संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतलेल्या इचलकरंजी पालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका कलावतीबाई मुठाणे यांचे सोमवारी रात्री निधन झाले
इचलकरंजी – येथील पालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका श्रीमती कलावतीबाई आण्णासाहेब मुठाणे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
इचलकरंजी नगरपालिकेच्या १९५२ – ५७ सालाच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगरसेविका म्हणून श्रीमती मुठाणे यांची ओळख आहे. कर्तव्यकठोर ऑक्ट्राॅयचे चेअरमनपद त्यांनी भुषविले होते. राष्ट्र सेवा दलाच्या ऊंड्री (पुणे) येथील भाई वैद्य, पन्नालालजी सुराणा यांच्या नेतृत्त्वात आयोजित पहिल्या शिबिराच्या प्रबोधक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्या, इचलकरंजी नगरपालिकेच्या पहिल्या टि. पी. स्कीमच्या व पाणी पुरवठा स्कीमच्या संकल्पक त्या होत्या.
त्यांनी १९७७ मध्ये महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच यात तुरूंगवासही भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्या सहभागी होत्या. त्यांच्या जाण्याने इचलकरंजीतील स्वातंत्र्य चळवळीचा दुवा निखळला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट साहित्य परिषेदेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य राजन मुठाणे यांच्या त्या मातोश्री होत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.