June 7, 2023
Longevity secrets of Hunja valley Community
Home » हुंजा पर्वतरांगातील तारुण्यामागचे रहस्य
संशोधन आणि तंत्रज्ञान

हुंजा पर्वतरांगातील तारुण्यामागचे रहस्य

काश्‍मीरमधील हुंजा या पर्वतमय प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींना मेडिकल आणि दवाखाना काय असतो हेच मुळात माहीत नाही. त्यांनी कधीही आधुनिक विज्ञानाने निर्माण केलेली औषधे घेतलेली नाहीत, इतके त्यांचे आरोग्य सुदृढ आहे. इतकेच नव्हे, तर येथील व्यक्ती दीर्घायुषी आहेत. कमीत कमी ते १२० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात, तर महिला वयाच्या ६५ व्या वर्षीही गर्भधारणा करू शकतात. या तारुण्यामागचे रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे

भूक लागली की, अक्रोड, अंजीर, जर्दाळू (खुबानी) खायचे. तहान लागली की, नदीचे पाणी प्यायचे. एखादा किरकोळ आजार झाला तर वनौषधी घ्यायची. अशामुळे येथील लोक दीर्घायुषीही आहेत. जवळपास १२० वर्षे त्यांचे आयुष्यमान असते. हुंजा पर्वतमय प्रदेशातील या जमातीबद्दल सर्वप्रथम डॉ. रॉबर्ट मॅक्कॅरिसन यांनी पब्लिकेशन स्टडीज इन डेफिशियन्सी डिसिज यामध्ये लिहिले होते. त्यानंतर जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये यावर लेख प्रकाशित झाला होता. संशोधनात दीर्घायुषी होण्याबाबतची काही कारणे विषद केली आहेत. त्यानुसार येथील नागरिक शून्यापेक्षा कमी तापमानातही गार पाण्याने आंघोळ करतात. आवश्यक तेवढाच आहार घेणे (कमी खाणे) आणि अधिक चालणे-फिरणे ही त्यांची जीवनशैली आहे. हे त्यांचे दीर्घायुषी होण्यामागचे रहस्य आहे. जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनीसुद्धा दीर्घायुषी होण्याबाबत हेच कारण असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच सकाळी लवकर उठणे आणि नेहमी पायी प्रवास करणे ही त्यांची जीवनशैली हेच दीर्घायुषी होण्यामागचे रहस्य असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डॉ. जे. मिल्टन हॉफमॅन यांनी हुंजा पर्वतरांगात राहणाऱ्या या व्यक्तीशी समक्ष भेट घेऊन त्यांची जीवनशैली अभ्यासली. तसेच दीर्घायुषी होण्यामागची कारणेही शोधली. १९६८ मध्ये या संदर्भातील मिल्टन यांचे हुंजा सिक्रेट्स ऑफ द वर्ल्डस हेल्दिएस्ट अँड ओल्डेस्ट लिव्हिंग पीपल असे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

प्रदूषणमुक्त पर्यावरणच कारणीभूत…

हुंजा येथील पर्यावरणच दीर्घायुषी होण्याचे कारण ते सांगतात. येथे गाड्यांचा धूर नाही. पाण्याचे प्रदूषण नाही. शुद्ध हवा आणि पाण्यामुळेच ते निरोगी राहतात, असे मानतात. येथील नागरिक खूपच काबाडकष्ट करतात. पायी प्रवास करतात. चालणे-फिरणे आणि अंग मोडून काम केल्यामुळेच ते वयाच्या ६० व्या वर्षीही तरुण दिसतात. येथील बहुतांशी नागरिक हे आयुष्याच्या शेवटपर्यंत निरोगी असतात. आजारापासून मुक्त असतात. हुंजा पर्वतरांग ही भारत-पाकिस्तान सीमाभागात मोडते. गिलगित-बाल्टिस्थानच्या पर्वतरांगात सुमारे ८७ हजार नागरिक राहतात. आधुनिक जगात प्राधान्याने होणारे हृदयविकाराचे आजार, जाडेपणा, रक्तदाब, कर्करोग अशा रोगांची नावानेसुद्धा ओळख या व्यक्तींना नाही.

जर्दाळूची शेती अन् पौष्टिक आहार

या भागात जे पिकते त्याचेच पदार्थ हे खातात. मुख्यतः या भागात जर्दाळूची शेती होते. जर्दाळूला इंग्रजीमध्ये अप्रिकोट असे म्हणतात, तर अफगाणी भाषेत खुबानी असे म्हणतात. तज्ज्ञांच्या मते जर्दाळूची शेती ही भारतात तीन हजार वर्षांपासून केली जाते. काश्‍मीर, हिमाचल प्रदेशात याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुख्यतः उन्हाळ्यात येणारे हे पीक आहे. ही फळे खाल्ल्याने त्वचा सुंदर होते. जर्दाळूमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्व, याबरोबरच पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि फॉस्फरस हे खनिज पदार्थ असतात.

जर्दाळूव्यतिरिक्त विविध फळे, भाजीपाला व अन्नधान्यामध्ये बाजरी आणि बकव्हिट (कुटू) यांचे उत्पादन घेतले जाते. यापासूनच तयार केलेले पदार्थ त्यांच्या आहारात असतात. यामध्ये तंतुमय पदार्थ आणि प्रोटिन्सचे प्रमाण व खनिजे अधिक असल्याने ते शरीरास पोषक असते. अक्रोटचाही वापर आहारात मोठ्या प्रमाणात असतो. यातून बी -१७ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. अशा प्रकारचा पौष्टिक आहार हे सुद्धा त्यांच्या दीर्घायुषी आणि सौंदर्यामागचे रहस्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Related posts

काचेचा शोध कसा लागला ? काय आहे इतिहास…

काजव्यावरील शास्त्रीय अभ्यास…

जंतू नष्ट करणारे ‘एअर फिल्टर’ विकसित

Leave a Comment