July 27, 2024
Powari Boli Samhelan Lakhansinh Katre speech
Home » पोवार समाज, बोली – साहित्य अन् संस्कृती एक आकलन
काय चाललयं अवतीभवती

पोवार समाज, बोली – साहित्य अन् संस्कृती एक आकलन

दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन 19 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे झाले. ॲड. लखनसिंह कटरे ( बोरकन्हार ) हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी पोवारी समाज, पोवारी बोली व साहित्य तसेच पोवारी संस्कृतीवर आपले विचार मांडले. त्यांच्या संमेलनातील भाषणाचा हा संपादित अंश…

आम्ही पोवार आहोत आणि पोवार समाजाची उत्पत्ती अग्निकुण्ड मधून झाल्यामुळे आम्हाला अग्निवंशी क्षत्रिय म्हणतात. पण हळूहळू, भिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला असल्याने आमच्या समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणाचे सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता, बहुविधता पण दिसते. आणि म्हणूनच “आपली संस्कृती टिकविण्या सोबतच विभिन्न क्षेत्रात बसलेल्या आमच्या पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा पण आम्ही आदर केला पाहिजे.” एकमेकाचे मत आणि विचाराला सहानुभूती आणि समंजसपणाने समजून घेतले पाहिजे. भिन्न भिन्न क्षेत्रात बसलेल्या आमच्या पोवार समाजाच्या जीवनपद्धतीत आलेले काही थोड़ेफार फरक आम्ही समजून घेतले पाहिजे. अशी समन्वयवादी, समजदारीची आणि आदरयुक्त विचारधाराच आमच्या समाजाला, आमच्या बोलीला आणि आमच्या संस्कृतीला पूरक आणि तारक ठरेल असा मला विश्वास आहे.

¤ स्थित्यंतर/बदल/बदलाव/परिवर्तन आणि मानवी स्वभाव

एका शाश्वत सत्याच्या संदर्भात असे म्हटले जाते की, या पृथ्वीवर फक्त एकच गोष्ट कायम/शाश्वत राहते/आहे, आणि ती गोष्ट म्हणजे सततचे स्थित्यंतर/बदल/बदलाव/परिवर्तन ही होय. या स्थित्यंतर/बदल/बदलाव/परिवर्तनात जो माणूस अडकून/फसून जातो, पुढे जाऊ शकत नाही तो माणूस इतिहासात लवकरच गहाळ होऊन जातो. याच विषयावर लेखक विवान मारवा यांचे एक इंग्रजी मधील संशोधनात्मक पुस्तक WHAT millennials WANT : Decoding the World’s Largest Generation प्रकाशित झाले आहे. पेंग्विन व्हायकिंग पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित हे संशोधनात्मक पुस्तक सांगते की, सन 2021 मध्ये भारतीय लोकांचे सरासरी वय फक्त 28 वर्षे आहे. याच्या तुलनेत अमेरिका, चीन आणि जपानच्या लोकांचे सरासरी वय अनुक्रमे 38, 37 आणि 47 वर्षे आहे. याचा अर्थ असा होतो की, सध्याचे स्थितीत भारतात सर्वात जास्त तरुण पिढीचे वास्तव्य आहे. अशा या तरुण पिढीला आजकाल मिलेनियल्स Millennials असे नाव देण्यात आले आहे. या मिलेनियल्स शब्दाची/संज्ञेची व्याख्या ऑक्सफर्ड डिक्शनरीत सुद्धा केली आहे. त्यानुसार एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस सज्ञान होणारी पिढी म्हणजे मिलेनियल्स होय. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, 1980 च्या नंतर जन्मलेले तरुण/तरुणी म्हणजे मिलेनियल्स आहेत. या मिलेनियल्सची आजच्या संदर्भात नवीन काटेकोर सामाजिक, सांस्कृतिक व्याख्या करायची झाली तर, इंटरनेटच्या युगात जन्मलेली आणि जागतिकीकरणाच्या सोबत समरूप होणारी पहिली पिढी असे पण म्हणता येईल.
या 1981 – 1996 च्या दरम्यान जन्मलेली भारतीय मिलेनियल्स पिढीची लोकसंख्या जवळपास 45 करोड असेल असा एक अनुमान आहे. हाच वर्ग खऱ्या अर्थाने कमावता वर्ग आहे आणि पर्यायस्वरूप ग्राहकवर्ग पण आहे. भारतीय सांस्कृतिक जडणघडणात या वर्गाचीच सक्रिय भूमिका पण राहते. देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पृष्ठभूमीच्या मुख्य प्रवाहात हाच वर्ग प्रमुखतेने प्रतिष्ठापित असतो. याच वर्गाची विचारधारा देशाच्या वर्तमान आणि भविष्याची दशा आणि दिशा पण निर्धारित करत असते. म्हणूनच लेखक विवान मारवा यांनी याच वर्गाचा एक सर्वेक्षण केला आहे.

