सिमेंटची जंगलं म्हणजे सुख भोगण्यासाठी बांधलेली मोठी घरे आणि घरे जंगल तोडून बाधलेली असल्याने प्राण्यांना किती दुःख होते. ते दुःख ती वेदना ही कादंबरी सांगून जाते. मुलांना नक्कीच ही आवडणारी कादंबरी आहे.
प्रा.रामदास केदार
उदगीर
मो. ९८५०३६७१८५
प्राण्यांच्या कल्पक संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी पर्यावरणीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉ. श्रीकांत पाटील यांनी “सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल” ही खूप मजेशीर कादंबरी लिहिली आहे. यांना महाराष्ट्र शासन व साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने देण्यात येणारा ग. त्र. माडखोलकर साहित्य संशोधन पुरस्कार व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
श्रीकांत पाटील यांनी ही बालकादंबरी लॉकडाऊनमधील माणसांची परिस्थिती आणि त्यांचे निरक्षण करणारी ही जंगलातील प्राण्यांची सगळी टीम यावर लेखन केलेले आहेत. जंगलात दररोज या प्राण्यांची शाळा भरते आणि मग हत्तीला शाळेचे मुख्याध्यापक करतात. तर शिक्षक म्हणून चित्ते (निलनी), वानरे (सहदेव), वाघ (विश्वजीत), काळविटे (मॅडम), गाढव (शिपाई) तर सिंह या वनराईचा व संस्थेचा राजा असतो. जंगलातील प्राण्यांची ही शाळा म्हणजे एकदम भन्नाटच असते. दररोज प्रार्थना, परिपाठ झाल्यांशिवाय शाळा भरत नाही. हा दररोजचाच नित्यक्रम असतो.
एक दिवस वानर नावाचे विद्यार्थी गैरहजर राहिल्याने सगळ्या या गुरुजींना प्रश्न पडतो की, आज ही वानरं मुलं का आली नाहीत ? हे सगळे वानर विद्यार्थी रानात धुमाकूळ घालतात. हवे तेवढे आंबे, मकांचे कणसं खातात. खूप मजा करतात. त्यातल्या एकाला प्रश्न पडतो की, आज कुणीच शेतकरी दिसत नाही. काय झालं असावे म्हणत गावाच्या दिशेने जातात तर गावही सामसूम झालेले दिसते. या घरावरुन त्या घरावर उड्या मारत असतात. तरी माणसं खिडकीतून बाहेर बघतात. दार उघडत नाहीत. इतक्यात भोंगा वाजवत गाडी येते. आणि कोरोना विषाणू रोगाची माहीती देते. तेंव्हा या वानरं मुलांना कळते की, हा भयंकर मोठा रोग असणार? तेंव्हाच ही माणसं दरवाजा उघडत नाहीत. जेवढी मजा करायची तेवढी करुन ही वानरं मुलं जंगलात जातात.
दररोज सारखी शाळा भरते. हत्ती मुख्याध्यापक कालच्या गैरहजेरीत असलेल्या वानरं मुलांची झडती घ्यायला सुरुवात करतो. वानरं मुलं सगळी हकीकत सांगतात. लोकांनी आपलं जंगल तोडलं आणि सिमेंटच जंगल उभं केलय. पण आज गाव ओसाड झालाय. कोरोना का काय म्हणत्यात त्यो रोग आलाय गावात. सगळे बसल्यात घाबरुन घरात. हे सगळे नवलाईचे बोलणे ऐकून सगळ्यांना कौतूक वाटते. आणि हीच वेळ आहे आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी सिमेंटच्या जंगलात सहल काढण्याची.
हत्ती, वाघ, हरिण, चित्ते या शिक्षकांची बैठक ठरते आणि मग सिमेंटच्या जंगलात सहल काढण्यासाठी परवानगी घेण्यासाठी जातात. सिंह राजाला सगळी हकीकत सांगतात. पण सिंहाला हे खरे वाटत नाही.
