वडणगे येथील चंद्रप्रभा शंकरराव पाटील यांचे १५ डिसेंबर 2012 रोजी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत सर्वाना आधार देणारी अशी माझी आजी नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहीली. अगदी पुस्तकात जशी आजी असते अगदी तशीच. आमचे एक ना अनेक लाड तिने पुरविले. तिच्याविषयी…
डॉ. अपर्णा पाटील, वडणगे
माझ्या आजी विषयी लिहिताना मला सर्वात प्रथम दिवस आठवतो तो म्हणजे दहा ऑगस्ट 2013. मी व माझ्या समविचारी सहकाऱ्यांच्या रिफ्लेक्शन ग्रुपने वडणगे (ता. करवीर) या माझ्या गावात महिलांसाठी वाचनालय सुरू करण्याचे ठरविले. उद्घाटनासाठी सर्वांना सोयीचा होईल असा मुहूर्त ठरला. गावातील महिलांसाठी वाचनालय सुरु करायचे म्हणजे त्याला कुणाचे नाव द्यायचे याबद्दल माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मनात यतकिंचितही शंका नव्हती. अर्थातच ते नाव होते माझ्या आजीचे.
शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट 2013 ला चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालयाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या लोकांना मी माझ्या आजीचे नाव वाचनालयाला का दिले याचे कुतूहल होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना मी माझ्या भाषणात बोलले होते की ज्या व्यक्तीच्या नावे हे वाचनालय चालू होत आहे त्या व्यक्तीने कदाचित आयुष्यात एकही पुस्तक वाचले नसेल, पण ती आयुष्य अशी जगली आहे की तिच्यावर एखादे पुस्तक लिहिले जावे. मी तसे त्या दिवशी का बोलले होते याचे कारण सांगणारा हा आजचा लेख आहे.
माझ्या आजीचा जन्म 19 जुन 1927 रोजी कळे तालुका पन्हाळा येथील प्रतिष्ठित अशा देसाई कुटुंबात झाला. माझी आजी म्हणजे आई-वडिलांच्या पोटी जन्मलेली एकूलती एक लेक. वडील शंकरराव उर्फ बाबाजीराव बाळासाहेब देसाई राजकारणात- समाजकारणात सक्रिय होते. आई अनुसया यांची वडीलांना उत्तम साथ होती. वडील शंकरराव फक्त कळे येथेच नव्हे तर संपुर्ण पंचक्रोशीत एक लोकप्रिय व आदरणीय व्यक्तिमत्व होते. गावातील व परिसरातील अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या व वाद-विवाद घेऊन येत होते व ते त्याच्यावर सर्वांना मान्य होईल असा न्याय्य तोडगा काढत. त्यांच्या या लोकाभिमुख कार्याची पोचपावती जनतेने त्यांना तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवून दिले. ते 1957 ला त्यावेळेच्या मुंबई राज्याच्या विधानसभेत पन्हाळा बावडा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. राजकारणात समाजकारणात वावरायचे म्हटले की थोडे कणखर हे असावेच लागते. त्या अशा कणखर आईवडिलांच्या पोटी एक अतिशय प्रेमळ आणि हळवी मुलगी जन्मास आली. अगदी अल्पकाळात तिच्या वर्तनाने तिने पूर्ण गावाचे मन जिंकले. आई-वडिलांचे लोकांच्या मनावर असलेले आढळस्थान व माझ्या आजीचे लोभस वर्तन यामुळे माझी आजी फक्त देसाई कुटुंबाचीच लेक न राहता कळत-नकळतपणे संपूर्ण गावाची लेक बनली. त्या काळी मुलीचे लग्न लवकर केले जायचे. त्यामुळे अवघे जेमतेम शिक्षण झाले असतानाच माझ्या आजीचे वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झाले व संपूर्ण गावाने तिला भावी वैवाहिक वाटचालीस शुभेच्छा देऊन साश्रूनयनांनी निरोप दिला.