सेंटर फॉर द स्टडी इन डेव्हलपिंग सोसायटी (सीएसडीएस) या विश्लेषक संस्थेने पण असे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जे समोर आले त्यात एक गोष्ट उघड झाली आहे की, या मिलेनियल्स भारतीय पिढीचा 84 टक्के भाग आजही परंपरागत ॲरेंज्ड मॅरेजलाच प्राधान्य देतो. इतकेच नाही तर ही मिलेनियल्स पिढी जातीय आणि धार्मिक अस्मिताच्या बाबतीत पण कट्टर आहे असा एक अनुमान निघतो. यावरूनच या मिलेनियल्स पिढीच्या एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोणाच्या बाबतीत पण त्यांची प्राथमिकता समजून येते.

एक गोष्ट इतिहाससिद्धच आहे की, वैचारिक क्रांतिकारांची लोकसंख्या नेहमीच अल्पसंख्याक असते. विवान मारवा यांच्या या सर्वेक्षणाचा निष्कर्ष पण या गोष्टीलाच उघड करते. विवान मारवा यांच्या आकडेवारीलाच लक्षात ठेवून म्हणता येवू शकते की, वैचारिक क्रांती करण्यासाठी फक्त (100 – 84) = 16 टक्के असे अल्पसंख्यक लोकच कारणीभूत असतात/ठरतात. उर्वरित 84 टक्के बहुसंख्य लोक नेहमीच वैचारिक क्रांतीचे समकालीन विरोधकच असतात किंवा ते या बाबतीत तटस्थच राहतात. पण इतिहासदत्त सत्य असे पण आहे की, इतिहासात नेहमी त्या अल्पसंख्यक क्रांतिकारक समाजाचेच नाव अमर होते आणि वैचारिक क्रांतीला विरोध करणाऱ्या बहुसंख्य समाजाचे नाव इतिहासात शोधून सुध्दा सापडत नाही. कारण की कालातिक्रमणानंतर वैचारिक क्रांतिकारांची विचारसरणीच बहुसंख्य समाज स्वीकारत असतो आणि त्या बहुसंख्य बेनाम विरोधकांच्या विचासरणाला तोच समाज धिक्कारत जातो. ही इतिहाससिद्ध आणि इतिहासदत्त वस्तुस्थिती समजून घेणे आजच्या प्रत्येक समाजापुढील महत्त्वपूर्ण गरज आणि अनिवार्यता आहे असे मला वाटते. कोणतीच कट्टरता दीर्घ काळपर्यंत टिकूच शकत नाही. उदारता, सहिष्णुता, सहअस्तित्वभाव, नवविचारस्वीकृती अशी प्रवाही विचारसरणीच टिकाऊ/शाश्वत असते. कोणत्याच समाजाची सर्वांगीण, सर्वंकष आणि टिकाऊ/शाश्वत प्रगती आणि विकास करण्यासाठी तसेच वर्तमान आणि भविष्याची दशा आणि दिशा निर्धारित करण्यासाठी अशीच विचारसरणी सहायक होते, हे सार्वकालिक सत्य आम्हाला ओळखता आले पाहिजे असा माझा विचार आहे.

¤ आम्ही पूर्वजांचे आभारी

1910 च्या दशकात, बहुतेक सर्व समाजात पहिल्यांदाच, आमच्या पोवार समाजाची संघटना स्थापित झाली आणि त्याचे अनुकरण करून इतर समाजाच्या लोकांनी पण आपापल्या समाजाची संघटना, त्याच्या नंतर, स्थापित केली, असा भारतीय समाज-संघटनाचा इतिहास सांगितला जातो. पण आमच्या समाजाच्या संघटनेद्वारे पोवारी बोली आणि पोवारी संस्कृतीचा संस्थापन, उत्थापन, पुनर्कथन, नव-प्रवर्तन/नव-सृजन सारख्या विषयात परीपूर्ण लक्ष दिले गेल्याचे दिसत नाही. याचा अर्थ आमच्या त्या प्रथम-प्रवर्तक समाज-प्रमुखांचे महत्त्व आणि श्रेय कमी आहे, असे अजिबात नाही, उलट आम्ही त्या आमच्या पूर्वजांचे आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला समाजोन्नतीसाठी काम करण्याची दिशा दाखवली. खूप खूप कृतज्ञ आहोत आम्ही आमच्या त्या पूर्वजांचे ! आजचे आमचे काम त्यांनी रचलेल्या त्याच पायव्यावरच स्थापित होत आहेत.

¤ पोवारी बोली पुनरुत्थापित करणे हेच लक्ष्य

आता आमचे लक्ष्य राहिले पाहिजे की, आमची मृतप्राय होऊ घातलेली पोवारी बोली कशी पुनरुत्थापित व पर्यायाने अमर होवू शकेल. कारण की, कोणत्याच समाजाची बोली/भाषा हीच खरीखुरी त्या समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक राहते. हीच प्रमुख गोष्ट लक्षात ठेवून आम्ही आमच्या बोली/भाषेचा पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथन साठी कटिबद्ध राहिले पाहिजे असे माझे विचार आहेत.

¤ सांस्कृतिक समृध्दीसाठी हवे चांगले साहित्य

आमचा पोवार समाज आता आर्थिक दृष्टीने समृद्ध होत आहे. पुर्वी काही क्षेत्रांत कमतरता राहिली असेलही, तरी ती आता हळूहळू लुप्त होत आहे. पण जर आर्थिक समृध्दीला सांस्कृतिक समृध्दीचे अभिन्न झालर नसेल तर आमच्या किंवा कोणत्याच समाजाच्या सम्यक प्रगती व विकासाची दिशा न्यूनच राहण्याची संभावना असते. या सांस्कृतिक समृध्दीसाठी चांगल्या साहित्याची नितांत आवश्यकता असते. कारण की, चांगले साहित्य हे वाचकाला अंतर्मुख करते, आणि सोबतच वाचकाची जिज्ञासा आणि संवादाची भूक पण पूर्ण करते. मानवी जीवनाचे विविध अल्पपरिचित पैलू वाचकाच्या दृष्टीस आणून देते, ज्यामुळे वाचकांची जाणीव-कक्षा विशाल आणि सखोल होवू शकते, वाचकाला अस्वस्थ करते, उल्हासित करते. अशा परस्परविरोधी परिणामातूनच साहित्य वाचकाच्या भावविश्वाला व्यामिश्रता आणि अनुभवविश्वाला अर्थपूर्णता देते, समाजात सकारात्मक परिवर्तन/स्थित्यंतर/बदल/बदलावाची सुंदर अपेक्षा निर्माण करते.

¤ संस्कृती म्हणजे काय आहे ?

आता एक प्रश्न उभा राहतो की, संस्कृती म्हणजे काय आहे ? तर या संकल्पनाच्या बाबतीत मी माझे खूप खूप मार्गदर्शक राहिलेले जगप्रसिद्ध असे दिवंगत भाषाशास्त्री डाॅ.अशोक केळकर यांची एक टिपणी मी इथे देत आहे. ती टिपणी अशी….

“काही भारतीयांना पाश्चिमात्य देशांमधली ‘कल्चर’ ही संकल्पना एतद्देशीय भाषांमध्ये आणावीशी वाटली. बांगलाभाषकांनी त्यासाठी ‘कृष्टि’ हा शब्द वापरून मूळची शेतीच्या मशागतीची लक्षणा कायम राखण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ ठाकूर यांना हा शब्द फारसा पसंत पडला नव्हता. त्यांनी पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातील संस्कृतचे प्राध्यापक आणि गाढे अभ्यासक डाॅ.प. ल. वैद्य यांच्याकडे विचारणा केली. वैद्यांनी त्यांना सांगितले की, मराठीमध्ये सुप्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी घडवलेला “संस्कृती” हा शब्द लोकांना समाधानकारक वाटल्याने रुळला आहे. रवींद्रनाथांना हा शब्द आवडला, त्यांनी तो जसाच्या तसा वापरला आणि तो अखिल भारतीय पातळीवर सामायिक शब्द म्हणून रुळण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘कल्चर’ या शब्दाचे सरधोपट भाषांतर न करता राजवाड्यांच्या प्रतिभेने त्याच्या अर्थातील एक धागा उचलून त्यासाठी आपल्याकडील संस्कार ही परंपरेतील सर्वज्ञात संकल्पना उचलली. संस्कारांनी सिद्ध होते ती संस्कृती. मग ते संस्कार बरे असतील किंवा वाईट असतील, जाणिवेतील किंवा नेणिवेतील असतील आणि स्वकीय असतील किंवा परकीय असतील.

संस्कार म्हणजे व्यक्तीला जो परिसराचा, विशेषतः मानवी परिसराचा अनुभव येतो, त्या अनुभवाचे व्यक्तीवर उमटलेले ठसे. असे हे संस्काराचे ठसे कधी संचित रूपात टिकतात, कधी लोप पावतात, तर कधी कालांतराने स्थितिस्थापित होतात असे भारतीय परंपरा मानते. संस्कृती म्हणजे अशा संस्कारांचे भांडार. राजवाड्यांच्या योजकतेमुळे संस्कृती हा शब्द, कल्चर या शब्दापेक्षा अधिक अर्थघन असा, आपल्या हाती आला. ‘कल्चर’साठी संस्कृती या शब्दाचा वापर हे सृर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण आहे.

तर असा या संस्कृती शब्दनिर्मितीचा इतिहास आहे आणि अशी संस्कृती या संकल्पनेची परिपूर्ण परीभाषा/व्याख्या आहे.

¤ स्वतंत्र साहित्य निर्मितीकडे कल

अशी या संस्कृतीची योग्य देखभाल साहित्याद्वारे होत जाते. परंतू आमच्या समाजाचे लक्ष पोवारी बोलीत स्वतंत्र साहित्य निर्मितीकडे आमच्या दुर्दैवामुळे पुरेशा प्रमाणात गेले नव्हते, असे दिसून येते. आजपर्यंत पूर्ण पोवारी बोलीत/भाषेत लिहिलेले स्वतंत्र पुस्तक नव्हते. जयपालसिंह पटले, ॲड. मनराज पटले यांची पोवारीत अनुवाद केलेली पुस्तके आणि डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे यांची सांस्कृतिक माहितीची/इतिहासाची पुस्तके अपवादच होती. परंतू गेल्या तीन-चार वर्षात पोवारी साहित्य/कला/संस्कृती मंडळ, पोवारी इतिहास/साहित्य/उत्कर्ष समूह सारखे जवळपास 50 ते 60 फेसबुक आणि व्हाट्सॲप ग्रुप आपापल्या स्तरावर पुर्ण शक्तीने कार्यान्वित झाली आहेत. तसेच पवारी/पोवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळ द्वारा फेब्रुवारी-2019 मध्ये पहिले अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन घुमाधावडा/तिरोडा, जि. गोंदिया मध्ये झाले. या मंडळाच्या परिणामस्वरूप देवेन्द्र चौधरी यांच्या दोन स्वतंत्र पोवारी कवितांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांची कविता आणि कथांची पाच पुस्तके पण प्रकाशित झाली. या मंडळाद्वारे दोन वार्षिक पत्रिका पण प्रकाशित झालीत, 170 कविता स्पर्धा संपन्न झालीत आणि हा काव्य-यज्ञ सर्व पोवारी ग्रुप मध्ये अनवरत चालूच आहे.

उत्कर्ष ग्रुपची पण याच वर्षी एक खूपच सुंदर पत्रिका प्रकाशित झाली. या उत्कर्ष ग्रुपद्वारा डिजिटल माध्यमातून सुध्दा पोवारी बोलीच्या बाबतीत मोठ मोठे कार्यक्रम झाले. सौ. छाया सुरेन्द्र पारधी यांचे पण कवितेचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्या पुस्तकाला मी पोवारी संस्कृतीचा संक्षिप्त कोश म्हणतो. देवेंद्र चौधरी यांनी तर एक इतिहासच कायम केलाय. त्यांनी 2019 ला यवतमाळ येथे आणि 2020 ला उस्मानाबाद येथे, असे सतत दोन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पोवारी बोलीची कविता सादर करून पोवारी बोलीचा मराठी साहित्य जगतात झेंडाच रोवला. आणि आमच्या पोवारी बोली कविता स्पर्धामध्ये आम्हाला दोन लपलेल्या साहित्यिक/उत्कृष्ट रचनाकार/कवींचा सुंदर असा शोध घेता आला. ते दोन लपलेले साहित्यिक म्हणजे डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे (प्रहरी) आणि इंजि. गोवर्धन बिसेन हे आहेत. या दोन्ही रचनाकार/कवींची पोवारी कविता लाजवाब/उत्कृष्ट राहतात. या दोन्हीही उभरत्या रचनाकार/कवी यांना मी धन्यवाद देतो. या शिवाय डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे यांचे पोवारी बोलीविषयक दोन महत्त्वपूर्ण लेख मराठीच्या नामांकित पत्रिका युगवाणी (नागपूर) आणि प्रतिष्ठान (औरंगाबाद) येथे प्रकाशित झाले आहेत. डाॅ.अशोक राणा यांचा एक दीर्घ लेख सर्वधारा (अमरावती) या मराठीच्या नामांकित पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. माझे पण काही महत्त्वपूर्ण लेख आणि काही पोवारी बोलीतील कविता नामांकित मराठी पत्रिका अक्षरयात्रा (नागपूर), प्रतिष्ठान (औरंगाबाद), थिंक महाराष्ट्र (पोर्टल) आणि खेळ (पुणे), लोकमत : दीपोत्सव 2020 (नागपूर) येथे प्रकाशित झाली आहेत. शिवाय विविध राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यक्रमात पण माझे पोवारी बोलीविषयक योगदान राहिले आहे. माझ्या पोवारी बोलीच्या पुस्तकाचे ई-संस्करण/ई-बुक ॲमेझाॅन वर निशुल्क उपलब्ध आहे आणि जवळपास 10,000 लोकांनी ते पुस्तक डाऊनलोड केले आहे.

¤ प्रामाणिक मतभेद म्हणजे प्रगतीचा आवाज

इंग्रजीचा एक वाक्यसमूह असा आहे,

DISSENT : THE VOICE OF PROGRESS
Dissent. Encourage Dissent.
Manage Dissent – but with a sense of Responsibility, with Imagination, with Honesty, with the Confidence that things can be Better.

याचा सर्वसाधारण अर्थ असा होतो की, डिस्सेन्ट/मतभेद म्हणजे जणू काही प्रगती/विकासाचा एक पाया/पायरी आणि आवाजच आहे. परंतू असा मतभेद हा जबाबदारीपूर्ण, प्रामाणिक, विवेकपूर्ण आणि कल्पनाशील असला पाहिजे. मतभेदात/विरोधात मनभेद किंवा द्वेषपूर्ण आवेश नसायला पाहिजे. तेव्हाच तो मतभेद/विरोध हा प्रगती/विकासाचा आवाज म्हणूनच आपले प्रामाणिक कर्तव्याचे अनुपालन करू शकतो, असे म्हटले जाते. हा वाक्यसमूह नेहमी माझा मार्गदर्शक राहिला आहे आणि मी नेहमी या विचारांचा अनुगामी पण राहिलो आहे.

म्हणूनच आपल्या पोवार समाजांचे काही व्हाॅट्सॲप समूह आणि समाजमाध्यमाचे काही किरकोळ घटक जेव्हा काही प्रामाणिक मतभेद/विरोध व्यक्त करतात तेव्हा मला तो मतभेद/विरोध म्हणजे समाजाच्या प्रगतीचा/विकासाचा द्योतकच वाटतो. असा प्रामाणिक मतभेद/विरोधाचा मी सदैव सन्मानच करतो. असा प्रामाणिक मतभेद/विरोध समाजाच्या प्रमुखांना एक नवी दिशा, एक नवा विचार पण देवू शकतो. परंतू असा मतभेद/विरोध हा द्वेषपूर्ण/द्वेषजनित, पूर्वग्रहदूषित, अपरिपक्व, असंस्कृत, अपमानास्पद, आपमतलबी, अप्रामाणिक, अविवेकी वगैरे विशेषणांचा वाहक राहतो तेव्हा तो मतभेद/विरोध समाजाच्या प्रगती/विकासाला गंभीर रूपाने मारक आणि अधोगतीला पोषकच सिद्ध होत असतो. म्हणूनच आम्ही सर्व पोवार समाजांनी अशा अपरिपक्व, भेदभावपूर्ण आणि अप्रामाणिक मतभेद/विरोधाला ओळखून अशा कोणत्याच अविवेकी विरोधकांना प्रोत्साहन देऊ नये, असे मला वाटते. एकंदरीत कोणत्याच समाजाने प्रामाणिक मतभेद/विरोधाला न दाबता आणि न नाकारता त्याच्यावर सकारात्मक विचार करायला पाहिजे, ज्याच्यामुळे समाजाची सर्वांगीण प्रगती आणि विकासाचा मार्ग आणखी सुदृढ होवू शकेल.

परमार(प्रमार/प्रमर?) ची प्राकृत संज्ञा पोवार

याच उपविषयासंदर्भात मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या समाजाची मुळ प्रचलित संज्ञा पोवार हीच आहे, असे ऐतिहासिक दाखले मिळतात. परंतू या विषयावर प्रज्ञालोक या मराठी त्रैमासिकाच्या आश्विन पौर्णिमा शके 1943 (ऑनोडि-2021) च्या अंकात संपादक, सुप्रसिद्ध संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ डाॅ.म. रा. जोशी यांचे एक उद्घृत पण लक्षपूर्वक अभ्यासणे आवश्यक राहील असे मला वाटते. त्यानुसार “भारतवर्ष बहुभाषिक देश आहे हे सर्वमान्य विचारसूत्र जमेस धरूनच भाषा, साहित्य प्रदेश व भाषिक जन समाजांच्या प्रश्न व समस्या हाताळणे केव्हाही योग्य व सयुक्तिक ठरेल. एतद्संबंधी सुप्रसिद्ध काव्यशास्त्रज्ञ राजशेखर यांनी संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश भाषांचा एक गट कल्पून भाषा, साहित्य व साहित्यशास्त्रांचा जो ऊहापोह केला त्याची दखल घेणे आवश्यक आहे. भारतीय साहित्य शास्त्रज्ञांनी संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश भाषांची व साहित्यांची केवळ दखलच नव्हे तर साहित्यशास्त्र मीमांसेत त्यांना समयोचित स्थान दिले आहे.” या उद्घृताचे उपयोजन असे की, एक सुप्रसिद्ध भारतीय भाषाशास्त्रज्ञाचे, राजशेखराचे विचारांच्या प्रकाशात बघितल्यावर असे दिसते की, भाषाशास्त्री भाषेचे प्रमुखतेने तीन आयाम (संस्कृत/प्रमाण, प्राकृत आणि अपभ्रंश) सांगतात. पूर्वी संस्कृत ही प्रमाण भाषा होती, असे गृहीत धरता येते. परंतू कोणत्याच समाजाचे शतप्रतिशत लोक प्रमाण/संस्कृत भाषेत प्रवीण राहणे असंभवच असल्यामुळे बहुजनांच्या बोलचालीत प्राकृत भाषेचा स्वाभाविकच उद्भव होत जातो. भाषाशास्त्राचे अभ्यासक सांगतात की या प्राकृत भाषेचा उद्भव ईसवीसनपूर्व तिसरे शतक ते इसवीसन आठवे शतकापर्यंत आहे. याच काळात बहुतेक आमच्या समाजाची मूळ/प्रमाण संज्ञा परमार(प्रमार/प्रमर?) ची प्राकृत संज्ञा पोवार अशी झाली/बदलली असेल. ही संज्ञा वर्तमान काळपर्यंत प्रचलित राहिली आहे. परंतू आधुनिक काळात अपभ्रंश संज्ञा पण हळूहळू आकार घेवू लागली असेल.

अपभ्रंशाची उदाहणे

उदाहरणार्थ, ‘कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली’ ही सद्य प्रचलित म्हण वस्तूतः ‘कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तैलंग’ या ऐतिहासिक विधानाचा अपभ्रंश आहे/वर्ण विपर्यास आहे, असे भाषाशास्त्री सांगतातच. तसेच इतर संज्ञाचे पण अपभ्रंश झाले असावे काय, हा अभ्यास आणि सखोल संशोधनाचा विषय आहे. असे अपभ्रंशाचे पुष्कळसे उदाहरण आम्ही नेहमीच पाहतो/वाचतो/ऐकतो. जसे इंग्रजी स्लोप चे सुलुप, फर्स्टक्लास चे फस्किलास, टेन ऑन टेन चे टनाटन इत्यादी, आणि संस्कृत सूक्ष्म चे सूच्चम, प्राण चे प-यान, इत्यादी. असेच परमार(प्रमार/प्रमर?) या मूळ/प्रमाण संज्ञेचे प्राकृत रूप पोवार आणि पोवारचे अपभ्रंश (वर्ण विपर्यास) रूप पंवार/पवार झाले असेल काय, याचा सखोल अभ्यास आणि सप्रमाण भाषाशास्त्रीय (social/socio linguistics) संशोधन होणे आवश्यक आहे/राहील असे मला वाटते. परंतू आम्ही अशा अपभ्रंश/वर्ण विपर्यास संज्ञेला प्राधान्य न देता शेकडो वर्षांपासून प्रचलित प्राकृत पोवार हीच प्रमुख संज्ञा मानले/लिहिले पाहिजे, असे पण मला वाटते.

पवार संज्ञेवर संशोधनाची गरज

तथापि इथे एक वस्तुस्थितीची गोष्ट पण लक्षात ठेवणे अनिवार्य राहिल की, महाराष्ट्रातील यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यात जवळपास शंभर/दिडशे वर्षांपासून बसलेले आमच्या समाजाचे बहुतांश लोक आपली जात पवार अशी लिहितात आणि महाराष्ट्र शासनाचे/केंद्र शासनाचे शासन निर्णय पण पोवार या संज्ञेसोबतच पवार या संज्ञेला पण ओबीसी साठी प्रमाण मानतात. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील काही मराठा समाजाचे लोक आपली कूर/आडनाव पोवार अशी लिहितात. म्हणूनच परमार (संस्कृत/प्रमाण), पोवार (प्राकृत/प्रचलित/बहुसंख्य) आणि पंवार/पवार (अपभ्रंश?/अल्पसंख्यक) असे या संज्ञेच्या उच्चारणातील बदल/परिवर्तनाचा सखोल, सप्रमाण आणि सटीक असा अभ्यास आणि संशोधन (social/socio linguistics) होणे अनिवार्य रूपाने आवश्यक मानून अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आमच्या समाजाच्या प्रमुखांनी आता सजग आणि सज्ज झाले पाहिजे. अनावश्यक मनभेद, द्वेषजनित वक्तव्य/लेखन/प्रचार/कुतर्क/वितर्क इत्यादी पासून दूर राहून संवाद, समन्वय, सहअस्तित्वभाव सारख्या संश्लेषणात्मक प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे.

( पोवारीतून अनुवाद : इंजि. गोवर्धन बिसेन, गोंदिया )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गुळ उत्पादनातील त्रृटीवर उपाय सांगणारे पुस्तक

झाडीबोली साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

चार दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading