मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा…
परसबागेत बेडकांचे संवर्धन करतोय म्हणून चेष्टेचा विषय झालेला मंगेश आज बेडकांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचा संवर्धक म्हणून ओळखू जाऊ लागला आहे. डॉ. वरद गिरी यांच्यासारखे नावाजलेले निसर्गतज्ज्ञ मंगेशच्या परसबागेत बेडकांच्या नोंदी घेण्यासाठी येतात, हे पर्यावरण आणि बेडकांच्या संवर्धनाच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल ठरले आहे…
अमित गद्रे
मंगेशच्या बागेतील बेडकांचे संवर्धन पाहा या व्हिडिओतून..
ही गोष्ट आहे होडावडे (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ) या गावात कुक्कुटपालन, शेळीपालनात रमलेल्या मंगेश सुहास माणगांवकर या कृषी पदावीधराची. पावसाळ्यात शेती, डबक्यामध्ये दिसणारा बेडूक हा खरा शेतकऱ्यांचा मित्र. परंतू भात शेतीत रासायनिक खते आणि कीडनाशकांचा अनियंत्रित वापर, तसेच काही कारणांमुळे बेडकांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. परंतू गेल्या १५ वर्षांपासून दुर्लक्षित अशा बेडकांच्या संवर्धनात मंगेश रमला आहे. होडावडे येथील मंगेशच्या घरापाठीमागील परसबागेतील डबक्यात बेडकांच्या आठ प्रजाती नांदताहेत. काही लुप्त होणाऱ्या प्रजाती देखील त्याच्या परसबागेत दिसतात. नैसर्गिक पद्धतीनेच अधिवास केलेला असल्याने बेडकांची संख्या देखील वाढताना दिसते.
नैसर्गिक अधिवासात बेडकांचे संवर्धन…
बेडकांच्या संवर्धनाबाबत मंगेश म्हणाला की, माझ्या वडिलांना आणि मला पहिल्यापासून निसर्गाची आवड. त्यामुळे मी १९९७ मध्ये दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयातून बीएस.सी. वनशास्त्र पदवी घेऊन मी होडावडे गावी परतलो. गाव परिसरात पहिले काही वर्षे कृषी सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर आता कुक्कुटपालन, शेळीपालन आणि गांडूळ खत निर्मिती उद्योगामध्ये मी रमलो आहे. पण हे करत असताना मी घराच्या परिसरात पक्षांच्या निवाऱ्यासाठी घरटी बांधली. विविध फुलझाडे लावली. त्याचबरोबरीने घराच्या परसबागेतील नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या चार डबक्यात २००६ पासून बेडकांच्या चार प्रजातींचे संवर्धन करत आहे. भात शेतीमध्ये कीड नियंत्रणात महत्वपुर्ण सहभाग असलेला बेडूक रासायनिक खते, कीडनाशकांच्या अनियंत्रीत वापरामुळे दुर्मिळ झाला आहे. निसर्गसाखळीत महत्वपूर्ण दुवा असणाऱ्या बेडकांचे संवर्धन करणे ही कृषी पदवीधर म्हणून माझी जबाबदारी समजतो.
कोकणात जरी असलो तरी आमच्याकडे मार्चनंतर पाणी टंचाई असते.परंतू परसबागेतील चार डबक्यात मी वर्षभर पाणी साठवत असल्याने गेल्या दहा वर्षात बेडकांच्या चार प्रजाती स्थीरस्थावर झाल्या आहेत. त्यांना खाद्य म्हणून कोंबडी खाद्य, माशांचे तुकडे डबक्यात टाकतो. हे बेडूक मुक्तपणे परसबागेत फिरून त्याचे खाद्य शोधतात. परिसरात बेडूक असणे हे त्या भागात रसायन विरहित चांगली नैसर्गिक परिसंस्था असल्याची खूण आहे. दरवर्षी एखादी नवी प्रजात देखील या डबक्यात दिसते. डॉ. वरद गिरी, काका भिसे, डॉ. योगेश कोळी या तज्ज्ञांच्या मदतीने मी बेडकांच्या नोंदी ठेवत असतो. दरवर्षी पावसाळ्यात माझ्या परसबागेत बेडकांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ मंडळी येत असतात.
मंगेश माणगांवकर
शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी बेडकांचे संवर्धन शेतकऱ्यांनी केले पाहिजेत.या संवर्धनातून नष्ट होत चाललेल्या प्रजाती वाचविणे हे आपले काम आहे. त्यामुळे बेडकांच्या प्रजननाचे अधिवास नष्ट न करता नैसर्गिकरित्या त्यांचे संवर्धन करण्याचा विडा मंगेशने उचलला आहे,या प्रयत्नांना प्राणी प्रेमी तसेच वन्य अभ्यासकांची साथ मिळू लागली आहे.
परसबागेत बेडगाच्या या प्रजातींचे संवर्धन’ ः
मंगेशच्या परसबागेत दरवर्षी इंडियन बूल फ्रॉग,फंगाईड फ्रॉग, नॅरो माऊथ फ्रॉग,मलबार ग्रायडिंग फ्रॉग, स्कीटरिंग फ्रॉग, बलून फ्रॉग,कॉमन ट्री फ्रॉग, कॉमन टोड या बेडकाच्या प्रजाती दिसतात.
गेल्या सहा वर्षांपासून मंगेशच्या परसबागेतील डबक्यात पश्चिम घाटात प्रदेशनिष्ट असलेली ‘मलबार ग्रायडिंग फ्रॉग’ ही प्रजाती दिसून आली.हा बेडूक डबक्याच्या वर असणाऱ्या झाडांच्या पानाचे घरटे (फोमनेस्ट) करून त्यात अंडी घालतो. काही दिवसांनी अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले पानावरून डबक्यात उडी मारतात. या बेडकांच्या संवर्धनासाठी मंगेशने डबक्याच्या शेजारी जास्वंद, समई, चिकूची झाडे लावली आहेत. आता बेडकाची ही प्रजाती या झाडांवर फोमनेस्ट बनविते. त्यामुळे दरवर्षी यांची संख्या वाढत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.