पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा !
दिनाचा सोयरा पांडुरंग !
दरवर्षीप्रमाणे सर्वत्र आषाढ वारीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बळीराजा आपल्या शेतातील पेरणीची तयारी बी-बियाणे, नांगर, वखर, खत हे सर्व सुसज्ज करून त्या जिवलगाच्या भेटीची वाट पाहतो.
भेटी लागी जीवा ! लागलीसे आस !
या विठ्ठल भक्ताला पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते. ज्याप्रमाणे सासुरवाशीन आपल्या सुखदुःखाचे गाऱ्हाणे सांगण्याकरता माहेरच्या ओढीने आपली सर्व कामे आटोपून ती माहेरा जाते त्याप्रमाणे या केशवाला, पांडुरंगाला, विठ्ठलाला आपल्या सुखदुःखाची गाऱ्हाणी सांगण्याकरता वारीमध्ये सहभागी होतात. टाळ मृदंग, विना, चिपळ्या हातात घेऊन देहेभान विसरून ऊन वारा पाऊस त्या माय बापाच्या सखा बंधूंच्या आत्मत्वाचा धागा त्या पांडुरंगाची आत्मतत्वाचे नाते जोडतो व भक्तीरसात न्हाऊन निघतो. भक्तीचा आनंद लुटतात. घरदार संसार, बायका मुले, धन दौलत याचा विसर पडून भक्तीचा आनंद लुटतात. भक्तीचा आनंद भक्तांनाच माहित असतो.
आनंदाचे डोही आनंद तरंग ! आनंदची अंग ! आनंद !
धागा धागा खंड जुळूया विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया !
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी !
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा तेथे !
अशी सर्व संतांनी ग्वाही दिली आहे. सर्व संतांनी सांगितले आहे अभंगाद्वारे, भजनाद्वारे सर्व भक्तांना आवर्जून सांगितले आहे की पंढरपुरात प्रत्यक्ष भगवान आजही आहे.
पंढरी निवास ! सख्या पांडुरंग ! दरवर्षी आषाढी एकादशीला देव प्रगट होतात. तो भक्त पुंडलिकासाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे.
आषाढी कार्तिकीला हा जनसमुदाय अथांग अफाट समुद्राप्रमाणे तिथे अलोट गर्दी करतात. तो विठुराया आपल्या भक्ताची वाट बघतो. सर्व संतांची मांदियाळी या पंढरपुरात दाखल होते. हा स्वर्गीचा सुख सोहळा पाहण्याकरता, अनुभवण्याकरिता न महाराष्ट्रातील वारकरी, आबाल वृद्ध, मुलेबाळे या सोहळ्यात दाखल होतात व मनात भावना करतात की
भाग गेला शिन गेला !
तुझा पाहता विठ्ठला !
पाई असणारे वारकरी यांचे स्वागत करण्याकरता गावोगावीचे भक्त त्यांची मनोभावे सेवा करतात व स्वतःला धन्य मानतात.
सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षेम मी देईन पांडुरंगा ही आस त्या वारकऱ्यांच्या अंतकरणात असते. रिंगण घालने, फुगडी खेळणे, लोटांगण घालने, एकमेकाला आलिंगन देऊन जात, धर्म, पंथ या सर्वांना ओलांडून आपण एका पांडुरंगाचे लेकरे आहोत असा देह भाव झाला असतो. पंढरीच्या दर्शनाची कितीही मोठी बारी असली तरी पांडुरंगाच्या दर्शना करतात जणू
हाचि नेम आता ! न फिरे माघारी ! असे आश्वासन त्या पांडुरंगाला देतात व दर्शन घेऊन धन्य होतात.
नामस्मरणात, कीर्तनात दंग होतात. हा भक्तीचा मळा त्या पंढरपुरात फुलून निघतो.
वारकऱ्यांची ही सुंदर परंपरा आहे या वारकऱ्यांपासून काही शिकण्यासारखे आहे. वारीचा काळ ठरलेला आहे किती किलोमीटर आहे जायचे आहे. प्रेरणा टिकून ठेवण्याचं काम, असलेला भाव, भक्ती, प्रेरणा सातत्य ठेवण्याचं काम परिस्थिती कसलीही असो तक्रार नाही. खूप सुंदर परंपरा आहे. आताच्या काळात विठुरायाचे दर्शन, पंढरीला पोहोचणे वारी करणे या सर्व गोष्टी तरुण मुला-मुलींकरता आदर्श आहे. या वारकऱ्यांचा उत्साह मावळत नाही. क्षणभर विश्रांती घेतली की दुसऱ्या दिवशी उत्साह कायम असतो. त्यांना कोणीच सांगितले नसते. याला कारण म्हणजे भगवंताविषयी असलेले प्रेम वारा, ऊन, पाऊस याबद्दल वारकऱ्यांची कसलीच तक्रार नाही. कुठलीही परिस्थिती असो आपले ध्येय कायम ठेवतात.
वारीचे अन्य प्रकारचे उद्देश आहेत. अधिकाधिक भक्त दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. परंतु काही आपण आयुष्यात पंढरपूरला गेलोच नाही म्हणून तिथला सोहळा बघावा म्हणून जातात.
श्रीमद् भगवद्गीतेमध्ये चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे
आर्तता. हे विठुराया मी संसाराच्या दुःखाने पोळून गेलेलो आहो. माझी जी काही समस्या असेल ती तू निवारण कर. त्याकरिता पांडुरंगा मी तुझा धावा करतो आहे. माझा सखा, मायबाप, बंधू तूच आहेस तर माझ्या हाकेला धावून ये. मी तुझी दरवर्षी वारी करेन ही आर्त भक्ताची प्रार्थना असते ही आर्तता असलेल्या भक्तांची प्रार्थना असते.
अर्थार्थी – जीवनात अर्थाला फार महत्त्व आहे. पैशाशिवाय काहीही भागू शकत नाही. हे विठुराया आता माझं साकडं तू दूर करू शकतो. तर मी तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. मला कोणीच त्राता नाही. माझी ही संसार रुपी नाव तूच पार करू शकतोस हे दीनानाथ तू मला सहाय्यकारी हो. हा एक उद्देश घेऊन गाऱ्हाण घेऊन हा भक्त विठ्ठलाच्या पायाशी लोटांगण घालतो.
जिज्ञासू हा भक्त पांडुरंगाकडे मागणी करतो की हे विश्वंभरा तू कसा आहेस; कुठे आहेस या मानवी जन्माचं सार्थक करायचं असेल तर तुझे दर्शन मला व्हावे. त्यामुळे मी कृतकृत्य होईल. तू मला अध्यात्म मार्गावर ने व मला तुझे स्वरूप कळू दे मला ज्ञान दे ही जिज्ञासू भक्तांची पांडुरंगा चरणी विनंती असते.
ज्ञानी हा ज्ञानी भक्त एकच मागणी मागतो की
सदा माझे डोळा !
जडो तुझी मूर्ति ! रखुमाईच्या पती सोयरीया ! गोड तुझे रूप ! गोड तुझे नाम ! देई माझं प्रेम सर्वकाळ !
हे पंढरीराया तुझे पायी आत्मसमर्पण. शरणांगती, चित्त मनासहित सर्व भावे मी तुला शरण आलो आहे. या क्षणभंगुर संसारातून मी तुझ्या अक्षय स्वरूपाला प्राप्त व्हावे हीच माझी प्रार्थना आहे. हाच ज्ञानी भक्ताचा क्रिया, नेम धर्म बनला आहे.
हे चारही प्रकारचे भक्त या वारीत असतात. वारकरी संप्रदायाची पायाभरणी म्हणजे
ज्ञानदेवे रचिला पाया ! उभा रिले देवालया ! तुका झालासे कळस ! या विठुरायाचं वैभव म्हणजे
विठु माझा लेकुरवाळा ! संगे गोपाळांचा मेळा !
निवृत्ती हा खांद्यावरी !
चोखा जीवा बरोबरी !
पुढे चालेल ज्ञानेश्वर ! मागे मुक्ताई सुंदर
या वारीत भक्तीला पूर आलेला असतो. अलोट गर्दी असते अवघी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी ! टाळ मृदुंगाच्या गजरात; विणेच्या सुस्वारात; अबीर गुलाल उधळीत लोटांगण घालून; एकमेकांना आलिंगन देऊन भक्ताला प्रेमाचे भरते येते:
उच्च नीच गरीब श्रीमंत विद्वान धनी सान थोर याचे भानच राहत नाही. निर्मळ चित्ते झाली नवनीत ! पाषाणा पाझर फुटती रे ! आप परभाव निवडल्या जातो. पंढरीचे दर्शन घेऊन हा वारकरी धन्य होतो. पांडुरंगाच्या चैतन्याची शोभा, ऊर्जा यात्रेतून घेऊन, हृदयात पांडुरंग साठवून आपल्या संसाराकडे मार्गस्थ होतो. दूरदर्शन वर पाहण्यात येणारा सोहळा व प्रत्यक्ष त्या सोहळ्यात सहभागी होऊन आनंद लुटण्याची एक आगळीक यामध्ये फरक आहे.
म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसारा ! दिनाचा सोयरा पांडुरंग !
महाराष्ट्रातील या दैवताचे दर्शन जो घेतो तो धन्य होतो.
सौ पुष्पा सुनील वरखेडकर,
माजी पर्यवेक्षिका पी डी कन्या शाळा वरूड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.