तो म्हणतो, या माणसांनी आपल्या जंगलावर अतिक्रमण केलं. झाडे तोडली आणि सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या यामुळेच आपणाला जंगलात दाटीवाटीने राहावे लागत आहे. शिवाय त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आहेत. आम्ही लहान असताना या माणसांनी आपल्या पुर्वंजासोबत खूप त्रास दिला. मारुन खालं. आता या माणसांच्या गावात कसं जाणार ? असे सिंह म्हणतो. तेंव्हा हीच खरी माणसांना बघायची संधी आहे. पण वाघ सर, म्हणता तेवढे सोपे नाही. ही माणसे स्वार्थी आणि शिकारी वृत्तीचे आहेत. अचानक बाहेर येऊन आपल्या मुलांवर हल्ले करतील.
त्यावर वानरे गुरुजी म्हणाले, नाही असे होणार नाही. कोरोनाने माणसं बाहेर येण्यासाठी खूप भीत आहेत. जीव वाचवण्यासाठी घराचे दार बंद करून बसले आहेत. कोरोनाने चागला धडा शिकवला या हैवान माणसाला. हे ऐकून सिंहाने सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल काढण्याची परवानगी दिली. सगळ्यांना आनंद झाला. ठरल्याप्रमाणे सहल गावात येते. सगळ्या प्राण्यांना ही सिमेंटच्या जंगलातील माणसं खिडकीतून बाहेर बघू लागतात. सगळे प्राणी आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात. गावतील सगळ्या बाबींचे निरक्षण करतात. हा या कादंबरीचा मुळ गाभा आहे.
लेखकाने खूप मजेशीर असा प्राण्यांचा संवाद मांडलेला आहे. जंगल तोडून ही माणसं सुख कशी भोगतात. मुक्या प्राण्यांना त्रास कसे देतात ? त्यांची हत्या करून पोट भरुन घेतात. घाण, कचरा जंगलात टाकून देतात. मोठ्या कंपन्या उभा करून धुरांचा वास मुक्या प्राण्यांना कसा देतात. जंगल तोडल्यामुळे या प्राण्यांना पाणी मिळत नाही, सावली मिळत नाही. त्याचे वाईट परिणाम कसे भोगावे लागतात हा सांगण्याचा प्रयत्न लेखक करत असल्याचे दिसून येते.
माणसे किती स्वार्थी असतात हे मुक्या प्राण्यांना कळू लागते. यामुळे हे प्राणी माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करु लागतात. ही आजची मोठी शोकांतिका आहे. सिमेंटची जंगलं म्हणजे सुख भोगण्यासाठी बांधलेली मोठी घरे आणि घरे जंगल तोडून बाधलेली असल्याने प्राण्यांना किती दुःख होते. ते दुःख ती वेदना ही कादंबरी सांगून जाते. मुलांना नक्कीच ही आवडणारी कादंबरी आहे. यात एकही माणसांचे पात्र लेखकाने उभे केलेले नाही तर सर्व पात्र ही प्राणीच आहेत. त्यांचा तो कल्पक आणि महत्वपूर्ण असा संवाद मुलांच्या मनाला भुरळ घालणारा आहे. मुक्या प्राण्यांच्या मनातील भावना या कादंबरीतून अधोरेखित करण्याचा प्रयत्न श्रीकांत पाटील यांनी केलेला आहे. कोरोनाने माणसाला कशी अद्दल घडविली. हे सांगण्याचा प्रयत्नही ही कादंबरी करते. डॉ. सुरेश सावंत यांची आशयात्मक पाठराखण आहे. श्रीरंग मोरे यांचे सुंदर व बोलके मुखपृष्ठ आहे. पुर्ण कादंबरी रंगीन व चित्रमय असल्याने मुलांना नक्कीच आवडणारी आहे.
पुस्तकाचे नाव – सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल (बालकादंबरी)
लेखक – डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशक – हृदय प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे – ६४ किंमत – २५० रुपये