October 6, 2024
Remembrance of Development Engineer Vishweshwaraya (2)
Home » Privacy Policy » स्मरण विकासकर्मी अभियंत्याचे   
विशेष संपादकीय

स्मरण विकासकर्मी अभियंत्याचे   

धरणबांधणी , पाणीपुरवठा , मलनिःसारण , पूरनियंत्रण याचबरोबर शेती , उद्योग , शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील भारतरत्न सर मोक्षगुंडम  विश्वेश्वरय्या यांचा दृष्टीकोन विकासकर्मी होता.  पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्यांचे शिक्षण, कार्यकारी अभियंता पदावरील कारकीर्द , खडकवासला धरणावरील स्वयंचलित दरवाजे अशा गोष्टींमुळे पुणे शहराशी त्यांचे नाते कायमस्वरूपी जोडले गेले.  

प्रकाश मेढेकर, स्थापत्य अभियंता

१५ सप्टेंबर म्हणजे अभियंता दिन.  संपूर्ण देशाला  आदर्शवत  असणाऱ्या  भारतरत्न सर मोक्षगुंडम  विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस . काही व्यक्ती जन्मतःच मोठे गुण घेऊन जन्माला येतात . त्यांचे मोठेपण आभाळाइतके उंच असते .  एकशे एक वर्षाचे दीर्घायुष्य त्यांना लाभले . आजच्या आधुनिक भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक , आर्थिक नियोजनाचे सुरवात करणारे ते एक महान स्थापत्य विशारद होते . त्यांच्या जन्मजात गुणवत्तेला अखंड प्रयत्नांचा परीसस्पर्श लाभला . आजच्या आणि भावी  अभियंत्यांनी  त्यांच्या अभियांत्रिकीतील  दैदिप्यमान कारकि‍र्दीचे  आणि  मौल्यवान विचारांचे स्मरण असणे आवश्यक आहे. ते म्हणत  “निसर्ग आपणाला भरभरून देत असतो परंतु केलेल्या चुकांना कधीच माफ करीत नाही ”. आज देशात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमागे  मानवनिर्मित चुकांचा सहभाग असल्याचे अनेकदा  उघडकीस येते .  देशाला  कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदी जोड प्रकल्प व्हावा असे त्यांचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले .म्हणूनच  देशाच्या एका भागात ओला आणि दुसरीकडे कोरडा दुष्काळ असे चित्र आज  पहायला मिळते. विश्वेश्वरय्या यांनी  डिझाईन  केलेल्या जलसिंचनाच्या विविध पद्धती कृषी क्षेत्राला आजच्या काळातील मोठी देणगी म्हणता येईल. सरांचे विविध क्षेत्रातील कार्य अष्टपैलू  आणि अलौकिक होते . कठोर परिश्रम , शिस्तबद्ध व सुनियोजित कार्यपद्धती , कार्यकुशलता आणि सौजन्यपूर्ण सेवा हि चतुसूत्री त्यांनी आयुष्यभर अंगिकारली .

 धरणबांधणी , पाणीपुरवठा , मलनिःसारण , पूरनियंत्रण याचबरोबर शेती , उद्योग , शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील त्यांचा दृष्टीकोन विकासकर्मी होता.  पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्यांचे शिक्षण, कार्यकारी अभियंता पदावरील कारकीर्द , खडकवासला धरणावरील स्वयंचलित दरवाजे अशा गोष्टींमुळे पुणे शहराशी त्यांचे नाते कायमस्वरूपी जोडले गेले. आपल्या दैदिप्यमान आयुष्यात त्यांनी अनेक पुस्तके लिहली , महत्वाकांक्षी  प्रकल्प पूर्ण केले त्यामुळे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले .

  सन १९५५ मध्ये “ भारतरत्न ” हा  सर्वोच्च नागरी सन्मानाचा किताब देण्याचे भारत सरकारने ठरविले आणि त्यांची अनुमती मागणारे पत्र त्यांना पाठवले . त्या  पत्राला दिलेले  त्यांचे उत्तर अत्यंत निर्भीड , आणि त्यांच्या स्वभावावर  प्रकाशझोत टाकणारे होते . ते लिहतात  “आपण देशाचा सर्वोच्च किताब देऊन माझा गौरव करू इच्छीत आहात त्याबद्दल धन्यवाद . परंतु असा सन्मान स्वीकारल्यानंतर शासनाने केलेल्या  कामांचे मी कौतुक करावे आणि फक्त चांगले बोलावे अशी अपेक्षा कृपया माझ्याकडून बाळगू नका . मी प्रत्यक्षदर्शी स्थितीवर विश्वास ठेवणारा माणूस आहे . मला जे दिसेल ते मी बोलणारच आणि जे बोलणार ते तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही हा किताब मला द्यावा.” वयाच्या ९४ व्या वर्षी असे निर्भीड आणि परखड  विचारांचा अभियंता आजच्या काळात होणे  दुर्मिळच म्हणता येईल. खरोखरच ते “ भारतरत्न ” होते. गुणवत्ता आणि बुद्धीमत्ता यामुळे चकाकणारे ते माणिक रत्न होते .

 देशाचे भवितव्य घडवणाऱ्या आजच्या आणि भावी  अभियंत्यांना त्यांचे विचारधन यशाचा मार्ग दाखवणारे  आहे. ते म्हणत आळस हा मानव जातीला असलेला सर्वात मोठा शाप आहे . चांगले काम करून कमवा आणि जगा. कठोर परिश्रम ,शिस्त ,समाधान आणि आनंद हे आपल्यासाठी परवलीचे शब्द असले पाहिजेत. इतरांनी केलेल्या चांगल्या  कामाची स्तुती करा. कामातून आनंद मिळवणे प्रत्येकाने शिकले पाहिजे. ज्ञान हीच शक्ती आहे. एकत्र कार्य करायला शिका . स्वत: वेळेबाबत जागरुक रहा व इतरांपासून तीच अपेक्षा ठेवा . स्वतःच्या कार्याची एक सरळ रेषा आखा परंतु इतरांच्या वक्ररेषांचा त्यास स्पर्श होऊ देऊ नका . आपल्याला दिवसातून कमीत कमी दहा तास कार्यरत राहून स्वतःच्या मिळकतीच्या आत आनंदी जीवन जगता आले पाहिजे. भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला अमेरिकेकडून गती व जर्मनी कडून कठोर परिश्रम या गोष्टी शिकाव्या लागतील. नेता बनणाऱ्या व्यक्तीमध्ये राष्ट्रप्रेम व चारित्र्य हे गुण असायला पाहिजेत . हुशारी पेक्षा चारित्र्य अधिक मह्त्वाचे आहे . प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या पायावर उभे असावे . आपण आहोत त्यापेक्षा जास्त दाखविण्याचा प्रयत्न करू नये . मानवी शरीराला कोणत्याही विश्रांतीची गरज नसते. कामात केलेला बदल हीच विश्रांती होय असे त्यांचे म्हणणे होते .

 विश्वेश्वरय्या यांनी  आपली  संपूर्ण कारकीर्द  सरकारी सेवेत देशासाठी अर्पण केली. स्वतःच्या वैयक्तिक जीवनात पैशाचा मोह कधी ठेवला  नाही . स्वच्छ , प्रामाणिक , चारित्र्यवान, परिश्रमी आणि ज्ञानाचे भांडार असणाऱ्या या   आदरणीय व्यक्तिमत्वाला कोटी कोटी प्रणाम .


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading