November 7, 2024
Forts in Kolhapur Sandeep Tapkir Book
Home » कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना
पर्यटन

कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना

लिहिते राहा…

इतिहासाची दिंडी येथून गर्जत गेली पुढे।
पालखीतल्या मानकऱ्यांस्तव दुमदुमले चौघडे॥
त्या सर्वांची राख अजूनी धुमसत आहे या स्थळी।
जिथे न पणती, जळे पडे वा, सुमनांची पाकळी॥
त्या राखेला नकोत मुजरे, नकोत माळा – तुरे।
अरे, आठवणीची एक जाग, तुझ्या हृदयामधली पुरे॥

याच भावनेतून अलीकडच्या काही वर्षांमध्ये माझे स्नेही संदीप भानुदास तापकीर हे कार्यरत आहेत. विशेषतः मराठमोळ्या गड-कोटांची आणि शिवचरित्राची त्यांना विलक्षण आवड आहे. इतिहासाबद्दलचं प्रेम डोळस आहे आणि ते इतरही शिवभक्तांमध्ये यावं, यासाठी ते अनेक उपक्रम करत असतात. ‘दुर्गांच्या देशातून…’ हा केवळ गड-किल्ल्यांशी संबंधित विषयांना वाहिलेला दिवाळी विशेषांक ते दरवर्षी प्रसिद्ध करतात आणि किल्ल्यांसंबंधीची अनेक पुस्तकंही लिहून प्रकाशित करत असतात.

ज्यांना इतिहासाची डोळस जाण नाही; त्यांना वर्तमानकाळात बहुधा गोंधळलेल्या वातावरणातच भविष्याचा वेध घ्यावा लागतो. नेहमीच इतिहासात रमून जाणं, हे फारसं योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं असलं तरी, ‘जे इतिहास विसरतात, त्यांचा भूगोलही बदलतो,’ हेही त्याच वेळी आवर्जून लक्षात घ्यायला हवं. केवळ पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा (सोयीनुसार) सांगून किंवा जयंत्या-पुण्यतिथ्यांना सार्वजनिक वर्गण्यांमधून केवळ मिरवणुका काढणं, पुतळे उभारणं आणि सर्व प्रजेला बहिरं करून सोडण्याइतकं ध्वनिप्रदूषण करीत राहणं, याचं सध्याच्या काळात अक्षरशः पेव फुटलं आहे. विशेषतः शहरी भागात तर असे ऐतिहासिक समारंभ सर्वाधिक लोकांना त्रास देऊन, वाहतुकीची कुचंबणा करून, शासकीय नियम पायदळी तुडवूनच करायचे असतात, असा तथाकथित इतिहासप्रेमींचा एक ठाम (गैर)समजच होऊन बसलाय. अशा मंडळींना अद्दल घडवण्याऐवजी त्यांनाच स्वतःच्या मतांच्या राजकारणासाठी रसद पुरवली जात असल्यानं आपल्याकडे इतिहास आणि त्याच्याशी संबंधित अनेक कार्यक्रम हे काही अर्धशिक्षित बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत, हे दुर्दैव आहे.

खेरीज, आपल्या इतिहासातील विशेषतः शिवचरित्रातील अनेक घटना, प्रसंग, व्यक्ती, पत्रव्यवहार यासंबंधी पुरेसा अभ्यास, संशोधन न करता, पूर्वग्रहदूषित भूमिकेतून चिथावणीखोर, जातिद्वेष वाढवणारी भाषणं करीत फिरणं, हाही सांप्रतकाळी अनेकांच्या पोटापाण्याचा उद्योग झाला आहे. तर समाजातल्या अशा काही मंडळींना पदरी ‘तैनाती फौजे’सारखं बाळगून आपल्या स्वार्थी राजकारणासाठी त्यांचा वापर करून घ्यायचा, हा तर राजकारणातील बहुपक्षीय जाणत्या मंडळींचा प्रासंगिक खेळ होऊन बसलाय. या सगळ्यांमुळेच आपल्या प्रेरणादायी इतिहासाविषयी आस्था, आदर, प्रेम वाटत असूनही वर्तमानकाळात अनेक जण इतिहासाच्या अभ्यासाकडे वळत नाहीत, असे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर विशेषतः शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेले महाराष्ट्रातील गड-कोट फिरणे, तिथं आपल्यासमवेत इतरही अनेकांना सतत घेऊन जाणे, त्यासंबंधीची माहिती अभ्यासणे, त्यासंबंधी विविध माध्यमांतून लेखन करणे, जनजागरण करणे यांकडेही नव्या पिढीतील काही इतिहासप्रेमी युवक – युवती जाणीवपूर्वक वळताना दिसत आहेत, ही खूप समाधानाची बाब आहे. प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संदीप तापकीर हेही त्यांपैकीच एक. ‘रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले’ या शीर्षकाचं त्यांचं हस्तलिखित नुकतंच वाचलं. त्यांनी याबाबत मी प्रस्तावना लिहावी, अशी खूप आग्रही विनंती केली, त्यामुळं ते आणखी बारकाईनं वाचलं.

माझे वडील सु. रा. देशपांडे हे शिक्षक, पत्रकार, समाजसेवक आणि गड-कोटांवर विलक्षण प्रेम असणारे शिवभक्त म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वपरिचित होते. भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व कामगिरी बजावलेले आणि शिवचरित्रावरील प्रतिभासंपन्न अजरामर चित्रपटांची निर्मिती ज्यांनी केली, असे ख्यातनाम निर्माता, दिग्दर्शक भालजी तथा बाबा पेंढारकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर, आयुष्यभर व्रतासारखा इतिहासाचा अभ्यास केलेले पन्हाळ्याचे मु. गो. गुळवणी, ‘छावा’कार शिवाजीराव सावंत, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज बाळकृष्ण मालुसरे आणि अशा कितीतरी ऐतिहासिक घराण्यांमधल्या मंडळींचा माझ्या वडिलांना अनेक वर्षे खूप जवळून सहवास लाभला. प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासारख्या समवयीन इतिहास संशोधकाबरोबर माझ्या वडिलांनी काही इतिहास परिषदांमध्ये सहभाग घेतला; पण प्रामुख्यानं आयुष्यभर सतत ध्यास घेतला तो गड-किल्ल्यांवरच्या इतिहासापासून प्रेरणा घेण्याचा आणि त्या भागातील लोकांच्या अडचणी सोडवण्याचा.

या सर्व इतिहासमहर्षींच्या प्रेरणेतून त्यांनी हा ध्यास अखेरपर्यंत जपला. भुदरगडच्या पायथ्याशी पेठ शिवापूर इथे त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी धनगर बांधवांसाठी आश्रमशाळा सुरू केली. गडावरील भैरीच्या देवालयाचा जीर्णोद्धार, गडावर जाण्याचा रस्ता, तलावांची दुरुस्ती, भजनी मंडळाची स्थापना आणि शिक्षणाची सुविधा अशी अनेक कामं केली. इसापूरला बदली झाल्यावर चंदगड ते पारगड या दुर्गम रस्त्याचे २७ कि. मी. चे काम, पारगडावर जाण्यासाठी थेट रस्ता, गडावरील भवानी मंदिराचा जीर्णोद्धार यांत त्यांनी जीव ओतला. महाराष्ट्र विधानसभेचे भूतपूर्व अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून नेसरीजवळच्या कुपे-कानडेवाडी परिसरात सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांचं भव्य प्रेरणादायी स्मारक पूर्ण करून घेतलं. इतरही किल्ल्यांच्या परिसरात त्यांनी आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना नेऊन स्थानिक मंडळींच्या अडचणी सरकारदरबारी मांडून सोडवल्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व किल्ल्यांचे आणि स्मारकांचे २५/३० वर्षांपूर्वी त्यांनी स्वखर्चाने व्हिडीओ-चित्रीकरण करून घेतले होते. त्यावर आधारित ‘इतिहासाचे साक्षीदार’ हा रंगीत छायाचित्रांसह गड-कोट-समाध्यांवरील ग्रंथ त्यांनी अनंत कामतांसमवेत सिद्ध केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्याला प्रस्तावना दिली होती. इतिहाससंशोधक निनादराव बेडेकर यांच्या हस्ते किल्ले रायगडावर त्याचं प्रकाशन झालं होतं.

याखेरीज, संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव उपक्रम माझ्या वडिलांनी १९७४मध्ये पूर्ण केला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्यारोहणाचे ते त्रिशताब्दी वर्ष होतं. वडिलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांवरील आणि सर्व नद्यांचे जल एकत्र करून ‘गडगंगा कलश’ तयार केला होता. महत्प्रयासानं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सहकार्यानं तो घेऊन ते किल्ले रायगडावरील सोहळ्यास उपस्थित राहिले आणि महाराजांच्या पुतळ्यावर या कलशातील जलाचा अभिषेक करण्यात आला. संदीप तापकीर यांच्या या पुस्तकाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या या सर्व गड-कोटांवरील भ्रमंती आणि त्यासाठी वडिलांनी घेतलेले अफाट कष्ट डोळ्यांसमोर तरळत राहिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड या दोन किल्ल्यांच्या संदर्भात या पुस्तकात खूप तपशिलानं माहिती आली आहे. शिवकाळानंतर पुढे छत्रपती ताराराणींच्या काळात पन्हाळा हीच करवीरची राजधानी राहिली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना या पन्हाळ्याशी संबंधित आहेत. त्याचेही काही चांगले तपशील इथे नोंदवण्यात आले आहेत.

शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील पन्हाळा किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व लक्षात घेऊन या किल्ल्याच्या परिसराचा आणखी सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. आता केवळ पर्यटनस्थळ किंवा शिक्षणसंकुलांमुळे ओळखला जाणारा पन्हाळा त्याच्या ऐतिहासिक कामगिरीसह नव्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं तापकीर यांनी या पुस्तकात दिलेली माहिती खूप मोलाची आणि उपयुक्त ठरेल.

पन्हाळा – विशाळगडाबरोबरच तापकीर यांनी कोल्हापूर शहर आणि जोतिबा तीर्थक्षेत्राचीही माहिती दिली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरातील आणखी काही तपशील हवे होते. इतिहासाला वर्तमानाशी जोडू शकणारे हे तपशील नव्या पिढीतील मंडळींना अधिक जवळचे वाटू शकतात. कदाचित, जागेअभावी त्यांनी ते केलं नसेल. मात्र पन्हाळ्याजवळचा तुपाची विहीर असलेला पावनगड, अणुस्कुराजवळचा निबिड जंगलातील मुडागड आणि दाजीपूर अभयारण्यातील शिवगडाची प्राथमिक माहिती देऊन तापकीर यांनी शिवभक्तांना आणि अभ्यासकांना या दुर्लक्षित किल्ल्यांचा परिचय करून दिला आहे, याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अशा पुस्तकांमुळेच त्या परिसरातल्या लोकांनाही या दुर्लक्षित गड-कोट, वास्तूंचं महत्त्व लक्षात येऊ शकेल. प्रामुख्याने किल्ले पन्हाळा आणि विशाळगडाच्या माहितीसाठी सुमारे ४५ पानं देण्यात आली आहेत.

इंग्रजी राज्य आल्यानंतर किल्ले पुरंदरवर गोऱ्या शत्रूला पहिलं सशस्त्र आव्हान दिलं, ते उमाजी नाईक – खोमणे या रामोशी मर्दानं. इंग्रजांनी त्याचा पराभव करून त्याला फाशी दिली. कॅ. मॅकिन्टॉशनं त्याचं चरित्र लिहिलं. इ. स. १८४४मध्ये असाच इतिहास पन्हाळ्यावर घडला. कोळी बांधवांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि स्वराज्यासाठी इंग्रजांचे तोफगोळे झेलत झेलत ते बांधव हुतात्मा झाले. या घटना आज किती लोकांना माहिती आहेत ? नव्या पिढीतील युवक – युवतींना घेऊन, इतिहासातील एखादं सोयीचं कथानक घेऊन, त्यावर छचोरपणे प्रेमकथा रंगवून काढण्यात येणाऱ्या चित्रपटांमुळे नोटा छापल्या जातील; पण आमच्या इतिहासाचं काय ? आमच्या या जाज्वल्य इतिहासाच्या प्रेरणा या गड-कोट-स्मारकांत आहेत. दिग्पाल लांजेकर या तरुणानं जशा त्या ज्वलंतपणे चित्रपटांच्या मालिकेतून आणल्या, तशाच स्वरूपाचा प्रयत्न करत संदीप तापकीर हे सातत्यानं गड-कोटांच्या अभ्यासाचा जागर करून निष्ठेनं पुढं जात आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी आपला हा प्रेरणादायी वारसा सतत समाजासमोर मांडण्यासाठी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक.

डॉ. सागर देशपांडे

पुस्तकाचे नाव – रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना- कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, Mobile -9168682204
किंमत – १९५ रुपये
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा –

https://vishwakarmapublications.com/product/rangadya-durgavaibhavacha-khajina/



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading