“प्रदूषणाची वाढती समस्या”
धुके आणि धुरके यामध्ये खूप फरक आहे. जे धुके असते ते सूर्यकिरण आले कि नाहीसे होते पण धुरके हे धूर व धुके यांचे मिश्रण असते उन्हामध्ये पण तसेच राहते त्यामुळे दिवसभर दृष्यमानताही खूप कमी होते. परिणामतः विमान उड्डानावरही त्याचा फटका बसतो.
अॅड. सौ. सरीता पाटील,
वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे
भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकास ‘परिच्छेद २१’ नुसार जगण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे. या जगण्याच्या अधिकारात बऱ्याच महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव आहे म्हणजे प्रत्येक नागरिकास आपले आयुष्य चांगल्या प्रकारे व प्रतिष्ठेने जगता आले पाहिजे. चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, प्रदूषणविरहित पर्यावरण पाहिजे. हा अधिकार घटनेने दिला आहे म्हणजे या देशातील सरकारने व प्रत्येक नागरिकाने किंबहुना प्रत्येक पिढीने आपल्या पुढील किमान एक-दोन पिढ्यांसाठीतरी पर्यावरण प्रदूषणविरहित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आता इथून पुढे तरी महानगरातील परिस्थिती पाहता हे फारच कठीणच दिसत आहे.
खरे सांगायचे तर आपल्या पूर्वीच्या सात पिढ्यांनी म्हणजे आपल्यासाठी फार चांगले पर्यावरण राखून ठेवले होते आणि आहे म्हणून आपण आतापर्यंत आगदी २१ व्या शतकातील २५ वर्षांपर्यंत चांगले आयुष्य जगत आहोत. सत्तरच्या दशकात जन्मलेले म्हणजे ज्यांनी आता पन्नासी पूर्ण केली आहे त्यांचेसुद्धा यामध्ये खूप मोठे योगदान आहे. कारण आपले आणि आपल्या आधीच्या लोकांचे राहणीमान खूप साधे आणि सोपे होते आणि खूप कमी गरजा होत्या. कारण आपण जे जे नैसर्गिक आणि ज्या वस्तुंचे पर्यावरणात लवकर विघटन होते त्याच वस्तू वापरत होतो. म्हणजे तोपर्यंत आपल्या जीवनात प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टर ऑफ पॅरिस या भयंकर असुरांचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे आपली पिढी पन्नास-साठ पर्यंत तरी काही अपवाद सोडले तर निरोगी आयुष्य जगत आहे.
कारण जसजशी “वापरा आणि फेका” संस्कृती आली तशी निसर्गाची हानी सुरु झाली. प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टर ऑफ पॅरीस यांच्या वापरांवर बरीच बंधने आली आणि बरीच जनजागृती झाली अजूनही त्यातून १०० % सुटका झालेली नाही. यांच्या अतिवापरामुळे जमीन आणि पाण्याचे प्रदूषण होतेच आहे आणि ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही तो शुद्ध ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू मिळणे इथूनपुढे अतिशय कठीण वाटत आहे. कारण अलीकडील दिल्ली, बेंगलोर, पुणे, ठाणे, मुंबईमधील हवेची स्थिती पाहता प्रदूषणाचे भयंकर संकट डोके वर काढत आहे आणि मानव जातीला ते विळखा घालत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गेल्या जवळजवळ १ महिन्यापासून मुंबई, ठाण्यामध्ये अगदी दुपार पर्यंत हवेमध्ये दाट धुरके दिसत आहे. दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची कल्पना तर सर्वांना आहेच पण आता मुंबई, ठाणेमधील हवेची गुणवत्तासुद्धा बरीच खालावलेली आहे. यामुळे बऱ्याच लोकांना ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे शिवाय लहान मुले व वृद्ध लोक यांना त्रास होतो आहे. मुंबई, ठाण्यामध्ये मेट्रो, रस्ते रुंदीकरण, जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नवीन इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्यामुळे धुळीचे कण प्रचंड प्रमाणावर दिवसभर हवेत तरंगत असतात. आता मेट्रो, रस्ते रुंदीकरण आणि पुनर्विकास ही विकासाची कामे म्हणता येतील आणि विकास करायचा म्हटले तर थोडा त्रास सहन करावा लागतोच हि गोष्ट जरी खरी असली तरी विकास हा ‘शास्वत’ असला पाहिजे. जेवढी झाडे तोडली जातात तेवढी लावली जात नाहीतआ णि लावली तरी ती जगवली जात नाहीत.
मेट्रोची आणि पुनर्विकासाची कामे दहा –दहा वर्षे चालू असतात आणि आहेत. त्यामुळे हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शिवाय यात भर म्हणून लग्ने व लोकप्रतिनिधींचे कार्यक्रम कुठे ना कुठे सतत चालूच असतात. त्यामध्ये अनुक्रमे वराती आणि लोकप्रतिनिधींचे आगमन यावेळी प्रचंड प्रमाणात फटाके, रोकेट्स, सुतळीबॉम्ब ई. वाजवले जातात. त्यामुळे ध्वनी व हवेचे फार प्रदूषण होत आहे कारण फटIक्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो त्या धुरामध्ये रसायने असल्यामुळे सर्दी, खोकला, दमा, टी.बी ई. आजारांचे प्रमाण खूपच वाढले आहे.
ठाण्यामध्ये तर रात्रीबारा नंतर नेहमीच, दररोज फटाके वाजवले जात आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदुषणाने सर्वांची झोप तर मोड होतेच शिवाय म्हाताऱ्या व लहान मुलांना तसेच जे बीपी, शुगरचे पेशंट आहेत त्यांना खूप त्रास होतो. तसेच पर्यावरणाचे प्रदूषण वाढत आहे हे आपण सर्वजण अलीकडे खूपच अनुभवतो आहे. धुके आणि धुरके यामध्ये खूप फरक आहे. जे धुके असते ते सूर्यकिरण आले कि नाहीसे होते पण धुरके हे धूर व धुके यांचे मिश्रण असते उन्हामध्ये पण तसेच राहते त्यामुळे दिवसभर दृष्यमानताही खूप कमी होते. परिणामतः विमान उड्डानावरही त्याचा फटका बसतो.
धुरके म्हणजे धूळ, धूर, राख, सल्फर, नायट्रोजन, कार्बनडायऑक्साईड, कार्बन मोनोर्ऑक्साईड आदी घटक वायूंचे मिश्रण असते. ठाणे, मुंबईमध्ये वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की रोजची वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात होत आहे त्यामुळे वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरांमुळे प्रदूषण वाढत आहे. गेल्या २५ वर्षात पुण्यामध्ये रस्त्यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ तर वाहनांच्या संख्येत तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई मध्ये गेल्या १० वर्षात वाहनांची संख्या १०० % नी वाढली आहे म्हणजे प्रति किमी वाहनांची संख्या २३०० यावरुन आपल्या पुढील पिढ्यांना हे हवेचे धोकादायक, विषारी प्रदूषण विळखा घालत आहे हे आताच ध्यानात घेऊन सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहनांनी प्रवास करावा. ते इथून पुढे गरजेचे झाले पाहिजे.
हा विषारी धूर वाहने, कारखाने, फटाके, बेकऱ्या, ठिकठिकाणी लागणाऱ्या आगी, कचरा जाळणे, अरण्यातील वणवे आदीतून बाहेर पडत असतो. आजकाल प्रत्येक छोट्या मोठ्या आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवले जातात आणि त्यामुळे आगीसुद्धा लागतात. तर प्रत्येक नागरिकाने दिवाळी किंवा इतर सणIसुदिना फटाके वाजवणे टाळले पाहिजे आणि आपल्या मुलानाही समजावले पाहिजे. जेणेकरून पर्यावरण स्वच्छ राखण्यात आपला खारीचा वाट उचलला जाईल व घटनेने दिलेले जगण्याचा मुलभूत अधिकार अबाधित राहील. आजकाल तर खूप शोभिवंत, महागडे फटाके, रॉकेट्स वाजवून खूप मजा केली, घेतली जाते पण या मजेची दुसऱ्या कोणाला तरी किंवा कधीकाळी आपणाला सुद्धा सजा होऊ शकते. आपली जी आत्ता ५०-६० वयाची पिढी आहे त्यांनी या इतक्या वर्षात फटाके वाजवलेच नाहीत म्हटले तरी चालेल.
मला आठवते गेल्या १२-१५ वर्षांपासून आमच्या मुलांनी दिवाळीत किंवा इतर सणांत कोणत्याही प्रकारचा एकही फटाका वाजवला नाही आणि त्याच्याही आधी आमची मुले फारच किरकोळ फटाके वाजवायची. खरे म्हणजे फटाक्यांवर प्रचंड पैसे खर्च करुन आपण स्वतः व दुसऱ्यांना आजार पसरवत आहोत यांचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे. आपण मुलांना त्याचे तोटे समजावून सांगितले तर मुले ऐकतात पण मोठे जर फटाके वाजवत असतील तर मुले अनुकरण करतात हे वेगळे सांगायला नको. माझ्याकडे पैसे आहेत मी वाटेल ते करेन, आता नाही मजा करायची तर कधी करायची असा दृष्टीकोन ठेवला तर एक दिवस हि मजा किंवा आपले बेजबाबदार वागणे आपल्यावरच उलटणार हे सध्या दिसतच आहे. फटाके वाजवल्यामुळे तिहेरी नुकसान होते एक तर ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण आणि भाजने किंवा आगी लागणे मग एवढे जर आपण टाळले तर तर नक्कीच आपण प्रदूषण बऱ्याचअंशी कमी करू शकतो.
सध्याची ठाणे, मुंबईची स्थिती पाहता आपल्यावर पण दिल्लीसारखी हवा प्रदूषण वाढले कि शाळा बंद, विमान उड्डाणे बंद, वाहने चालवण्यासाठी सम-विषम तारीख ठरवणे ही वेळ इतर शहरातही भविष्यात यायला वेळ लागणार नाही. म्हणून लोकांनी, लोकप्रतीनिधिनी, त्यांच्या हौशी कार्यकर्त्यांनी, विशेष म्हणजे तरुण पिढीने मला काय त्याचे हा दृष्टीकोन बाजूला ठेवून थोडी सजगता दाखवली तर नक्कीच आपण आपल्या घटनेने दिलेला प्रदूषणविरहित पर्यावरणात जगण्याचा अधिकार अबाधित ठेवू शकतो. शिवाय कार्यकर्त्यांनी काही विपरीत घडले कि टायर, बस जाळून आंदोलन करणे थांबवले पाहिजे. म्हणून आपण सर्वानीच अमृत महोत्सवी संविधान व प्रजासत्ताक दिनानिमित्त निदान ७५ % तरी आपल्या अयोग्य कृतीतून होणारे प्रदूषण रोखण्याची आणि आपल्या पुढील पिढीला चांगले हवा, पाणी देण्याची प्रतिज्ञा करूया व त्यानाही सजग नागरिक बनवूया. हीच या लेखा द्वारे प्रार्थना.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.