एक साधा नियम पाळला तर. पण तसे होत नाही आणि मग हा भितीचा बागुलबुवा निर्माण करावा लागतो. लहानपणी जर अभ्यास करण्याची सक्ती केली नाही तर कुठले मुल शिकेल तरी का आपणहून.. पण… आपल्या मनाला नेमके जे करू नको सांगितले जाते ते आपण उगाच त्यात काय ? म्हणून करू पाहतो. हे एकच उदाहरण त्या बागुलबुवासाठी पुरेसे आहे.
सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी.
मोबाईल 9860049826
हे बघ तू ऐकल नाहीस ना तर तो बघ बागुलबुवा तिथे अंधारात बसलेला आहे तो सगळे बघतोय. आणि मग असा हट्ट केला की तो पकडून नेतो बरं… अस आईने म्हटले की मग आपल्याला खरे तर त्या काळ्याकुट्ट अंधारात काहीच दिसत नसते पण आपणही घाबरून आईला बिलगतो. आणि तो पकडून नेईल या भितीपेक्षा आई जवळ नसेल तर कसे होईल या भितीने ती जे काय सांगते ते निमुट ऐकतो…
पण आई अशी भिती का दाखवते ? तर आपण काहीतरी वेडवाकड वागणार असतो किंवा आपल्यालाच दुखापत होईल किंवा आपले काही नुकसान होऊ नये, अशी तिची इच्छा असते.. आधी ती बाबा रागावतील असे सांगून पाहते. पण आपण त्याला दाद देत नाही. मग उपाशी ठेवण्याची धमकी देऊन पाहते. पण आपल्याला पक्के ठाऊक असते, ती तसे फार वेळ करू शकणार नाही. आणि मग आपण तिच्या कुठल्याही प्रयत्नाला घाबरत नाही, असे बघून ती शेवटचा प्रयत्न म्हणून हा काल्पनिक बागुलबुवा उभा करते. तिच्या आधी तिच्या आईने पण तेच केले असते.
घरात काय किंवा समाजात काय असे बागुलबुवा हवेतच. त्यामुळे का होईना माणूस थोडा तरी शिस्त पाळतो. आता हेच बघा ना हेल्मेट सक्तीचे केले. खरे तर ते वापरणे हे तुमच्या सुरक्षेचा भाग आहे. पण तरी आपण ते समजून न घेता काय करतो ? तर हेल्मेट वाल्याचे फावले असे म्हणतो . यात त्या मंत्र्यांना कमीशन असणार अशा वायफळ चर्चा करून ते वापरत तर नाहीच वर पोलीसमामाने अडवले तर त्यालाही शिव्या घालतो. बरे मग मुकाट दंड भरावा ना? तर नाही आपण पावती फाडण्याऐवजी त्याला चिरीमिरी चे आमिष दाखवून लाच घेण्यासाठी खतपाणी घालतो. मग कसे हे लोक भ्रष्टाचार करतात म्हणून पुन्हा ओरड करायला मोकळे.. तर इतके करून आपले जीवन धोक्यात घालायचे शिवाय वर अॅक्सीडेंट करून स्वतःसोबत ज्याची यात काही चूक नाही अशा समोरच्या माणसाला ठोकून त्याचा जीव धोक्यात पाडायचा असे कशाला? …
एक साधा नियम पाळला तर. पण तसे होत नाही आणि मग हा भितीचा बागुलबुवा निर्माण करावा लागतो. लहानपणी जर अभ्यास करण्याची सक्ती केली नाही तर कुठले मुल शिकेल तरी का आपणहून.. पण… आपल्या मनाला नेमके जे करू नको सांगितले जाते ते आपण उगाच त्यात काय ? म्हणून करू पाहतो. हे एकच उदाहरण त्या बागुलबुवासाठी पुरेसे आहे. खरे तर आज समाजात जो तो मनासारखे मुक्त जगायला बघतो. पण आपल्या त्या वागण्याचा दुसर्या कुणाला त्रास होतोच ना.. एकाची सुटका ते दुसर्या चे बंधन असते… शिवाय माणूस हा प्राणी तसा शुरवीर डोकेबाज. त्यामुळे दृश्य शक्तीशी ती चतुराईने किंवा शक्तीने किंवा शस्त्र अस्त्राने मुकाबला करूच शकतो न घाबरता. पण अशा अदृश्य बागुलबुवाशी दोन हात कसे बरे करणार ? हे कळत नाही म्हणून मग ही बागुलबुवा ची संकल्पना आली असावी. पण असो कधी कधी असे घाबरल्यानेही एखादे वाईट कर्म आपल्या हातून घडत नाही हेही तितकेच खरे…तेव्हा कधीकधी चांगल्या गोष्टी साठी ती भिती मनात असणे आवश्यक आहे. अर्थात अती सर्वत्र वर्जयेत् .. म्हणून त्यासाठी तरी हा बागुलबुवा मनात जपाच. आणि हो पुढच्या पिढीच्या पण मनात जागवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.