तिचे लग्न झाले ते वडणगे, तालुका करवीर येथील पाटील कुटुंबातील शंकरराव यांच्याशी. ही जोडच अशी होती की त्यांना बघताना ‘पेअर मेड इन हेवन’ या वाक्याची प्रचिती यायची. माझ्या आजीचे व्यक्तिमत्व खरे फुलले आणि बहरले ते तिचे लग्न झाल्यानंतरच. पाटील कुटुंबाची ओळख ही विद्याविभुषित आणि मोठे बागायतदार अशी होती. सासरे धोंडीबा पाटील कोल्हापूर संस्थानामध्ये उच्च पदावर कार्यरत होत. कुटुंबात अनेक सदस्य व पै-पाहुणे यांचा सततचा राबता होता. या अशा वातावरणात आई-वडिलांच्या एकुलत्या एक लेकीचा कसा निभाव लागेल अशी अनेकांना शंका असताना अगदी दुधात साखर विरघळून जावी तशी ती पाटील कुटुंबात मिसळून गेली. पत्नी म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडत असतानाच ती सासू सासऱ्यांची लाडकी सून झाली व दिर – भावजया यांची प्रेमळ वहिनी झाली. सासरवाडीत ज्या जबाबदाऱ्या वाट्याला आल्या त्या सर्व जबाबदाऱ्या तिने सक्षमपणे पार पाडल्या. अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना तिने धारिष्टाने तोंड दिले. प्रसंग कुठलाही असो की जणू काही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असल्यासारखी सर्वांनाच आधार देत भक्कमपणे उभी राहिली.
दोन्ही मुलांचे म्हणजे माझे वडील बाळासाहेब ऊर्फ गजानन शंकराव पाटील आणि माझ्या आत्या ज्योती प्रकाशराव निकम यांची लग्न केले. सुनेला आणि जावयांना खूप प्रेम देऊन त्यांचा आदर मिळवला. आजी म्हणजे आम्हा नातवंडांसाठी प्रेमाचा धो-धो वाहणारा अखंडित झरा. अगदी पुस्तकात जशी आजी असते अगदी तशीच. आमचे एक ना अनेक लाड तिने पुरविले.
या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिला परमेश्वराने समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची संधी दिली आणि ती संधी दवडू न देता तिने दोन्ही हातांनी स्वीकारली आणि निभावलीही. त्याचे झाले असे की माझ्या आजोबांना शेतीची प्रचंड आवड. पण क्षेत्र जास्त असल्यामुळे सगळे काही स्वतः करू शकत नव्हते. मदतीला घरातील एखाद्या सदस्याची गरज होती आणि ती गरज माझ्या आजीने पूर्ण केली. माझ्या आजोबांच्या खांद्याला खांदा लावून शेतात काम केले. अविश्रांत मेहनत घेतली व यशस्वी शेती करून दाखवली. पुढे आजोबांना वयामुळे मर्यादा आल्यानंतर त्यांची जागा माझ्या वडिलांनी घेतली. त्यांनी शेतीत अनेक नवनवे प्रयोग केले, पण त्यांच्याबरोबरही परिश्रम घेणारी माझी आजीच होती. उन्ह, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता ती अखंडपणे शेतात उभी होती. शेतात साधारणपणे सत्तर ऐंशी लोक काम करत. एवढ्या मोठ्या कामगार वर्गाला योग्यपणे हाताळून त्यांच्याकडून बरोबर काम करून घेई. पन्नासहून अधिक वर्षे शेतात उभी राहून आई मातीशी एकरूप झालेली माझी आजी ही गावातील प्रेमाचे आणि आदराचे स्थान बनून गेली. प्रसंग सुखाचा असो वा दुःखाचा, अगदी जुन्या जाणत्या महिलांपासून ते लग्न करून नव्या आलेल्या सुनापर्यंत सर्वजण तिचा सल्ला घेत व ती आनंदाने सर्वांना जमेल तितके आणि जमेल तसे सहकार्य करत असे.
मनुष्याला रुढ अर्थी यशस्वी होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. आपला जन्म कधी होतो, तो कुठे होतो, कोणत्या काळात होतो अशा अनेक गोष्टी त्यामागे असतात. पण माझ्यामते सर्वांना लागू होणारा समान मापदंड लावायचे झाल्यास जी व्यक्ती योग्य मार्ग न सोडता व आपल्या नीतिमूल्यांची तसूभरही तडजोड न करता आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करते, आपली कर्तव्ये योग्यरीत्या पार पडते, लोक उपयोगी ठरते, समाजाला प्रेम देऊन आदर कमवते तिच व्यक्ती यशस्वी म्हणून घेण्यास पात्र ठरते. त्यामुळेच कुठलीही प्रसिद्धी न मिळवलेली आणि कुठलाही झगमगाट न अनुभवलेली माझी आजी ही माझ्यासाठी सर्वात यशस्वी स्त्री ठरते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.