची संख्या घटली आहे. पण या पक्ष्यांचा आणि शेतकऱ्यांचा संबंध काय?

साप उंदीर खातो. उंदरापासून शेतीचे होणारे नुकसान टाळले जाते. यासाठी सापास शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. तसे पक्षीही अनेक कीटक खातात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोतवाल पक्षी शेतीचे नुकसान करणारे कीटक खातो. पक्ष्यांची संख्या घटल्याने कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेती करताना या गोष्टींचा विचार हा शेतकऱ्यांनी करायला हवा. यासाठी आवश्यक एकात्मिक उपाययोजना करायला हव्यात.

सकाळी नांगरट केली, तर उसातील हुमणीचा प्रादुर्भाव आठ ते दहा टक्क्यांनी कमी होतो, असे तज्ज्ञ सांगतात. याचा विचार करून शेतकऱ्यांनी शेतीची नांगरट सकाळच्यावेळी करायला हवी. हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबीनवरील पाने खाणारी अळी अनेक पक्षी खातात. शेतकऱ्यांना सापाप्रमाणेच पक्षी, मधमाशा हेसुद्धा मित्र आहेत. याचा विचार करून या पक्ष्यांचे संवर्धन कसे करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.

जंगलक्षेत्र घटू लागल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. विस्तृत वृक्षांची संख्याही घटत आहे. पारावरचे वृक्षही आता पाहायला मिळत नाहीत. वसाहती वाढल्या तसे हे पारच नष्ट झाले. खेड्यातही जंगले तोडून जमिनी लागवडीखाली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. बांधावरचे वृक्ष तर केव्हाच नष्ट झाले आहेत. याचा विचार करता देवराईचे महत्त्व आता वाटू लागले आहे. तेथील वृक्ष तोडू नयेत यासाठी लोकांच्या मनात भीती घालण्यात आली होती. पण आता ही देवराईही नष्ट झाली आहे. देवाच्या नावाने असणारे हे जंगल पुन्हा वाढविण्याची गरज आहे. प्रत्येक गावात यासाठी प्रयोजन हवे. आदर्श गावांमध्ये याचा समावेश असायला हवा. पक्षी हासुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे. याचा विचार करून त्यांचे संवर्धन हे व्हायला हवे. मोठ्या देशी वृक्षांच्या संवर्धनातून पक्षी व त्यांच्या घरट्यांचेही संवर्धन होते याचा विचार व्हायला हवा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading