एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. अंगात एक स्फुर्ती चढते. शरीर अन् मनामध्ये एक प्रेरणादायी उर्जा निर्माण होते. नैराश्य दुर जाऊन मनात एक उत्साह भरतो. हीच सकारात्मक उर्जा हेच मनाच्या विकासाचे टॉनिक आहे. पण शुद्ध विचार हा मनाचा रोजचा आहार आहे हे लक्षात ठेवायला हवे.
आपणयां उजिता । स्वर्धमातोंचि रहाटतां ।
जें पावें तें निवांता । साहोनि जावें ।। २२८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – आपल्याला योग्य असें जे स्वधर्माचे आचरण, तेंच करीत असतांना, जो प्रसंग येईल, तो मुकाट्याने सहन करावा.
जीवनात अनेकदा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. चिंता ही सर्वांनाच असते. पण कशाची चिंता करायची ? चिंता का करायची ? निडर होऊन परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहीजे. प्रत्येकवेळी सर्वच गोष्टी मनासारख्या घडतीलच असे नाही. काहीवेळेला मनाला मुरड घालण्याचीही वेळ येते. यासाठी सहनशील व्हायला हवे. कष्ट पडले म्हणून नाराज व्हायचे नसते. कारण नैराश्य हे मानवाला कमकुवत बनवते. नकारात्मक विचार प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतात हे लक्षात घ्यायला हवे.
स्वतःचा विकास हा स्वतःच करायचा असतो. कोण मदतील येईल याची आशाही ठेवायची नसते. हे करताना अपयश आले म्हणून खचायचे नसते, घाबरायचे नसते. सद्गुरुंचा उपदेशच आपल्याला मदतगार ठरत असतो. अपयश आले ही सद्गुरूंचीच इच्छा होती असे समजून वाटचाल करत राहायचे असते. मुकाटाचे ते अपयश पचवून अपयशाला यशामध्ये कसे रुपांतरीत करता येईल याचाच विचार सातत्याने ठेवायला हवा. सकारात्मक विचार करत राहील्यास निश्चितच प्रगती ही होत राहाते. यासाठी सकारात्मक विचारांची बैठक, सवय ही मनाला लावायला हवी.
एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. अंगात एक स्फुर्ती चढते. शरीर अन् मनामध्ये एक प्रेरणादायी उर्जा निर्माण होते. नैराश्य दुर जाऊन मनात एक उत्साह भरतो. हीच सकारात्मक उर्जा हेच मनाच्या विकासाचे टॉनिक आहे. पण शुद्ध विचार हा मनाचा रोजचा आहार आहे हे लक्षात ठेवायला हवे. स्वः ची ओळख करून घेऊन तशी साधना करताना मन भटकत राहाते. पण हा शुद्ध आहार मनाचा योग्य विकास घडवतो अन् सकारात्मक उर्जा या मनाला प्रोत्साहित करत राहाते. असे प्रेरणा देणारे विचार अन् त्याची संगत नेहमी ठेवायला हवी.
स्वः ची ओळख घेऊन तसे आचारण ठेवणे हा स्वधर्म आहे. हा धर्मच स्वतःला ज्ञानी करतो. हे करताना अनेक अडचणी, अपयश हे येत राहातात. तो प्रसंग सहन करण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. अपयश पचविण्याची ताकद आपल्यात असायला हवी. प्रत्येक यशाची पहिली पायरी अपयश ही आहे हे लक्षात घेऊन वाटचाल करत राहायला हवे. अपयश का आले याचा विचार करून त्या चुका सुधारून यशाचा मार्ग शोधायला हवा. प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही, पण यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. प्रयत्नच केलेच नाहीत, तर यश कसे मिळेल. चुका सुधारल्या नाहीत, तर यश मिळवता येणार नाही. यासाठी सहनशीलता महत्त्वाची आहे. ही सहनशीलचाच आपणाला यशस्वी करते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.