वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर तुटून पडायचं. मोडलेला संसार पुन्हा उभा करायचा, हा शेतकऱ्यांचा निर्धार अतिशय बलशाली आहे !
प्रा. डॉ. मथुताई सावंत, नांदेड.
डॉ. श्रीकांत पाटील यांची 'पाणीफेरा' ही कादंबरी म्हणजे भारतीय कृषिव्यवस्थेचा आडवा छेद आहे. महापुराच्या काळात जलमय झालेल्या पाणीदार गावाची ही एक प्रेरणादायी कहाणी आहे. पाणीप्रश्नाची सर्वांगीण चिकित्सा करणारी ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. हल्ली निसर्ग लहरी बनला आहे. त्याला बव्हंशी आपणच जबाबदार आहोत. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी हा भारतीय कास्तकारांच्या कपाळी कोरलेला दुर्दैवी अभिलेख आहे. या अभिलेखाची कठोर आणि तितकीच शास्त्रशुद्ध चिकित्सा लेखकाने या कादंबरीत केली आहे. पाणी असलं, तरी डोळ्यांत पाणी आणि पाणी नसलं, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी. वास्तविक पाणी म्हणजे जीवन, पण कधीकधी हेच पाणी जनजीवन बुडवायला, नासवायला निघतं. याची सांगोपांग चर्चा या कादंबरीत केली आहे. लेखकाची नाळ शेतीमातीशी बांधलेली असल्यामुळे या कलाकृतीला वास्तवाचे भक्कम अधिष्ठान लाभले आहे. गावगाड्याला सोबत घेऊन चालणारा, सकारात्मक विचारसरणीचा उमदा नायक सुरेश हे या कादंबरीचे बलस्थान आहे. पाठीवरती हात ठेवून लढायचं बळ देणारी नाना आणि दादांसारखी खंबीर पात्रे या कादंबरीत आहेत. तशी सगळीच पात्रं अतिशय उठावदार आहेत. अक्राळविक्राळ रूपात अवतरलेला निसर्ग हेही या कादंबरीतील एक पात्र आहे. संकटाच्या वेळी गावाची एकी बघितल्यावर 'गाव करील तिथं राव काय करील' या विधानाची प्रचिती येते. वारंवार उद्भवणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठीचे शास्त्रशुद्ध उपाय संवादांतून उलगडत जातात. कोरोनाच्या नियमावलीमुळे पंधरा ऑगस्टची ग्रामसभा ऑनलाईन होते. भूमिपुत्रांनी केलेला हा तंत्रज्ञानाचा स्वीकार मोठाच आश्वासक आहे. वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर तुटून पडायचं. मोडलेला संसार पुन्हा उभा करायचा, हा शेतकऱ्यांचा निर्धार अतिशय बलशाली आहे! ज्वलंत विषयावरची ही कसदार कलाकृती मराठी साहित्यात मानाचे पान ठरेल, असा विश्वास वाटतो. प्रा. डॉ. मथुताई सावंत नांदेड.
पाणीदार कादंबरीवर डॉ. श्रीकांत पाटील यांचे मनोगत
पृथ्वी, आप, तेज, वायू, आणि आकाश ही पंचमहाभुते आहेत. या पंचमहाभूतांपासून मनुष्यजीवाची निर्मिती होते. मातेच्यापोटी जन्माला आलेला माणूस मातीत रुजतो. माती त्याला जगवते. त्याचे भरणपोषण करते. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची परिपूर्ती निसर्गाच्या कुशीत आणि सामाजिक पर्यावरणात पूर्ण होत असते. पण मानवाला खऱ्या अर्थाने जगविण्याचे आणि स्वच्छ सुंदर जीवनाचा उपभोग घेण्याचे महत्त्वपूर्ण काम पाणी करते. म्हणूनच पाण्याला ‘जीवन’ असे म्हणतात.
‘आपः पुनन्तु भुतानी।’ पाणी प्राणिमात्रांना पवित्र करो असे संस्कृत सुवचन आहे. पाणी प्राणिमात्रांना तारते; पण तारणहार ठरलेले पाणी मात्र कधीकधी माणसाच्या जीवनात काळ बनून येते. नदी आपल्या मर्यादा सोडते. आपल्या अवतीभोवतीचा परिसर आपल्या कवेत घेते. शेतीवाडी पंखाखाली घेऊन गावशिवार ओलांडते आणि माहेरवाशीण पोरीसारखी गावात राहायला येते. गल्लीबोळात, अंगणात, घरात आपला खेळ मांडते. अन् परत जाताना मात्र गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी देऊन जाते. हाच पाण्याचा मी पाहिलेला फेरा वास्तवाच्या अंगाने येथे मांडला आहे. हा पाण्याचा फेरा मी पाहिलेला आहे, साहिलेला आहे. ‘याची देही याची डोळा’ अनुभवलेला आहे.
जनमानसात ‘आक्काबाईचा फेरा येणे’ ही म्हण प्रचलित आहे. गावावर एकदा का आक्काबाईचा फेरा आला की, माणसं महामारीच्या लाटेत किड्या- मुंग्यांसारखी मारली जातात. गावंच्या गावं ओस पडतात. भयासुराचा नाच अनुभवतात अन् या फेऱ्यापासून वाचण्यासाठी शेतीमळ्यांचा, डोंगर-टेकड्यांचा आसरा घेतात. महामारी संपली की गावात पुन्हा परत राहायला येतात. कोविड-१९ च्या अनुषंगाने जनमानसाने २०१९-२० मध्ये हा महामारीचा फेरा अनुभवला. साऱ्या जगाला लॉकडाऊनसारख्या विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले. प्लेगनंतर कोरोनाच्या हाहाकाराने माणसाने हा आक्काबाईचा फेरा अनुभवला, पण पाणी मानवी जीवनात फेरा बनून येईल, असे कधीकाळी आपणास स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण १९८९ पासून २०२१ पर्यंत अनेकदा महापुराने आपले अक्राळविक्राळ रूप दाखविले. प्रत्येक वर्षी शेतशिवार पाण्याखाली घेणाऱ्या नदीमाईने २०१९ व २०२१ मध्ये गावंही बुडविली अन् तारणारं पाणी आता आम्हांला मारणार की काय ? असा प्रश्न माणसांच्या मनात निर्माण झाला.
महापुराच्या रूपाने हा पाण्याचा वेढा गावाला का पडतो आहे? ‘जीवन’ असणारं पाणी आता मरणाला कारण का ठरत आहे? दोन तटांच्या मर्यादित वाहणाऱ्या नद्या आता मर्यादा सोडून पूरच नव्हे तर महापुराच्या कराल दाढेखाली मानवी वस्ती का घेत आहेत ? वाहणं हा गुणधर्म सोडून आता पाणी तुंबून का राहात आहे? कुजणारी शेती, पडणारी घरे, जलमय होणारं कृषिधन, पशुधन आणि महापुरानंतर पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे येणारी रोगराई माणसाचं जगणं उद्ध्वस्त करते आहे. पाण्याच्या रूपाने आक्काबाईचाच हा फेरा आहे. म्हणूनच या कादंबरीस मी ‘पाणीफेरा’ हे नाव निश्चित केलेले आहे.
वारणाकाठच्या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबाच्या परिघाभोवती या कादंबरीचे कथानक मी फिरते ठेवलेले आहे. धोंडीनाना, त्याचा मुलगा सुरेश, सून जया, पारूआक्का, जगुदादा व त्याचा मुलगा म्हादू, त्याची बायको इंदू, आई सावित्रीकाकू, सुरेशचे जीवाभावाचे मित्र धनाजी, मुस्लीम समाजातील राजाभैय्या या गोतावळ्याचा गावशिवारातील एकोपा, संकटकाळात टिकून राहाण्याची मानसिकता, संयम, एकमेकांना मदत करण्याची सहकार्यवृत्ती, गट-तट असणाऱ्या गावाची संकटसमयीची एकी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची हिंमत तर विज्ञान विषयाचे अध्यापन करणाऱ्या व संशोधक वृत्तीच्या मठपतीसरांनी पूरपरिस्थितीचा केलेला अभ्यास व पूरपरिस्थितीबाबत लोकांना जागृत करण्यासाठीची त्यांची प्रबोधनाची धडपड अशा घटना, प्रसंग, पात्रांच्या माध्यमातून ‘पाणीफेरा’ पुढे सरकत राहाते.
शेती म्हणजे बऱ्याच प्रमाणात पावसाचा खेळ असतो. अवर्षण आणि नापिकीनं शेतकरी अन्नान्नदशा भोगतो, तर कधीकधी अतिवृष्टीने पोटरीला आलेले उभे पीक वाहून जाताना पाहतो. निसर्गाच्या लहरीपणात बळी राजाचाच बळी जातो. दुष्काळाच्या दुष्टचक्रात आजपावेतो हा राजा खऱ्या जगाचा पोशिंदा असूनही त्याचाच बळी गेला आहे. तर अलीकडे काही दशकात तो पुन्हा एकदा पाणीफेऱ्यात अडकून तळीबुडी बुडाला आहे. शेती आणि गाव, बुडालेली कुटुंबं आरंभी भयग्रस्त होतात. पुन्हा संयमाने शेतात निवाऱ्याला जाण्याचा निर्णय घेतात. मुसळधार पावसात आणि महापुराच्या वेढ्यात एकमेकांना आधार देतात. आपल्या नातलगांच्या जीवाबरोबर आपल्या पशुधनालाही जपतात आणि पूर ओसरल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने, जिद्द आणि चिकाटीने पाठीचा कणा ताठ ठेवून आपले संसार सावरतात.
संकटाचे कितीही डोंगर आडवे आले तरी माणसाने पर्वताचे शिखर चढायची तेनसिंगाची हिंमत, धाडस आणि निर्धार हा कधीच सोडायचा नसतो, हीच शिकवण त्यांच्या आचरणातून मिळते. माणसाने नेहमी सकारात्मक राहावे, मुक्तपणे सुसंवादी व्हावे, नेहमी सावधपणे असावे, चुस्तपणा ठेवून वागावे व आनंदाने जीवनगाणे गावे, हाच विचार ठेवून जगल्यास जीवनाचे नंदनवन होते. संकटे येतात, पण ती जशी येतात तशीच ती जातातही, हेच सूत्र ठेवून मी या कलाकृतीची निर्मिती केलेली आहे. माणसाने निसर्गाला गुरू मानले पाहिजे. डोंगर, नद्या, झाडे, झुडपे यांचे रक्षण केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. मग पाऊस पडत राहील, झाडे बहरत राहातील, नद्या वाहत्या होतील. स्वच्छता हाच समृद्धीचा मूलमंत्र आहे. तेव्हा पाणी जमिनीत मुरू द्या, नाले, मोठे ओहळ, ओढे, नद्या वाहू द्या, नद्या स्वच्छ ठेवूया, नदी क्षेत्रातील अतिक्रमणे रोखूया. तर आणि तरच आपण या फेऱ्यापासून वाचणार आहोत, याचे जरासे भान ठेवूया. तरच रुसलेली नदीमाय हसेल आणि खऱ्या अर्थाने ती आपली जीवनदायिनी ठरेल, असे मला वाटते.
‘पाणीफेरा’ ही माझी कृषिकेंद्रित, सकारात्मक संदेश देणारी तिसरी कादंबरी आहे. रसिक वाचक या कादंबरीचेही हार्दिक स्वागत करतील, असा मला ठाम विश्वास आहे.
पुस्तकाचे नाव – पाणीफेरा
लेखक – डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे
किंमत : ₹300/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘पाणीपेरा’ ही साहित्यकृती लक्षवेधी ठरेल, अशी खात्री वाटते.