
प्रकाश मेढेकर
स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया आणि भारतातील बांधकाम प्रकल्पाअंतर्गत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन विषयांसाठी अभ्यागत व्याख्याता, मानव अधिकार आणि आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते 2014, लेखक – दिशा बांधकाम नवनिर्मितीची (सकाळ प्रकाशन, पुणे )
ई -मेल – prakash.5956@gmail.com
मोबाईल – 9146133793
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत देशातील अनेक शहरांचा कायापालट सध्या होत आहे. शहरे स्मार्ट करताना आजच्या आणि भविष्यातील गरजांचा विचार करावा लागतो. स्मार्ट सिटी म्हणजे ध्वनी आणि वायू प्रदूषण, नागरिकांची सुरक्षितता, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, ऊर्जेचा वापर, बांधकामांचा दर्जा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, नागरिकांचे राहणीमान अशा सर्वच गोष्टींचा विशिष्ठ दर्जा असणारे शहर. आज मेट्रोच्या निमीत्ताने विविध शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होत आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील खाजगी वाहने आपोआप कमी होऊन प्रदूषण, वाहतूक कोंडी अशा दैनंदिन समस्यांवर नियंत्रण आणणे आपल्याला शक्य होईल. परंतु शहराचा विकास साध्य करताना पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आजच्या घडीला दुर्दैवाने शहरातील वाहनांची संख्या आणि त्यासाठी आवश्यक असणारी पार्किंगची उपलब्धता यांचे प्रमाण व्यस्त आहे. वर्षागणिक शेकडोंनी दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर येत असताना पार्किंगसाठी मारलेले पांढरे पट्टे मात्र तेवढेच आहेत.
शहरात जर जागोजागी नो पार्किंगचे बोर्ड दिसले तर नागरीकांनी आपल्या वाहनांचे पार्किंग करायचे तरी कोठे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी लागणारे प्रयत्न आज केले नाही तर पुढील काळात वाहनांना रस्त्यांवर पार्किंग मिळणे अधिक अडचणीचे होईल. स्थानिक प्रशासनाने पार्किंगबाबत असणाऱ्या उपाययोजना तातडीने राबवून नागरिकांचे जीवन सुसह्य कसे होईल याला आता प्राधान्य दिले पाहिजे. जागतिक सर्वेक्षणानुसार शहरातील वाहतूक कोंडीस पार्किंग व्यवस्था सक्षम नसणे हे प्रमुख कारण असते. अनेकदा वाहनांसाठी पर्किंगची जागा शोधण्यातच चालकाचा मौल्यवान वेळ, इंधन आणि पैसा विनाकारण वाया जात असतो. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची विनाकारण गर्दी होऊन सल्फरडायऑक्साईड, हवेतील सूक्ष्म धूलीकण, कार्बन मोनाक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बनकार्बन अशा अपायकारक वायूंचे उत्सर्जन होते आणि पर्यायाने प्रदूषणाची पातळी वाढते. हे सर्व वायू मानवी शरीरास हानीकारक असून त्याची तीव्रता कोरोना व्हायरस इतकीच गंभीर आहे.
पार्किंगच्या स्मार्ट व्यवस्थापनाबाबत आपण अमेरिकेचे अनुकरण करण्यास हरकत नाही. अमेरिकेत आज पार्किंग सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ३० बिलीयन अमेरिकन डॉलरपर्यंत पोचली आहे. देशातील वाहनांची संख्या अंदाजे २५ कोटी असून त्यासाठी केलेली पार्किंगची संख्या ५० कोटी म्हणजे जवळपास दुप्पट आहे. त्यादेशात पार्किंग सुविधा पुरवणारी अंदाजे ४० हजार गॅरेजेस म्हणजेच वाहनतळ आहेत. एकेका वाहनतळात १० ते १५ हजार चारचाकी पार्किंगची व्यवस्था सहजपणे करता येते. येथील बहुसंख्य शहरात वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थापन केले आहे. शहरांच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते आणि चौकात पार्किंग निषिद्ध असते. रस्त्यांवर दिव्यांग व्यक्तिंसाठी पार्किंगची जागा प्राधान्याने राखीव ठेवली जाते. रस्त्यांवर वेळेनुसार फ्री अथवा वाजवी दरात सशुल्क पार्किंग उपलब्ध असते. नागरिकांना जीपीएस प्रणाली द्वारे संपूर्ण शहर, रस्ते आणि पार्किंगची जागा पहाता येते. रस्त्यांची नियमित स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन, वेग मर्यादा आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हींचा वापर केला जातो. येथील नागरिकांना वाहनांची सुस्थिती, प्रदूषण चाचणी, लायसेन्स, नंबर प्लेट आदी गोष्टींबाबत सदैव जागरूक रहावे लागते. महामार्गावरील चालक सेफ्टी बेल्ट, टोल टॅग, पार्किंग टॅग, लायसन्स प्लेट, मोबाईल अॅप, जीपीएस आदी गोष्टींनी सुसज्ज असतात. देशात कोठूनही कोठे जाण्यासाठी जीपीएस यंत्रणा उपलब्ध असते. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी येथे कार पूल, राईड शेअरिंग असे पर्याय येथे उपलब्ध आहेत.

स्मार्ट पार्किंग व्यवस्थापन
कमीतकमी वेळेत पार्किंगची जागा उपलब्ध करणे हे स्मार्ट पार्किंग व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. पार्किंगचे व्यवस्थापन करताना माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार आणि पायाभूत सुविधा यांची मदत घेतली जाते. यामध्ये व्हेइकल सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, वायरलेस कम्युनिकेशन, डाटा अॅनॅलीसेस,स्मार्ट मोबाईल अॅप्लीकेशन, ऑटोमेटीक पार्किंग, जीपीएस प्रणाली आदी गोष्टींचा समन्वय साधला जातो. पार्किंगची जागा शोधणे, त्यांचे आरक्षण, अचूक स्थान, पेमेंट आदींसाठी इंटरनेट, मोबाईल आणि क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. बहुमजली पार्किंगसाठी सेन्सर्स, मेसेज सिस्टीम, ट्रॅफीक कन्ट्रोल डीव्हाईस, वायरलेस, कॉम्पुटर, सव्हर आदी गोष्टींची मदत घेतली जाते. आज अमेरिकेत अनेक बहुमजली इमारतींमधे स्वयंचलित पार्किंग यंत्रणा बसवल्या आहेत. काही इमारतींच्या अंतर्गत भागात जीना, रॅम्प अथवा ड्राईव्ह वे नसल्याने नियोजित जागेत दुप्पट वाहनांचे पार्किंग करणे शक्य झाले आहे. स्वयंचलित पार्किंग यंत्रणेत लिफ्ट, स्लायडिंग प्लॅटफॉर्म , रोबोटिक पॅलेट , वॅलेट सिस्टीमचा वापर केला जातो. पार्किंग यंत्रणेत कमी वाहनांसाठी डीपेंडेबल आणि पझल असे पर्याय उपलब्ध आहेत . सर्व यंत्रणा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारील असल्याने आखाती देशातूनही याला मोठी मागणी आहे.
देशातील शहरे स्मार्ट आणि पर्यटनासाठी विकसित करताना पार्किंगचे व्यवस्थापन अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्याला करावे लागेल . आज शहरातील वाहनतळांची संख्या त्यामानाने खुपच कमी आहे . ही संख्या वाढवण्याचे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला आजपासूनच करावे लागतील. त्यासाठी आधुनिक वाहनतळ बांधावे लागतील. शहरातील रस्त्यांप्रमाणेच शॉपिंग मॉल, हॉस्पीटल, विमानतळ, विद्यापीठे, कॉलेज, रेल्वे आणि बस स्थानके अशा ठिकाणी वाहनतळांच्या मदतीने पार्किंगची संख्या वाढवल्यास सध्याची गंभीर समस्या सुटण्यास निश्चित मदत होईल.