October 4, 2023
Tips on Concentration in Mediatation article by Rajendra Ghorpade
Home » ध्यान करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ?
विश्वाचे आर्त

ध्यान करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ?

उतारवयात ध्यान नित्य नेमाने करत राहिल्यास आरोग्यही उत्तम राहते. शेवटच्या क्षणापर्यंत सतत ध्यानात रममाण व्हायला हवे. देह ठेवतानाही सद्गुरूंचे, भगवंताचे स्मरण ठेवले तरीही मोक्षाचा लाभ होतो. यासाठी पूर्वीच्या काळी अंतिम घटका मोजणाऱ्या, मृत्यूशय्येवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ धर्म ग्रंथांची पारायणे करण्याची पद्धत होती.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें ।
मनीं जें भावावें । बोलावें वाचें ।। 76 ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा

ओवीचा अर्थ – डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे.

ध्यान करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ? ध्यान कसे करावे ? हे प्रश्न नित्याचे असतात. संत ज्ञानेश्वरांनी ओव्यातून या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. हे समजावून सांगताना विविध उदाहरणेही त्यांनी सांगितली आहेत. भगवंताचे नामस्मरण सतत असावे. सद्गुरूंनी दिलेला गुरू मंत्र सतत जपला जावा. अनेक भक्त सतत नामस्मरण करतात. पण यातून काहीच साध्य झाले नाही. अशी त्यांची तक्रार असते. अशाने त्याचे मन विचलित होण्याचीही शक्यता असते. काही वेळेला या अध्यात्मावरचा विश्वासही उडतो. पण ध्यान करताना आवश्यक घटक आपण पाळले का ? याचा विचार कधीही केला जात नाही.

ध्यानामध्ये डोळे जरी मिटलेले असले तरी ते डोळे मनाने उघडे असतात. मनात अनेक घटना घडत असतात. ते मन सद्गुरूच्या रुपावर स्थिर करावे. त्या मनाच्या डोळ्यांनी सद्गुरूंचे रूप पाहावे. संत तुकाराम महाराज विठ्ठलाचा जप करताना डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहत. साक्षात विठ्ठल त्यांना दर्शन देत असे. ध्यानामध्ये सतत सद्गुरूंचे दर्शन घडणे हा सुद्धा साक्षात्कारच आहे.

सद्गुरूंनी दिलेला मंत्र जपताना त्याचा नाद कानांनी ऐकावा. सोहमचे स्वर ऐकावे. ध्यान योग्यप्रकारे लागले तर हे स्वर सहज कानाला ऐकू येतात. यामध्ये रममाण होता येते. ध्यानामध्ये मनाची एकाग्रता वाढते. यामुळे श्रवणशक्ती वाढते. याचे विकारही दूर होतात. यासाठी मनात सद्गुरू भाव प्रकट व्हायला हवा. भक्तिमय भावातून मनाला प्रसन्नता लाभते. मन आनंदी होते. उत्साह वाढतो. साहजिकच आपल्या शारीरिक आचार-विचारातही फरक पडतो. आरोग्यही सुधारते. बोलण्यातही मृदुपणा येतो. गोडवा येतो. यासाठी ध्यान हे योग्य प्रकारे व्हायला हवे.

ध्यान करताना या गोष्टींचा विचार जरूर करायला हवा. जप जपतानाही उच्चार स्पष्ट असायला हवा. ज्ञानेश्वरी वाचन करतानाही या गोष्टी जरूर पाळायला हव्यात. यामुळे आपल्या वाचन, श्रवण, स्मरण या शक्ती सुधारताच. उतारवयात ध्यान नित्य नेमाने करत राहिल्यास आरोग्यही उत्तम राहते. शेवटच्या क्षणापर्यंत सतत ध्यानात रममाण व्हायला हवे. देह ठेवतानाही सद्गुरूंचे, भगवंताचे स्मरण ठेवले तरीही मोक्षाचा लाभ होतो. यासाठी पूर्वीच्या काळी अंतिम घटका मोजणाऱ्या, मृत्यूशय्येवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ धर्म ग्रंथांची पारायणे करण्याची पद्धत होती. मोक्ष मिळावा हाच यामागचा उद्देश होता. त्या वृद्धाला अंतिम समयी भगवंताचे स्मरण राहावे व त्याला मोक्ष मिळावा. हेच यातून साध्य करायचे असते.

Related posts

प्रत्येक सजिवात देवत्वाची अनुभुती

कळावयास सुलभ अशी मराठी भाषा

आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग

Leave a Comment