पूर्वीच्याकाळी निवळीच्या बियांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निवळीची गरज आता उरली नाही. त्यामुळे निवळीचे महत्त्व कमी झाले. साहजिकच निवळीची झाडेही हळूहळू नष्ट झाली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व कमी झाले की त्याबरोबर त्या गोष्टींशी संबंधीत वस्तूही नष्ट होतात तसे निवळीचे झाले आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरी विषयेंद्रियामिळणी । करूनि घापे वितुटणी।
जैसे तोडिजे खडु पाणी । पारकेया ।। ८९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – तर विषयाशी इंद्रियांच्या आलेल्या एकतानतेची जी ताटातून करून ठेवावी त्याला दम म्हणतात. ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गढूळ पाण्यात निवळीचे बी घातलें तर ते पाण्यातील मातीस तळास नेऊन स्वच्छ पाण्यास वेगळे करतात.
अध्यात्मातील ज्ञान समजावून सांगण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी तत्कालिन प्रचलित विज्ञानातील उदाहरणांचा आधार घेतला आहे. यातून अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीचे प्रबोधन समाजात करण्याचा त्यांचा उद्देश दिसून येतो. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. पण त्याआधी निवळीच्या बियांचा वापरगढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात होता. ही नैसर्गिक शुद्धीकरणाची पद्धत त्याकाळात वापरली जात होती. पाण्यात निवळीचे बी घातल्यानंतर थोड्यावेळातच गाळ तळाशी बसून पाणी शुद्ध होते. विषय, विकारांपासून मलिन झालेल्या मनाला शुद्ध करण्यासाठी चांगल्या विचारांचे बी मनात घालायला हवेत. म्हणजे विषय, विकारांचा गाळ आपोआपच दूर होईल.
मनाला चांगल्या विचारांची सवय ही यासाठीच लावायला हवी. इंद्रियांना कोंडून ठेवून वासना नष्ट करता येत नाही. मनाचा कोंडमारा करून मन शुद्ध करता येत नाही. वासनेपासून इंद्रियांची ताटातून करून शुद्धी मिळवता येते. ही ताटातून चांगले विचार घालून करता येते. यासाठी मनामध्ये चांगल्या विचारांचे बी मिसळायला हवे. निवळीचे बी घातल्यानंतर गाळ कसा आपोआप खाली बसतो. तसे चांगल्या विचारांचे बी घातल्यानंतर अशुद्ध अशी विषय, वासना आपोआपच दूर होते.
पूर्वीच्याकाळी निवळीच्या बियांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निवळीची गरज आता उरली नाही. त्यामुळे निवळीचे महत्त्व कमी झाले. साहजिकच निवळीची झाडेही हळूहळू नष्ट झाली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व कमी झाले की त्याबरोबर त्या गोष्टींशी संबंधीत वस्तूही नष्ट होतात तसे निवळीचे झाले आहे. वापरात नाही म्हणजे ते निरोपयोगी असाच आपला ग्रह झाला आहे. पण जैवविविधतेच्यादृष्टीने निरोपयोगी असे काहीच नसते. सर्व गोष्टी या उपयुक्त असतात. यासाठीच जैवविविधतेचे संवर्धन गरजेचे आहे.
वनस्पती तज्ज्ञ मधुकर बाचुळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार निवळी ही औषधी वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Strychnos potatorum असे आहे. इंग्रजीत या वनस्पतीला क्लिअरिंग नट असे म्हणतात. हिंदीत नेल्मल, निर्मली असेही म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रातील दगड वाळूच्या टेकड्या, कोकण, कर्नाटक आणि खानदेशात ही वनस्पती आढळते. निवळीचे पक्व फळ हे वातीकारक समजले जाते. फळाचा गर श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे. दृष्टी सुधारक म्हणून बियांचा वापर केला जातो. डोळ्यांचे विकारावर बिया वापरल्या जातात. मधात उगळून त्यात कापूर मिसळून डोळ्यासाठी वापरले जाते. अतिसाराच्या तक्रारीवर ताकात मऊ पिष्टि करून पोटात दिली जाते. असे विविध स्थानिक उपयोग या निवळीचे आहेत. आधुनिक विज्ञानामध्ये निवळीच्या या गुणधर्मांचे संशोधन करून याचे नवे उपयोग शोधणे ही नव संशोधकांसाठी मोठी संधी आहे. असे केल्यास या वृक्षाच्या संवर्धनासाठी आपोआपच प्रयत्न होऊ शकतील.