आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींचे माणसाला आकर्षण असतेच. पण प्रेमाचे तसे नसते. ते कुणावर कशासाठी बसेल हे जरी सांगता येत नसले तरी सुध्दा डोळे झाकून त्याकडे बघणे कधीतरी धोक्याचे ठरते.
सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
प्रेमाची ही अडिच अक्षरे..प्रेम या शब्दाची जादू युगानुयुगे मनावर गारूड करून आहे आणि राहील. हे प्रेम युगानुयुगे अवघे जीवन व्यापून टाकते. प्रेमाचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या परीने लावत असतो. प्रेमाचा परीसस्पर्श आयुष्याचे सोने करतो. पण.. ते योग्य ठिकाणी जडले तरच… अन्यथा जर प्रेम आणि वासना किंवा आकर्षण यातला फरक जर कळला नाही तर तेच आयुष्याची माती करते.
आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींचे माणसाला आकर्षण असतेच. पण प्रेमाचे तसे नसते. ते कुणावर कशासाठी बसेल हे जरी सांगता येत नसले तरी सुध्दा डोळे झाकून त्याकडे बघणे कधीतरी धोक्याचे ठरते. हल्ली चेहरा आणि मुखवटा असे जग झाले आहे. प्रत्येकाला प्रेम हे कधी ना कधी होतेच. पण कुणाचे व्यक्त होते तर कुणाचे अव्यक्त राहते. कुणाला प्रतिसाद मिळतो तर कुणाला नाही. प्रेमाची कुठली परिभाषा नाही करता येत. आणि शब्दात पण नाही बांधता येत. कर म्हणून सांगता येत नाही तर नको करू म्हणून थांबता येत नाही.
आयुष्यात कुणाचे प्रेम नसेल तर ते आयुष्य म्हणजे श्वासांचा नुसता प्रवास असेल. सद्या व्हॅलेंटाइन डे चे वारे वाहताहेत. आधीच रोझ डे, चाॅकलेट डे, टेडी डे, प्राॅमिस डे वगैरे सुरू आहेत. प्रेमिकांसाठी हा व्यक्त होण्याचा काळ. एकमेकांना खुश करण्यासाठी लागलेली शर्यत जणू. आजकाल तरूणाईचे आयुष्य खूप ताणतणावाचे तसेच कामाचे ठराविक तास न राहता सतत आॅनलाईन रहावे लागते. त्यामुळे आपल्या प्रेमाच्या माणसांना वेळ देणे शक्य होत नाही म्हणून मग हे डेज साजरे करणे ठीक आहे… त्यात वाईट काहीच नाही.
कोण तो संत व्हॅलेंटाइन आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करतो… आपल्या देशात तर प्रेमाचे महत्त्व सांगणारे कितीतरी संत होऊन गेले आहेत. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरुजी कुणाला आठवतात का ? शिवाय भगवतगीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण यांनी तर प्रेमयोग स्वतः जगून दाखवला आहे. शिवाय राधा कृष्ण यांच्या अमर प्रेमाचे आपण नेहमीच दाखले देत असतो. त्याचा सांभाळ करणारे नंद यशोदा तसेच मित्र सुदामा सखी भगिनी द्रौपदी आणि शिष्य अर्जुन या सगळ्या नात्यांमधे त्याने प्रेम म्हणजे काय हे दाखवून दिले आहे.
आपल्या देशात प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक सण उत्सव आहेत. अगदी प्रत्येक नात्यासाठी असे दिवस आहेत. पण आपल्याला नेहमीच बाहेरून आलेल्या गोष्टींचे आकर्षण का वाटते ? आणि हो असे एक दिवस प्रेम करून काय साधणार ? माणसाला जसे पोटाला रोज अन्न लागते तसेच मनाचे आहे. तेव्हा त्या प्रेमाला शब्दांचा स्पर्शाचा तसेच काळजीने वागण्याचा प्रयत्न हा नेहमीच करावा लागतो.
प्रेम हे क्षणात बसणारे अन् क्षणात उडणारे फुलपाखरू नाही. तर ती एक चिरंतन आणि निरंतर असणारी प्रक्रिया आहे. ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीला गुणदोषांसकट स्विकारावे लागते. कारण संपूर्ण गुणांनी युक्त आपण स्वतः तरी कुठे असतो? आज आपण स्वतःवर प्रेम करण्याच्या नादात इतरांवर प्रेम करणे विसरू लागलोय. प्रेमाचे मोजमाप कमी अधिक किंमतीचे गिफ्ट बघून केल्या जाते. हे बघून असे वाटते की खरे प्रेम यांना अजून कळलेच नाही.
प्रेम ही एक अनुभूती आहे ज्याची त्याने अनुभवायची. गुलजारजींनी अगदी अचूक शब्दात ती पकडली आहे…सिर्फ अहसास है ये रुह से महसुस करो.. प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो…असे प्रेम मिळाले तर घट्ट पकडून ठेवा… कुणावर तरी असेच आहे तसे स्विकारून प्रेम करून तर बघा. मग रोजचाच दिवस हा व्हॅलेंटाइन डे वाटेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.