July 2, 2025
Farmer is producer of Bramha article by rajendra ghorpade
Home » पूर्णब्रह्माचा पुरवठादार शेतकरी
विश्वाचे आर्त

पूर्णब्रह्माचा पुरवठादार शेतकरी

जगातील सर्व उद्योग संपू शकतील, बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही किंवा तो बंद पडून चालणार नाही. कारण कृषी मुलश्च जीवनम शेतीशिवाय जीवन जगणेच अशक्य आहे. यासाठीच तिन्ही ऋतुत राबून समस्त मानवजातीला अन्न म्हणजेच पूर्णब्रह्माचा पुरवठा शेतकरी करतो. त्याचा हा व्यवसाय आत्म्याप्रमाणे अमर आहे. पूर्णब्रह्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन ।
तैसें एकचि मान । शीतोष्णीं जया ।।202।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – तिन्ही ऋतुमध्ये आकाश जसे सारखे असते, त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादी द्वंद्वाची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असते.

शेतकऱ्याचे जीवन हे कष्टाचे आहे. ऊन, थंडी, पावसाळा असो त्याला या सर्व परिस्थितीत काम करावे लागते. ऊन आहे म्हणून नांगरटीचे काम थांबवता येत नाही. पाऊस पडतो म्हणून शेतात चिखल पेरणी करण्याचे टाळता येत नाही. थंडी आहे म्हणून उसाला पाणी देण्याचे टाळता येत नाही. काम करताना ऋतुंचा विचार करून चालत नाही. अशी स्थिती इतर उद्योगात नाही. पाऊस आहे, आज कामावर रजा सांगू. थंडी वाजते आहे, बाहेर पडायला नकोसे वाटते. आजच्या दिवशी घरी बसू. असे म्हणून कामाला दांडी मारता येते. ऑफिसमध्ये सांगितले की काम झाले. व्यापारीही पाऊस आहे. माल आज पाठवायला नको. उद्या पाठवू. त्यातही सूट मिळते. पण शेतीची कामे करताना अशी टंगळामंगळ करता येत नाही. आजचे काम उद्यावर ढकलता येत नाही. वेळ चुकवून चालत नाही. येथे आराम हराम आहे.

घात असतानाच पेरणी करावी लागते. पेरणीची योग्य वेळ साधावी लागते. यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य असावे लागते. शेतकऱ्यासाठी हे तीनही ऋतू सारखेच आहेत. इतके कष्ट घेऊन हाती काहीच मिळत नाही. अशी आजच्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. वर्षभर शेतात उसाचे पीक असते. ग्रामीण भागात चोवीस तास विजेचा पुरवठा होत नाही. वारंवार वीज खंडित केली जाते. अशा काळात रात्रीअपरात्री शेताला पाणी देण्याची वेळ येते. रात्रीच्या वेळी शेतात साप असू शकतात. विंचू, किडे असतात. या सर्वांचा धोका पत्करून धाडसाने हे काम करावे लागते. सध्याच्या काळात असे कष्ट करणारे मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे ही कामे स्वतःच करावी लागतात. शाळा कमी शिकला की कर शेती हाच नियम ग्रामीण भागात आहे. पण आता शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने कमी क्षेत्रात शेतीवर जीवन जगणे कठीण झाले आहे. पेरलेले केव्हा वाया जाईल याचा नेम राहिला नाही.

सोयाबीन तीन महिन्यात येते. भरपूर उत्पन्न देते. पण काढणीच्यावेळी पाऊस पडला तर पीक वाया जाण्याचा धोका असतो. पेरल्यानंतर सर्व हाती लागेल याचा नेम आता राहिलेला नाही. उसामध्ये कष्ट आहेत पण पीक वाया जाण्याचा फारसा धोका नाही. यामुळे अनेक शेतकरी उसाकडे वळले आहेत. पण उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांना आंदोलन उभारावे लागते. तेव्हा कुठे आज शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडू लागले आहेत. पण शेतीत कष्ट आहेत, धोके आहेत म्हणून शेती सोडून नोकरीच्या मागे धावणे योग्य नाही. भावी काळात शेतीला महत्त्व येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेते टिकवून ठेवायला हवीत. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असत, या जगातील सर्व उद्योग संपू शकतील, बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही किंवा तो बंद पडून चालणार नाही. कारण कृषी मुलश्च जीवनम शेतीशिवाय जीवन जगणेच अशक्य आहे. यासाठीच तिन्ही ऋतुत राबून समस्त मानवजातीला अन्न म्हणजेच पूर्णब्रह्माचा पुरवठा शेतकरी करतो. त्याचा हा व्यवसाय आत्म्याप्रमाणे अमर आहे. पूर्णब्रह्म आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading