एडिसन फारसे शिकलेले नसले तरी प्रयोगशील व्यक्तीमत्त्व होते. स्वंयंशिक्षण आणि नवे ज्ञान आत्मसात करण्याची त्यांची ओढ कायम होती. विद्युत ऊर्जेचा वापर रात्री प्रकाश मिळवण्यासाठी करायला हवा, असे अनेक संशोधकांना वाटत होते. त्यावर प्रयोगही करत होते.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
जग बदलणाऱ्या शोधांमध्ये अनेक शोधांचा समावेश होतो. मात्र ज्या शोधामुळे मानवाचे जीवन, समाजव्यवस्था बदलली, केवळ अशाच शोधांचा विचार केला तर त्यामध्ये एडिसनच्या विद्युत दिव्याचा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शरीर व्यवस्थापनापासून, समाजव्यवस्थेपर्यंत सारे काही बदलणारा हा शोध खऱ्या अर्थाने क्रांतीकारी ठरतो.
थॉमस अल्वा एडिसन, ११ फेब्रुवारी १८४७ जन्मलेला. तसा जन्मताच हुशार. मात्र वयाच्या बाराव्या वर्षी कानांचे दुखणे सुरू झाले. ऐकायला कमी येऊ लागले. शिक्षकांचे बोलणे ऐकता येत नसल्याने, ते प्रश्नांची उत्तरे देत नसत. परिणामी त्यांना सुमार बुद्धीचा ठरवून शाळेतून काढून टाकण्यात आले. औपचारिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर पडावे लागले. त्यांच्या आईने मात्र त्यांना हे कधीच कळू दिले नाही. त्यांना घरातच लिहायला वाचायला शिकवले.
एडिसन यांनीही अनेक गोष्टींचे ज्ञान अनुभवातून घेतले. यातून त्यांना स्वत: खात्री करून घेण्याची, त्यासाठी प्रयोग करण्याची सवय लागली. पुढे त्यांनी वृत्तपत्रे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. याचाही सूक्ष्म अभ्यास करून आठवड्याला ते ५० डॉलरचा नफा मिळवू लागले. वृत्तपत्र वितरण व्यवसायात मोठा दबदबा निर्माण केल्यानंतर त्यांनी केंटूकी येथील वेस्टर्न युनियन कंपनीत नोकरी स्वीकारली. तेथेही प्रयोग करत. एका प्रयोगात विद्युतघटातील आम्ल बाहेर पडले. वरिष्ठांच्या केबीनचे नुकसान झाले. परिणामी नोकरी गेली.
पुढे त्यांनी प्रयोग करण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यातून १८६९ मध्ये मत नोंदवणाऱ्या यंत्राचे स्वामित्त्व हक्क मिळवले. या शोधासाठी त्यांना मोठी रक्कम मिळाली. ते न्यूयॉर्कला आले. टेलिग्राफ यंत्रणेचे विकासक आणि उद्योजक फ्रँकलिन लिओनार्ड पोप यांनी त्यांच्या कार्यालयाच्या तळघरात प्रयोग करण्याची परवानगी दिली. तेथे त्यांनी उद्योगांच्या अडचणी ओळखून त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. यातून त्यांच्याकडे पैशाचा मोठा ओघ सुरू झाला.
लहानपणापासून व्यवसाय करणाऱ्या एडिसनना आपल्या शोधांचे पैशात रूपांतर करण्याचे कसब चांगलेच ठाऊक होते. एडिसन यांनी सर्व शोधांचे पेटंट वैयक्तिक नावावर कसे राहील, याची दक्षता घेतली. यातीलच एक महत्त्वाचा शोध म्हणजे विद्युत बल्ब. विद्युत ऊर्जेचा शोध लागला तरी तिचा उपयोग प्रयोगशाळेपुरता मर्यादित होता. विद्युत ऊर्जेचा वापर करून त्यांना रात्रीचा दिवस करायचा होता.
एडिसन फारसे शिकलेले नसले तरी प्रयोगशील व्यक्तीमत्त्व होते. स्वंयंशिक्षण आणि नवे ज्ञान आत्मसात करण्याची त्यांची ओढ कायम होती. विद्युत ऊर्जेचा वापर रात्री प्रकाश मिळवण्यासाठी करायला हवा, असे अनेक संशोधकांना वाटत होते. त्यावर प्रयोगही करत होते. मात्र बल्ब बनवण्यामध्ये आलेल्या अपयशाने अनेकांनी प्रयत्न सोडून दिले.
एडिसन यांची चिकाटी मात्र कौतुकास्पद होती. वेगवेगळ्या धातूंचे फिलामेंट करून प्रयोग सुरू होते. तापलेले लामेंट जळून जात. त्यांचे एक, दोन, तीन, हजार, दोन हजार असे एकूण २७७४ प्रयोग अयशस्वी झाले. धातूशी अभिक्रिया न होणारा कमी दाबाचा वायू भरून अखेर २७७५वा प्रयोग यशस्वी झाला. विद्युत दिव्याच्या सहाय्याने रात्री दिवसासारखा प्रकाश मिळू लागला आणि जग बदलले.
हळूहळू कामाच्या ठिकाणी आणि घरात विद्युत दिव्यांचा वापर करून रात्रीचा प्रकाश मिळवला जाऊ लागला. पूर्वी केवळ दिवसाच कारखाने सुरू असत. विद्युत दिव्यांमुळे दिवसासारखा प्रकाश मिळू लागल्याने पूर्वी बारा तास सुरू असणारे कारखाने २४ तास सुरू राहू लागले. लोकांना बारा तासापेक्षा जास्त काम करावे लागू लागले. पूर्वी दिवस मावळला, अंधार पडला की भोजन करून विश्रांती घेणारी माणसे वेगवेगळी कामे करू लागली. माणसाची रात्रीची झोप गेली. विश्रांतीचा कालावधी घटला. कारखान्यात पाळ्यानिहाय काम सुरू झाले. त्यामुळे विश्रांतीच्या कालावधीत अनियमितता आली. यातून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. मात्र आर्थिक फायद्याचा विचार करणाऱ्या उद्योजकांनी त्याकडे कानाडोळा करत पाळ्याचे नियोजन कायम ठेवले.
कारखाने रात्रंदिवस सुरू ठेवले जाऊ लागले. रात्रीच्या प्रकाशासाठी रस्त्यावर विद्युत दिवे बसवले गेले. रस्ते, शहरे प्रकाशमान झाली. त्याचा परिणाम रात्री उशिरापर्यंत रस्ते जागे राहू लागले. याचे परिणाम केवळ मानवावरच नाही तर निसर्गावरही होऊ लागला. रात्र झाली की घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांना गोंधळून गेल्यासारखे होत असे. झाडांचीही अवस्था फार वेगळी नव्हती. सुरुवातीला विद्युत दिवे पिवळा प्रकाश देत असल्याने हे परिणाम दृष्यरूपात नव्हते. त्यांनी दिव्याचे स्वामित्त्व हक्क तर घेतले होतेच शिवाय एकादिष्ट विद्युतधारा पुरवण्याच्या व्यवसायही सुरू केला. यातून त्यांना मोठा नफा मिळू लागला. एडिसन आणखी श्रीमंत झाले. अमेरिकाच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात एडिसन यांचे मोठेपण आणि त्यांच्या शोधांची चर्चा होऊ लागली. तरूण संशोधकांचे ते आदर्श बनले. अनेक वर्षे एडिसन यांची मक्तेदारी टिकून होती. मात्र त्यांची ही मक्तेदारी मोडून काढली निकोला टेस्ला यांनी.
निकाला टेस्ला एडिसन यांच्याकडे नोकरी करत असताना एडिसन यांनी एका कामासाठी त्यांना ५०,००० डॉलर देण्याचे मान्य केले. मात्र काम पूर्ण होताच, एडिसननी शब्द फिरवला. टेस्लांनी नोकरी सोडली. त्यांना रेल्वेचे ब्रेक शोधणाऱ्या लिव्हिंगस्टोन यांनी साथ दिली. त्याचवेळी अमेरिकेच्या शोधाला चारशे वर्षे झाल्यानिमित्त शिकागोत सर्वधर्म परिषद भरविण्यात येणार होती. संपूर्ण शहराला विद्युत रोषणाई करण्याचे ठरविण्यात आले. सर्वांना वाटत होते की हे काम एडिसनच्या कंपनीला मिळणार. मात्र टेस्ला यांना काम मिळाले. त्यांनी दहा लाख दिव्यांनी शिकागो शहर उजळून टाकले. एडिसननी टेस्लांना आपले विद्युत दिवे वापरण्यास बंदी घातली. प्रत्यक्ष धर्म परिषद सुरू होण्यास अत्यंत कमी कालावधी राहिला असताना टेस्लांनी रात्रीचा दिवस करून नव्या डिजाईनचे विद्युत दिवे बनवले. टेस्लांचे बल्ब एडिसनच्या दिव्यापेक्षा आधिक प्रकाश देत. ही रोषणाई सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली. टेस्लांच्या शोधाने प्रेरित होत इतर संशोधकही नव्या रचनेचे, तंत्राचे बल्ब बनवू लागले. यातूनच कमी विद्युत ऊर्जा वापरून आधिकाधिक प्रकाश देणारे एलईडी दिवे आले. आज विद्युत दिव्यांमुळ मिळणारा प्रकाश अगदी सूर्यप्रकाशासारखा आहे. पुढे कितीही शोध लागले तरी माणसाची झोप उडवणारा दिवा शोधणारे एडिसनचं!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.