मित्र तोच की जो तुमच्या आवाजावरून सुध्दा ओळखतो की आज तुम्ही आनंदी आहात की काळजीत की दुःखी. तसेच मदत करतो मनातून. आणि मुख्य म्हणजे जो आपल्या आनंदात सहभागी तर होतोच पण आपल्या आनंदाने आनंदी पण होतो.
सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी.
काय आहे बरे तुझी माझी मैत्री
केव्हाही सोबत आहेच ही खात्री. .
आज मैत्री दिन… खूप शुभेच्छा संदेश मोबाईल भर इकडून तिकडे फिरतील. प्रेमाचे भरते येईल. प्रत्येक जण दुसर्याचा किती जवळचा आहे याची चढाओढ लागेल. असो. तर मग काय एकमेकांना हाऊ स्वीट.. क्युट वगैरे उधळण पण होईल. पण वेळ येताच यातले खरेच किती उपयोगी पडतात? हा प्रश्न कधी स्वतःला विचारून बघा. आणि काय उत्तर मिळेल ते बघा.
मित्र तोच की जो तुमच्या आवाजावरून सुध्दा ओळखतो की आज तुम्ही आनंदी आहात की काळजीत. तसेच मदत करतो ती मनातून. आणि मुख्य म्हणजे जो आपल्या आनंदात सहभागी तर होतोच पण आपल्या आनंदाने आनंदी पण होतो. कारण कुणाच्या आनंदाने आनंदी होणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्यासाठी खूप मोठे आणि निःस्वार्थ मन असावे लागते. कारण दुःखात तर सहभागी सगळे असतात. पण आनंदात खरोखर आनंद होणारे खूप कमी. आजही मनातले सगळे खरे खरे ज्या मित्र किंवा मैत्रीणी जवळ सांगू शकतो असे मित्र क्वचितच कुणाला लाभतात. बाकी तुमचे गृहछिद्र जरा कळले तर तुला म्हणून सांगते करत गावभर करणारेच जास्त असतात..
दिवसेंदिवस आता आभासी जगात सुख दुःख हे आभासी झाले आहे. आणि मित्र मैत्रिणी पण. अर्थात याला अपवाद पण असतातच. सरसकट असे नाही पण बहुतांशी…
भावपूर्ण श्रद्धांजली आणि अभिनंदन या दोन शब्दात सुखदुःखाची इतिश्री होते. असो हा काळाचा महिमा आहे… तरीही आजही आपल्याला खरा मित्र असावा ही आस अंतरात असतेच. पण प्रत्येकाने ती सुरवात स्वतःपासून केली तर काय हरकत आहे? आपल्याला जसे वाटते की आपल्याला जसा मित्र हवाय तसे आधी आपण कुणाचे तरी मित्र होऊ या. मग साहजिकच आपल्याला पण तसा मित्र लाभेलच. मैत्रीत विश्वासाला खूप महत्त्व आहे. अर्थात ते प्रत्येक नात्यातच असते. आणि मैत्री कुणाशी जुळेल हे वयावर किंवा हुद्द्यावर अवलंबून नसते. ती भाग्यानेच लाभते. समविचारी आणि समान आवडीनिवडी असलेल्याशी तर होतेच पण भिन्न आवडीनिवडी असल्या तरी होऊ शकते. तेव्हा खरा मित्र व्हा आणि खरा मित्र मिळवा… बघा म्हणणे पटतेय का?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.