अध्यात्माचे वेड लागावे अशी शिष्याची अवस्था होते. खरं म्हणजे वेडा माणूसच अजरामर इतिहास घडवत असतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागल्याशिवाय, त्यात वेडे झाल्याशिवाय अप्रतिम अशी कलाकृती निर्माण होत नाही. वेड असेल तरच हातून हे घडते. ही वेडी माणसेच असामान्य व्यक्तिमत्व घडवतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण धाडूनि देशें ।
स्तुतिमिषें पांचपिसें । बांधलें वाचे ।। १८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – महाराज, मला तुम्ही तसें केले आहे. आपण माझा मीपणा नाश करून स्तुतीच्या निमित्तानें माझ्या वाचेला वेड लाविलें आहे.
मीपणा गेल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती अशक्य असते. सद्गुरु शिष्यातील हा मीपणा घालवण्यासाठी नित्य अनुभूती देत असतात. जे काही घडते आहे भगवंतांच्या इच्छेने घडते आहे, माऊलीच्या इच्छेने घडते आहे. हा भाव, हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होणे इतके सोपे व सहज असे कार्य नाही. स्वतःतील अहंकार, मीपणा आपणास तसे करूही देत नाही. पण सद्गुरु शिष्याची प्रगती साधण्यासाठी या अनुशंगाने नित्य अनुभुती देत राहातात. तसा विश्वास, तसा भाव शिष्यामध्ये निर्माण करण्याचा ते नित्य प्रयत्न करत असतात. हा विश्वासच, हा भावच शिष्याला आत्मज्ञानाकडे ओढतो अन् शिष्याची आध्यात्मिक प्रगती घडवतो.
ही प्रगती हळूहळू होत असते. पटकण, क्षणात हा बदल घडत नाही. असा भाव उत्पन्न होण्यासाठी, विश्वास बसण्यासाठी शिष्याची तशी मानसिकता व्हावी लागते. पटकण एखाद्या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसेलच असे होत नाही. या घटनेमागे सद्गुरुंचे प्रयोजन काय आहे ? याची अनुभुती शिष्याला येत नाही तोपर्यंत शिष्याचा या गोष्टीवर, या घटनांवर कदापीही विश्वास बसत नाही. एखादी त्रासदायक किंवा नको असलेली घटना घडते तेंव्हा शिष्याचा विश्वास ढासळतो. हे असे कसे घडले ? इतकी साधी गोष्ट असताना याचे भान कसे राहीले नाही ? ही चुक आपल्या हातून घडलीच कशी ? असे वाटत राहाते. पण सद्गुरुंचे या घटनेमागील प्रयोजन त्याच्या लक्षात येते तेव्हा मात्र शिष्याचा विश्वास वृद्धींगत होतो. पण हे पटकण होत नसते. यासाठी बराच कालावधी जावा लागतो. हळूहळू या गोष्टी अनुभवाने शिष्यामध्ये उतरतात.
मनात विचार यावा आणि तसे घडावे. एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट अगदी सहजरित्या प्राप्त व्हावी. इतकी सहजता जीवनात सद्गुरुंच्याकृपेने प्राप्त होते. या घटनेची अनुभुतीही सद्गुरुंच्याकृपेने आधी येते. फक्त यामध्ये संयम आणि विश्वास हा महत्त्वाचा असतो. संयम ढळता कामा नये याची काळजी शिष्याने घ्यावी लागते. संयम ढळावा असे प्रयत्नही होतात. पण सद्गुरुकडून ही परीक्षा घेतली जात आहे असे समजून विश्वासाने संयम ढळू द्यायचा नाही. यासाठीच मनाची तशी तयारीही व्हायला हवी. यातूनच मग अध्यात्माची गोडी वाढत राहाते. तो भाव शिष्यामध्ये उत्पन्न होतो.
अध्यात्माचे वेड लागावे अशी शिष्याची अवस्था होते. खरं म्हणजे वेडा माणूसच अजरामर इतिहास घडवत असतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागल्याशिवाय, त्यात वेडे झाल्याशिवाय अप्रतिम अशी कलाकृती निर्माण होत नाही. वेड असेल तरच हातून हे घडते. ही वेडी माणसेच असामान्य व्यक्तिमत्व घडवतात. ध्येय असावे सुंदर, त्यातच चालत राहावे. तहान, भुक विसरून त्या कार्याच्या ध्यासाने त्यात वेडे होऊन जावे. त्यात झोकून द्यायला हवे. तेव्हाच प्रतिभावंत होता येते. असमान्य व्यक्तिमत्व घडते. सुंदर ध्येयानेच पछाडलेली ही माणसंच अजरामर अशी कलाकृती घडवतात. वेडे होऊनच मोठे यश मिळवता येते. कदाचित लोक आपणाला नावेही ठेवतील. पण त्या विचारात झोकून देऊन साधना केल्याशिवाय अनुभुती येत नाही. हे लक्षात घ्यायला हवे. या विचारात मग्न झाल्याशिवाय खरी अनुभुती येत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.