June 16, 2024
Life cycle of animals and live things article by rajendra ghorpade
Home » प्राणीमात्राचे, किटकांचे जगणे
विश्वाचे आर्त

प्राणीमात्राचे, किटकांचे जगणे

पूर्वीच्या काळी संतांनी प्रवचनातून, कीर्तनातून प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वरांनी तर अशी शेतीतील अनेक उदाहरणे देऊन अध्यात्म सांगितले आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे. मोबाईल 9011087406

एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती ।
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। 38 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 7 वा

ओवीचा अर्थ – कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात. कित्येक अन्नावर राहातात आणि कित्येक पाण्याने जगतात.

कीटकांचे जीवनचक्र कसे होते. कोणत्या अवस्थेत किडी काय खातात ? विविध अवस्थांत अन्नपाण्याविना जगतात. पाने खाऊन जगतात. तर काही हवा शोषून जगतात. या सर्वांचा अभ्यास शेतकऱ्यांना असायला हवा. किडीच्या अंडी, कोश, अळी आणि पतंग या चार अवस्था आहेत. विविध अवस्थेत किडीचे कार्य वेगवेगळे असते. अळीच्या अवस्थेत पिकांचे मुख्यतः नुकसान होते. या अवस्थेत दाणे, पाने अळी खाते. याचा परिणाम उत्पादनावर होतो.

हुमणीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. हुमणी अळी पिकांची मुळे खाते. यामुळे रोपे मरतात. पण याच हुमणीचा भुंगा मात्र काहीही न खाता आठ दिवस जगतो. रेशीम किडीचा पतंग कोशातून बाहेर आल्यानंतर पतंग मादीशी मिलन होऊन अंडी घालेपर्यंत काहीही खात नाही. उत्पादनासाठी आवश्यक ऊर्जा लागते ती कोशामध्ये जाताना अळीने साठवून ठेवलेली असते. अशी विविध उदाहरणे देता येऊ शकतील. या अवस्थांचा अभ्यास हवा कारण पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो.

कोणत्या अवस्थेत नियंत्रण करायचे ते निश्चित करता येते. अळीच मारली तर पुढचे उत्पादनच होणार नाही किंवा अंडीच नष्ट केली तरीही पुढच्या अवस्थाच रोखता येतात. हे कीटक अंडी घालतात कोठे ? पानाच्या खालच्या बाजूस अंडी दिसली की ती पाने लगेच काढून जाळल्यास किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. पाने खाणाऱ्या व फळे पोखरणाऱ्याया अळ्यांचे नियंत्रणासाठी अशा पद्धती उपयुक्त ठरतात.

पाने खाणाऱ्या अळ्या पीक 30 ते 40 दिवसांचे झाल्यावर काही झाडांच्या पानावर बारीक हिरवट अळ्या शेकडोंच्या संख्येने आढळतात. अशी पाने जाळीदार अर्धवट सुकल्यासारखी दिसतात. त्याखाली केसाळ अळ्या किंवा पाने खाणाऱ्या अळ्या 5 ते 7 दिवस झुंडीत राहून नंतर छोटे झुंड तयार करून शेतात पसरू लागतात. या अळ्या एक सेंटीमीटर पेक्षा लहान असतानाच पानासकट हळूच गोळा करून केरोसिनयुक्त पाण्यात टाकून माराव्यात. यामुळे पुढे त्यांचा उपद्रव होत नाही.

वांगी, भेंडी व इतर किडकी फळे शेतात किंवा इतरत्र उघड्यावर न टाकता त्याचे छोटे ढीग करून त्यावर दोन इंच मातीचा थर दिल्यास फळातील अळ्या मरून उपद्रव काही प्रमाणात कमी होतो. किडक्या फळातून किडीचे पतंग बाहेर येऊन किडीचा जीवनक्रम सुरू राहिल्याने पिकाचे नुकसान होते. प्रत्येक वेळी कीडनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतात असे नाही. यासाठी शेतामध्ये वारंवार फेरफटका मारायला हवा. पिकाची पाहणी करायला हवी. पिकावर रोग, कीड हे काही अचानक पडत नाही. यासाठी त्याचा अभ्यास हा असायला हवा.

पूर्वीच्या काळी संतांनी प्रवचनातून, कीर्तनातून प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वरांनी तर अशी शेतीतील अनेक उदाहरणे देऊन अध्यात्म सांगितले आहे. पृथ्वीतलावरील प्राण्यांच्या जीवनाशी निगडीत ही ओवी आहे. काही प्राणी हे फक्त हवेवरच जगतात. म्हणजेच त्यांना फक्त वाराच पिऊन जगतात. काही प्राणी गवत खाऊन जगतात. काही प्राणी अन्नावर जगतात तर काही केवळ पाण्यावरच जीवन जगतात. प्रत्येक जीवाचे, प्राण्याचे जगणे हे वेगवेगळे आहे. पण त्यांच्यातला जीव, प्राण जो आत्मा आहे तो एकच आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts to your email.

Related posts

जीवनातील अनुभव कवितेच्या रुपात

पाण्याचे, ऑक्सिजनचे जीवनातील महत्त्व ओळखा अन् प्रदुषण रोखा 

जम्मू – काश्मीर होणार अफ्स्पा मुक्त

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading