वेसा ची प्रयोगभूमीस भेट
फिनलँडमधील ‘एझ्दा’ या पर्यावरण विषयात काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी वेसा पेक्का यांनी ६ व ७ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रमिक सहयोगला भेट दिली. या दोन दिवसाच्या वास्तव्यात त्यांनी येथील शैक्षणिक, पर्यावरण विषयक आणि स्त्रियांसोबतचे काम समजून घेतले. दोन दिवस प्रयोगभूमीत आमच्या सोबत राहिले. कादवड येथील शिक्षण केंद्राला आणि एका महिला स्वयंसहाय्यता गटाला भेटी देखील दिल्या.
दोन दिवस आम्ही सतत बोलत होतो. फिनलँड मधील शैक्षणिक आणि राजकीय स्थितीची माहिती घेतली. हा शैक्षणिकदृष्ट्या आणि एकूणच समृद्ध देश आहे. केजी ते पीजी संपूर्ण शिक्षण मोफत व शासकीय आहे. शासकीय शाळा उत्तम दर्जाच्या आहेत. प्रयोगभूमीतील शैक्षणिक वातावरण अनुभवल्यावर मात्र वेसाची प्रतिक्रिया लक्षणीय होती…. ‘आमच्याकडे मुले विविध विषय खोलात जाऊन शिकतात, पण इथली मुले ते जगतात. प्रयोगभूमीतील मुले फॉरेस्ट स्मार्ट आहेत. तुम्ही मुलातील युनिकनेस कायम ठेवण्याची काळजी घेता हे विशेष आहे’.
‘अर्थात फॉरेस्ट स्मार्ट आणि स्ट्रीट स्मार्ट यातील समतोल साधणे हे प्रयोगभूमीसाठी आव्हान आहे’ असे उत्तर आम्ही त्याला दिले. आणि ते खरेच आहे. एक धरले तर दुसरे सुटते अशी ही कसरत आहे. म्हणूनच ही प्रयोगभूमी आहे.
असो, वेसाने दोन दिवस आमच्यासोबत धमाल केली. त्याने आमच्या आणि आम्ही त्याच्या अनुभवांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही देवाणघेवाण आम्हाला समृद्ध करणारी ठरली. या भेटीचे आयोजन डॉ. लता प्रतिभा मधुकर यांनी केले होते. यावेळी मल्हार इंदुलकर, राम साळवी, प्राचार्य डॉ. कुंभार, अरुण काकडे, प्रतिक पुरी तसेच शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.