February 29, 2024
Boom in the construction sector book review by Mahadev Pandit
Home » बांधकामविश्वाची समृद्ध भ्रमंती
संशोधन आणि तंत्रज्ञान

बांधकामविश्वाची समृद्ध भ्रमंती

स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा उपयोग मानवाने आपले जीवन सुखकर बनविण्यासाठी केला. त्यामुळेच बांधकाम क्षेत्राची ही प्रगती म्हणजे ‘गरुडझेप’ आहे, असे लेखकाला वाटते. हा विचार समोर ठेवून जगभरातील घरे, शहरे, कार्यालयांची रचना, रस्ते वाहतूक, विमानतळ सुविधा यातील प्रगतीचा आलेख अतिशय संवेदनशील आणि अभ्यासूवृत्तीने मांडला आहे.

महादेव पंडित
स्थापत्य सल्लागार, ठाणे

आजमितीला अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत आजामाचा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी शिक्षण, वाहतूक, आरोग्य, इंटरनेट या अतिरिक्त चौकोनाची गरज भासते आहे. या व्यतिरिक्त ‘पर्यटन’ या आठव्या गरजेने मानवी गरजांचा अष्टकोन पूर्ण होतो. मनुष्याला प्रेरणा देणारा किंवा त्याच्या जीवनात वेगळा आनंद देऊन जाणारा क्षण म्हणजे पर्यटन! जगभरातील विविध पर्यटनस्थळांना त्यासाठी भेटी दिल्या जातात आणि अशी ठिकाणे ही बहुतांशी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असतात. त्या जगप्रसिद्ध स्थळांच्या मागे असणारी स्थापत्यशास्त्राच्या योगदानाची माहिती अनेकदा त्याठिकाणी भेट दिलेल्या व्यक्तींनाही असतेच, असे नाही. पण, ती खरोखरच रंजक, ऐतिहासिक आणि अचंबित करायला लावणारी असते. त्याविषयीची उत्सुकता ‘बांधकाम क्षेत्राची गरुडझेप’ या पुस्तकात प्रकाश मेढेकर यांनी पूर्ण केली आहे. एकूणच स्थापत्यशास्त्राविषयी ज्ञान, माहिती आणि संबंधित जगप्रसिद्ध स्थळांविषयी असलेल्या आत्मीय जाणिवेचा खजिनाच जणू वाचकांसाठी खुला केला आहे.

भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, ‘बहाई टेम्पल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’, ‘कोकण रेल्वे’, ‘मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग’, ‘भाक्रा नांगल धरण’ यांच्यासह जगप्रसिद्ध ‘पिरॅमिड ऑफ गिजा’, ‘चीनची भिंत’, इटलीतील ‘पिसाचा झुकलेला मनोरा’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’, ‘मरीना सिटी’, ‘बुर्ज अल् अरब’, ‘मिरॅकल गार्डन’, ‘युरो टनेल’ यांची निर्मिती म्हणजे प्राचीन व आधुनिक काळातील बांधकाम क्षेत्रातील आश्चर्यांची उदाहरणे आहेत. ही स्मारके किंवा सुविधा उभारण्यामागे नेमकी कोणती गणित केली गेली असतील किंवा त्यामागच्या प्रेरणा काय असतील, याचा आपण विचारच करतो राहतो. पण, त्यामागे कदाचित हजारो हात राबले असतील, अनेक वर्षे ते काम चालले असेल, मोठा खर्च केला गेला असेल आणि त्याही पलीकडे स्थापत्यशास्त्राची जाण असणाऱ्या अभियंते आणि कलाकारांनी आपली कल्पनाशक्ती कशी वापरली याची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये लेखकाने मांडली आहे. कदाचित याची सर्व तांत्रिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध असेल पण त्यामागे असणारी मानवी प्रेरणा आणि मानवी दृष्टिकोन केवळ या पुस्तकातूनच वाचकाला मिळू शकेल, हे या पुस्तकाचे आणि स्वतः स्थापत्य अभियंता असणाऱ्या लेखकाचे यश आहे, असे ठामपणे सांगता येईल.

स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा उपयोग मानवाने आपले जीवन सुखकर बनविण्यासाठी केला. त्यामुळेच बांधकाम क्षेत्राची ही प्रगती म्हणजे ‘गरुडझेप’ आहे, असे लेखकाला वाटते. हा विचार समोर ठेवून जगभरातील घरे, शहरे, कार्यालयांची रचना, रस्ते वाहतूक, विमानतळ सुविधा यातील प्रगतीचा आलेख अतिशय संवेदनशील आणि अभ्यासूवृत्तीने मांडला आहे. बांधकाम साहित्य, शहर आणि घरांच्या रचना, ऊर्जा आणि पर्यावरण या तीन प्रकरणांमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. खोदाई विरहित बांधकाम निर्मिती, गगनचुंबी इमारतींची संरचना, बोगदे निर्मितीतील तंत्रज्ञान यांतील माहिती बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच सर्वसामान्य वाचकांच्याही ज्ञानात भर घालणारी आहे. प्रकाश मेढेकर यांनी या क्षेत्रात भारतासोबत अद्यावत तंत्रज्ञानाने पुढारलेल्या अशा इराक, ओमान व मलेशिया या देशांत विविध पदांवर यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. त्यांच्या या अनुभवसिद्ध माहितीचा उपयोग त्यांना पुस्तक लिहिताना झाल्याचे पानोपानी जाणवते. त्यामुळे २३ प्रकल्पांची इत्यंभूत व रंजक माहिती चित्रांसहीत त्यांनी सादर केली आहे. भारतातील पर्यटकांसाठी हे पुस्तक अनमोल ठेवा ठरेल.

स्मार्ट पार्किंग, सुरक्षित बांधकाम पद्धती, वॉकिंग प्लाझा, कचरा व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प या विभागातील सर्व प्रकरणे महापालिका, जिल्हा परिषदा, सामाजिक कार्यकर्ते या सामाजिक घटकांना उपयुक्त आहेत.

लेखकाविषयी :

प्रकाश मेढेकर हे १९८२ सालचे पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे स्थापत्य शाखेचे विशेष श्रेणीतील पदवीधर अभियंता आहेत. त्यांनी या क्षेत्रात भारतासोबत अद्यावत तंत्रज्ञानाने पुढारलेल्या अशा इराक, ओमान व मलेशिया या देशांत विविध पदांवर यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. त्यांचे ‘दिशा बांधकाम निर्मिती’चे हे पुस्तक यापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे पुस्तक माहितीपूर्ण आणि वाचनाचा आनंद मिळवून देणारे आहे. ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती’ असे आपण म्हणतो. खरोखरच भिंतीना जिवंतपणा तिथे राहणाऱ्या माणसांमुळेच येत असतो. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध स्थळांबद्दलही असे म्हणता येईल की जगभरातील माणसांचा या स्थळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच या वास्तूंचे महत्त्व वाढवतो.

लेखकानेही या वास्तूंची निर्मिती उलगडताना त्यामध्ये असणारा मानवी दृष्टिकोनच अधिक व्यापक केला आहे. घरे, रस्ते, वाहतूक, पर्यावरण याविषयी लिहिता आपल्या सभोवतालच्या परिसराशी लेखकाने अधोरेखित केली आहे.

पुस्तकाचे नाव : बांधकाम क्षेत्राची गरुडझेप
लेखक : प्रकाश मेढेकर
प्रकाशक : सकाळ प्रकाशन
मूल्य : ₹२५०, पृष्ठे : १५८

Related posts

यंदा उसाचे 465.05 दशलक्ष टन इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

सुपारीची फुले…

Neettu Talks : आरोग्यासाठी दही का आवश्यक आहे ?…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More