November 8, 2025
कामगार, शेतकरी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आपल्या शाहिरीतून चेतवणारे लोकशाहीर कॉम्रेड अमर शेख यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास जाणून घ्या – लाल बावट्याचा आवाज.
Home » बार्शीचे एक रत्न…
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

बार्शीचे एक रत्न…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते : कॉम्रेड अमर शेख जयंती विशेष…

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या खणखणीत शाहिरीने अवघ्या महाराष्ट्रीय जनतेच्या मनात स्वदेश प्रेम निर्माण करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख व द. न. गव्हाणकर या त्रिरत्नांपैकी पैकी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे एक रत्न अमर शेख उर्फ मेहबूब हुसेन शेख यांचा आज जन्म दिवस आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा माझा छोटा लेखन प्रपंच..

डॉ. मनीषा झोंबाडे, बार्शी, जि. सोलापूर

20 ऑक्टोबर 1916 रोजी जन्मलेले शाहीर अमर शेख हे महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर होते. बार्शी येथील गरीब मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या शाहीर अमर शेख यांचे वडील हुसेन शेख यांचे मूळ गाव कुंभेफळ ता. परांडा, जि. धाराशिव हे होते. हुसेन हे रेल्वे मध्ये तिकीट चेकर असल्याने त्यांचा कुंभेफळशी जास्त संपर्क नव्हता. अमर शेख यांची आई मुनेरबी ही बुरखा पद्धतीमध्ये राहणारी संस्कारीक, साधी भोळी, दिसायला सर्वसाधारण अशी गृहिणी होती. शाहीर अमर शेख हे लहान असताना हुसेन शेख व मुनेरबी यांचा घटस्फोट झाल्याने मुलाच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी मुनीरबी यांनी घेतली. मुनीरबीने आपले सासर कुंभेफळहून पुढे आपल्या बंधूच्या आश्रयास बार्शीच्या मंगळवार पेठेत राहिल्या. अमर शेख यांना त्यांनी खूप कष्टात वाढविले. आपल्या आईच्या कष्टाची जाण अमर शेखांना शेवटपर्यंत होती. मुनेरबी ही अतिशय सुंदर काव्यरचना करीत. मुनेरबीचे काव्या अमर शेखांच्या आत्म्यापर्यंत पोहोचले म्हणून पुढे मुनेरबी आम्माच्या काव्यरचनाचा वसा अमर शेख यांनी अखंडपणे चालविला.

अमर शेख यांच्या संघर्षमय जीवनाची सुरुवात बार्शी इथूनच झाली. घरच्या गरीब परिस्थितीमुळे अमर शेख यांना कष्ट करून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. अत्यंत हलकीच्या परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. मोठ्या हिम्मतीने व चिकाटीने सातवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हाती पडेल ते काम करून स्वतःच्या कुटुंबाचा उदर निर्वाह करू लागले. दहा-बारा वर्षाचे असतानाच त्यांनी ट्रकवर क्लिनर म्हणून काम केले तर कधी पाणक्या म्हणून काम केले. बार्शीच्या राजन मिलमध्ये ते कामगार होते. मिलमध्येमध्ये आयटक या केंद्रीय कामगार संघटनेची शाखा असल्याने गिरणी समोर कामगारांची उपोषणे, सभा, मोर्चे, आंदोलने होतं.

गिरणी मधील या सर्व मोर्चा आंदोलनाने शाहीर अमर शेख प्रभावित झाले. कारण गिरणी कामगार म्हणून ते ही राबत होते. कामगारांची होणारे शोषण त्यांच्यावर होणारा अन्याय हा त्यांनीही अनुभवला होता. त्यामुळे कामगार चळवळींमध्ये ते सहभागी झाले. कामगाराचे जीवनमान बदलले पाहिजे यासाठी त्यांनी सामाजिक लढा दिला. गिरणी संपामध्ये भूमिकेमुळे त्यांना विसापूर तुरुंगात टाकण्यात आले होते. त्याच तुरुंगात कम्युनिस्ट नेते कॉम्रेड रघुनाथ कर्‍हाडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. कराडकरांच्या ज्यांच्या मार्क्सवादी विचारसरणीमुळे अमर शेख त्यांच्यावर प्रभावित होऊन मार्क्सवादी विचाराकडे वळले.

कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर या कम्‍युनिस्‍ट नेत्‍याच्‍या मार्गदर्शनाखाली त्यांनी कामगारांचे संघटन करून कामगारांवर होणाऱ्या अन्यविरुद्ध लढू लागले. त्यामुळे त्यांना भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाचे सभासदत्व मिळाले. त्यांनी बार्शीमध्‍ये अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतसारा वाढीविरुद्ध 25 हजार लोकांचा मोर्चा काढून प्रशासनाचे धाबे दणानून सोडले होते. शाहीर अमर शेख हे केवळ आपल्या मातृभूमीतील कामगारांसाठीच लढले नाहीत. तर त्यांनी महाराष्ट्रातील स्वतंत्र्यलढाच्या चळवळत देखील आपला लढा सुरू ठेवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम अशा देशाच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले, समाजाला देश प्रेमाबद्दल चेतवून टाकले. त्यांची लोककला ही अंगावर शहारे आणणारी होती. स्वाभिमानाची शिकवण देणारी होती.

त्यांच्या धारदार लेखणीने आणि पहाडी आवाजाने समाजाला चेतवून टाकले होते. पोवाडे, गीते, लोकगीते अशा लोकनाट्यातून त्यांनी समाज परिवर्तन केले. शाहीर अमर शेख हे मार्क्सवादी विचारसरणीचे कवी होते. मार्क्सवादावर त्यांची श्रद्धा होती म्हणूनच आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षात निस्वार्थपणे काम केले.

अमर शेख गिरणी कामगार नेते कमलाकर पिंपरकर व रघुनाथ कऱ्हाडकर हे जनजागृतींचे विविध कार्यक्रम करून इंग्रज व भांडवलादारांविरोधात आवाज उठवत असे. त्यांनी 1939 साली युद्धविरोधी घोषणा दिल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना अटक केली. 1939 ते 1941 या कालावधीत त्यांना जवळपास 18 महिने तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतरही इंग्रज त्यांच्यावर पाळत ठेवून होते. याच पाळतीमुळे ते कामगार व स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्त झाले. या कालावधीत त्यांनी चित्रपटांत कामं केली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या समवेत त्यांनी सहाय्यक चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केले. त्याचबरोबर आचार्य अत्रे यांच्या महात्मा फुले चित्रपटातही अभिनय केला.

चित्रपटात काम केल्यानंतर 1944 मध्ये पुन्हा ते चळवळीमध्ये आले. 7 जानेवारी 1944 रोजी टिटवाळ्यामध्ये जी किसान सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समवेत पोवाड्याचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. अण्णा भाऊ साठे,अमर शेख आणि द. न. गव्हाणकर तिघांनी मिळून ‘लालबावटा कला पथक’ स्थापना केले. याच लाल बावटा कलापथकाद्वारे होणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांमुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला गती मिळाली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading