खरेच लग्न मग तो प्रेमविवाह असो वा ठरवून बघून पत्रिका जुळवून केलेले असो ते सहजीवन यशस्वी आपोआप होत नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि तेही दोन्ही बाजूने. कारण प्रेमात असतांना दोन्ही व्यक्ती आपली चांगली बाजू समोरच्या व्यक्तीला दिसेल याची काळजी घेत असतात.
सौ सुनेत्रा विजय जोशी
दचकलात ना? चाळीशीत लग्न नाही तर लग्न चाळीशीला आलेले. म्हणजेच लग्नाचा चाळीसावा वाढदिवस. काल अनुच्या लग्नाच्या चाळीसव्या वाढदिवसाला गेले होते. साग्रसंगीत विधीपुर्वक पुन्हा लग्न थाटामाटात केले. खूप आनंदात दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलले.घरी आले पण मनात विचारचक्र सुरुच होते. आपल्या देशात आधीच्या किंवा आता आजी आजोबा झाले आहेत अशापर्यंतच्या पिढीत लग्नाचा पंचविसावा किंवा पन्नासावा वाढदिवस पण नव्याने सगळे विधीचे सोपस्कार करून ह्वायचे आणि होतात. त्यात नवीन असे काही नाही. इतके वर्षे सहजीवन हा एक संस्काराचा भाग. तसेच एकदा लग्न झाले की मग परतीचा मार्ग इतका सोपा नव्हता.पदरी पडले अन पवित्र झाले. ही भावना होती.
अर्धा संसार तर होणाऱ्या तीन चार मुलांना वाढवण्यातच संपायचा. त्यामुळे आपले एकमेकांशी पटते की नाही हे कळायला वेळच नसायचा. शिवाय छोटेमोठे वाद झालेच तर आजुबाजुला पण सासू सासरे दीर जावा नणंदा वगैरे इतर नातेवाईक समेट घडवून आणायला असायचे. तेव्हा मधे मोठ्यांना बोलायला वाव असायचा आणि लहान मंडळी ऐकायची पण. आता सासरची मंडळी सोडाच पण स्वतःचे आई वडील पण मधे पडू शकत नाही. कारण मुलगा किंवा मुलगी ऐकतील की नाही याची शाश्वती नसते. आता नवीन पिढीला घरात मोठे कुणी क्वचितच असते आणि असलेले आवडते त्यामुळे भांडण विकोपाला लगेच जाते. आणि घटस्फोटाचे वाढते प्रमाण दिसते. तेव्हा नव्या पिढीतले घटस्फोट बघता पुढे बापरे तुमच्या लग्नाला इतकी…. वर्षे झाली? असे म्हणत जातील बहुतेक. अर्थात असे सरसकट नाही पण हल्ली इतक्या बारीकसारीक कारणाने घटस्फोट होतांना दिसतात की आश्चर्य वाटते. कदाचित खरी कारणे अजुनही काही वेगळी राहत असतील…
लग्नात सप्तपदी एक महत्त्वाचा विधी. पण तेव्हा ते जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी करतच नाही. एका नव्या प्रणयाच्या राज्यात जाण्याची ओढ मनात असते बाकी काही डोक्यात शिरत नसते. भटजी मधेच हाताला हात लावून मम म्हणायला सांगतात. आपणही स्वप्नातच मम म्हणतो. असे ते स्वप्नांचे दिवस लवकरच संपतात. आणि वास्तवाचे भान आल्यावर मग मन त्या सप्तपदीचे अर्थ लावायला बघते. तो समजला आणि उमगला तर पुढचे सगळे आपोआप सुखकर. किंवा सहजपणे चालता येते. नाहीतर स्फोट असतोच.
खरेच लग्न मग तो प्रेमविवाह असो वा ठरवून बघून पत्रिका जुळवून केलेले असो ते सहजीवन यशस्वी आपोआप होत नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि तेही दोन्ही बाजूने. कारण प्रेमात असतांना दोन्ही व्यक्ती आपली चांगली बाजू समोरच्या व्यक्तीला दिसेल याची काळजी घेत असतात. पण लग्न झाल्यावर मात्र जेव्हा चोवीस तास एकमेकांसोबत राहण्याची वेळ येते तेव्हाच खरा स्वभाव आणि ख-या सवयी कळतात. आणि इथेच मग तू असा किंवा अशी असशील वाटले नव्हते सुरू होते. पण आहे तसे स्विकारले आणि स्वतःमधे थोडा बदल करण्याची तयारी असेल तरच पुढे आनंदाने एकत्र राहता येते. आणि” थोडा तू पुढे ये ना थोडी मी पण मागे येते”असे म्हटले तर मग लग्नाची गाडी चाळीशीलाच काय तर पन्नाशी किंवा साठीला पण नक्कीच पोहोचते. तसेच मधला प्रवास सोपा तर होतोच पण आनंददायी सुध्दा. कधी मधला काळ संपला हे ही कळत नाही. तेव्हा एरवी वयाची चाळीशी आली आता.. असे म्हणणारे लग्नाची चाळीशी मात्र धुमधडाक्यात साजरी करतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.