March 21, 2025
Lepakshi Temple & Its History Vijayanagara Architectural Marvel
Home » Lepakshi Temple & Its History | Vijayanagara Architectural Marvel
मुक्त संवाद

विजयनगर शैलीचे लेपाक्षी मंदिर अन् त्याचा इतिहास

ज्या साम्राज्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहिली, आपली मंदिरे टिकून राहिली, आपल्या सर्व कलांना प्रोत्साहन मिळाले इतकेच नाही तर आपल्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेतली ते साम्राज्य दुर्लक्षित राहिले.

डॉ. अस्मिता हवालदार

विजयनगरचे वैभवशाली, गौरवशाली साम्राज्य दक्षिण भारतात अडीचशे वर्षांहून अधिक काळ पाय भक्कम रोवून होते. पण या साम्राज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. ज्या साम्राज्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहिली, आपली मंदिरे टिकून राहिली, आपल्या सर्व कलांना प्रोत्साहन मिळाले इतकेच नाही तर आपल्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेतली ते साम्राज्य दुर्लक्षित राहिले. हंपी ही राजधानी होती, जी आता वैश्विक वारसा जाहीर झाल्यामुळे जगाचे लक्ष आकर्षून घेत आहे. हंपी पूर्वीची सुग्रीवाची किष्किंधा नगरी होती. लेपाक्षीत रावण आणि जटायूचे युद्ध झाले असे मानतात. त्यामुळे रामायणातले हे महत्वाचे स्थान आहे. लेपाक्षी नाव कसे पडले असेल या विषयी रोचक कथा आहेत.

आंध्रप्रदेशात अनंतपूर जिल्ह्यात हिंदुपूर तालुक्यात लेपाक्षी या लहानशा खेड्यात लेपाक्षी मंदिर आहे. वीरभद्र या शिवाच्या अवताराचे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले. हे विशाल मंदिरसंकुल विजयनगर साम्राज्याची स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला दिमाखाने मिरवत आहे. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे इथला मोठा नंदी, नागलिंग आणि तरंगता खांब. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य इथली चित्र आहेत. विजयनगरची प्रभावी चित्रशैली अन्य ठिकाणी फारशी दिसत नाही. अगदी हंपी मध्ये असलेल्या चित्रांच्या काळाबद्दल सुद्धा संभ्रम आहे. या पुस्तकात लेपाक्षी मंदिराची समग्र माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अनुषंगाने विजयनगर साम्राज्याचा इतिहास सांगितला आहे.

कलेचा अभ्यास करणार्‍यांसाठी लेपाक्षी मंदिर पर्वणी आहे. दक्षिण भारताच्या इतिहासात या मंदिराचे महत्वाचे स्थान आहे. त्या काळात असलेले उद्योग ,चालीरीती ,परंपरा ,पेहराव , अलंकार ,सण, उत्सव, समारंभ, धर्म,शस्त्रास्त्र, संगीत, वाद्य आणि अनेक विषयांचे ज्ञान यातून होते. जणू त्या काळाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. पौराणिक कथा, रामायण, महाभारतासारखी महाकाव्य इत्यादी विषयांवरची चित्रे, शिल्प इथे दिसतात. वैभवशाली साम्राज्य असल्यामुळे सर्व चित्रांत आणि शिल्पांत विविध अलंकार घातलेले स्त्री पुरुष दिसतात. स्त्रियांचे सुंदर अलंकार पाहून आश्चर्य वाटत राहते पण त्या नाकात मात्र कुठलंच आभूषण घालत नाहीत. नथ नाही, चमकी सुद्धा नाही. खर तर नथ ,चमकी हे आता सौभाग्यलेणे आहे. का असेल असं ? याचेही कारण आहे. हे मंदिर अपूर्ण आहे. कल्याण मंडप कधी पूरा होऊ शकला नाही. नका झालं असेल असं ? याच्याशी निगडीत कथा दंतकथा आहेत. पण संयुक्तिक कारणे आहेतच.

लेपाक्षी मंदिराची भव्यता पाहून मनोमन त्या काळच्या सर्व कलाकारांबद्दल मनात अपार कृतज्ञता दाटून येते. आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटू लागतो. तसेच हा आपला ठेवा आहे त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव होत राहते. लेपाक्षी मंदिर पाहायलाच हवे. तत्पूर्वी इतिहास जाणून घ्यायला हवा आणि काय पाहायचे हेही ! हे सर्व अभ्यासण्यासाठीच विजयनगर साम्राज्याचे लेपाक्षी मंदिर हे पुस्तक वाचायला हवे.

पुस्तकाचे नाव – विजयनगर साम्राज्याचे लेपाक्षी मंदिर
लेखिका –
डॉ. अस्मिता हवालदार
प्रकाशक –
मिहाना प्रकाशन
किंमत –
३०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading