November 7, 2024
Color alert but then is there such rain in Mumbai
Home » रंगीत अलर्ट, पण मग मुंबईत तसा पाऊस आहे काय !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रंगीत अलर्ट, पण मग मुंबईत तसा पाऊस आहे काय !

              १- गेल्या ३ आठवड्यापासून म्हणजे १८ जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकण व गोव्यासाठी अतिजोरदार पाऊस पडावा, असेच वातावरण आजपर्यंत टिकून आहे. हे वातावरण जुलै अखेर पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता आहे.
                ह्या अतिजोरदार पावसाच्या शक्यतेबरोबर अधून- मधून कोकणसाठी कधी रेड तर कधी ऑरेंज असे अलर्ट दिले जात आहेत.

                 रंगीत अलर्ट म्हणजे मुंबईत हा:हाक्कार माजवणारा पाऊस होणार आहे काय? हे रंगीत अलर्ट म्हणजे अधिक तीव्रतेच्या पावसाचे सूचक आहेत काय? नेमका अर्थ काय?

                  रंगीत अलर्ट म्हणजे पावसाची अतितीव्रता असा सरळ अर्थ असु नये. पावसाबरोबर, ढगफुटी, महापूर, विजा पडणे, गारपीट होणे. छोटे छोटे तलाव फुटणे, शेतपिके वाहून जाणे, कच्चे घरे, इमारतींची पडझड होणे अश्या प्रकारच्या आपत्तीची शक्यता ह्या वातावरणातून असल्यामुळे सावधानता बाळगणे किंवा प्रशासनाला नियोजनासाठी सूचना देण्यासाठी तसेच मानवी जीवित व वित्तहानिच्या धोक्यापासून बचावासाठी साठी हे अलर्ट असतात. अतितीव्रतेच्या पावसासाठी वेगळी सूचकदर्शकता असते. विशेषतः मुंबईतील जनजीवन ह्याचा अर्थ वेगळा काढते, ह्यासाठीच हे स्पष्टीकरण केले आहे.

            २- सध्या गेल्या ३ ते ४ दिवसापासून कोकणातील मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर येथे पाऊस तर होतोच आहे, परंतु त्यापेक्षाही  गोवासहित संपूर्ण सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी, तसेच रायगड जिल्ह्यातील काही भागात किती तरी अधिक तीव्रतेचा म्हणजे १५ से.मी.ते २५ से. मी. इतका पाऊस सध्या होत आहे.  दि. १२ जुलै पासून उत्तर कोकणातील जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता जाणवते.

                ३-अरबी समुद्रात दक्षिण गुजराथ ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर अश्या अंदाजे १५०० किमी. लांबीची व समुद्रसपाटीपासून साधारण दिड किंवा त्या पेक्षा अधिक उंचीपर्यंतचा हवेच्या  कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी ‘V’ अक्षरासारखा द्रोणीय तटीय  आस म्हणजेच त्याला ‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ म्हणतात.
सध्या तेथे त्याच्या अस्तित्वामुळे सध्या कोकण, घाटमाथा येथे जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मध्यम पाऊस होत आहे.

           ४-परंतु सध्याच्या एन्सोच्या तटस्थ काळात दक्षिण गोलार्धतील हवेच्या उच्चं दाबाचा ‘ मस्करीन हाय ‘ हा त्याच्या सरासरी दाबापेक्षा गेल्या काही दिवसापासून कमी-अधिकच आहे. विशेषतः कमीच आहे. आणि हीच स्थिती मजबूत नसल्यामुळे ताकदीने सह्याद्री ओलांडणाऱ्या मोसमी वाऱ्याचा अभाव जाणवत आहे. परिणामी खान्देश ते कोल्हापूर-सोलापूर पर्यन्तच्या वर्षाच्छायेच्या प्रदेशात सध्या आपल्याला कमी पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading