July 21, 2024
New Concept in Dipawali in New Generation article by Sunetra Joshi
Home » दिवाळी हरवत चालली आहे !
मुक्त संवाद

दिवाळी हरवत चालली आहे !

पुर्वी दिवाळी…म्हणजे फराळ फटाके आणि नवीन कपडे हे समीकरण ठरलेले होते. तसेच आपण कुठेतरी पाहुणे म्हणून जायचे किंवा आपल्या घरी तरी कुणी पाहुणे येणार हे ठरलेले असायचे. आणि मग खूप धम्माल. पण आता ?
सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

आपले सण उत्सव हे खूप उर्जा देणारे असतात. शरीराला आणि मनाला..त्यामागे निसर्गाची देवदेवतांची आपल्यावर असणारी कृपादृष्टी तशीच राहो ही प्रार्थना तर असतेच पण कृतज्ञता व्यक्त करणे सुध्दा असते. दिवाळी आली की एक चैतन्य सगळीकडे पसरते. मातीच्या पणत्या महत्वाच्या. कुंभाराला पण चार पैसे मिळतात. काही ठिकाणी मातीच्या लक्ष्मीच्या मुर्तीची पुजा करतात.. माती पंचमहाभूतापैकी एक. मातीचे शरीर शेवटी मातीतच रुजून पुन्हा जन्म घेते..तिची पुजा…गोड, खमंग, खारे, तिखट सगळे पदार्थ बनतात. यातून सुद्धा जिवनाचे एक खूप मोठे तत्वज्ञान कळते. आयुष्यात गोड, तिखट, खमंग अशा सगळ्या प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात तर तसे सगळेच प्रसंगही येतच असतात. अशा सरमिसळ अनुभवांनी आयुष्य बनत असते. एकाच रसाने आयुष्य सपक वाटेल.

हे सगळे सण म्हणजे आजकालच्या डेज प्रमाणे आहेत. त्या त्या देवतांची आठवण म्हणून तिची पुजा. पण त्या लक्ष्मीसोबत घरातली गृहलक्ष्मी प्रसन्न राहिल याची पण काळजी घ्यायला हवी. प्रसन्न म्हणजे नुसती भेटवस्तू देऊन असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तर तुमचे वागणे बोलणे तसेच तिच्या विषयी आदर असणे अपेक्षित आहे. पुर्वी स्त्री घरात आणि पुरुष बाहेर अशी वाटणी होती पण आता दोघेही बरोबरीने बाहेर पडतात तर घरात सुध्दा थोडा हातभार आवराआवर करायला किंवा पदार्थ बनवायला लावायला हरकत नाही. तसेच काही वेळा खूप जणांचा घरीच पदार्थ बनवावे असा आग्रह असतो. पण नसेल एखादीला वेळ किंवा बनवण्यात इंटरेस्ट तर विकत पदार्थ घेतले तरी काय हरकत आहे.

सामाजिक आर्थिक व्यवस्थेचाच तो एक भाग आहे. कुणी ते बनवण्याचा उद्योग करत असेल तर त्यालाही चार पैसे मिळायलाच हवेत ना ? आणि प्रत्येकाची काही पदार्थ बनवण्याची खासियत पण असते. एकीच्या हाताची चव दुसरीच्या पदार्थाला नाही येत. शिवाय पाककला ही देखील एक कला आहे. त्यात जीव ओतून केल्याशिवाय तो पदार्थ छान नाही होणार. शिवाय मोजमाप पण आहेच. आणि तरी सुध्दा तेच आणि तेवढेच बेसन तूप साखर वेलची दिलीत. आणि रेसिपी लिहून दिली तरी लाडू सगळ्या जणांचे वेगळ्या चविचेच होणार. आहे की नाही गंमत…

कठीण वाटणारा पदार्थ एकदा त्याची मेख कळली तर एकदम सोपा वाटायला लागतो. पण मी खूप जणींचे बघितले की रेसिपी सांगताना हातचे राखून सांगतात… मैत्रीणींनो रागावू नका खरे लिहील्या बद्दल… आणि मग पदार्थ तसा होत नाही…

पुर्वी दिवाळी… म्हणजे फराळ फटाके आणि नवीन कपडे हे समीकरण ठरलेले होते. तसेच आपण कुठेतरी पाहुणे म्हणून जायचे किंवा आपल्या घरी तरी कुणी पाहुणे येणार हे ठरलेले असायचे. आणि मग खूप धम्माल. पण आता?

पुर्वी हे पदार्थ वर्षातून एकदाच बनायचे त्यामुळे त्याचे अप्रुप वाटायचे पण आता आपण बाराही महिने हे पदार्थ खातो त्यामुळे विशेष वाटत नाही. शिवाय सगळे जण डायटच्या नावाखाली हे पदार्थ खात पण नाही. आणि नवीन कपडे तर काय ऑनलाईन शाॅपिंग चालूच असते. प्रत्यक्ष भेटीला तर कुणाला वेळच नसतो. फोन किंवा मेसेज केला की झाले. ओवाळणी म्हणजे पैसे किंवा ऑनलाईन वस्तू पाठवायची. अर्थात हा बदलत्या काळाचा महिमा.. त्यामुळे दिवाळीचा मूळ उद्देश हरवला आहे.

खरे तर एकत्र येऊन आनंदात चार दिवस घालवण्यासाठी ही दिवाळी आहे. पण चार दिवस ? छे सुट्टी नाहीच. हो पण बाहेर फिरायला जायचे असेल तेव्हा मात्र सुट्टी मिळते हं…आहे की नाही गंमत.. एकूण काय तर दिवाळी हरवत चालली आहे.. क्वचित कुठेतरी खेड्यात एखाद्या घरात ती थांबली असेलही…मी मात्र वाट बघतेय तिची…भेटली तर सांगा तिला…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Neettu Talks : कोरोनानंतर केस गळण्याची समस्या ?

इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचे पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading