April 23, 2024
If the evil in the minds of the wicked is eliminated
Home » दुष्टांच्या मनातील दुष्टपणा घालवला तर…
विश्वाचे आर्त

दुष्टांच्या मनातील दुष्टपणा घालवला तर…

प्रत्येक गोष्ट ही कायद्याने सुटतेच, असे नाही. काही गोष्टी तडजोडीने सोडविल्या जाऊ शकतात. चुकीला शासन हे व्हायलाच हवे, पण त्यांच्याकडून चूक का झाली, याचाही विचार व्हायला हवा. पुन्हा अशा चुका होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।
जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ।। ३५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – हे प्रियोत्तमा अर्जुना, दातओठ न चावता स्वभावतःच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते, त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते, असे समज.

दुष्टाला शासन हे व्हायलाच हवे. नाहीतर जगात शांतीच नांदणे कठीण होऊन बसेल. दुष्ट कृत्य करणाऱ्यावर वचक हा असायला हवा, पण दुष्टांच्या मनातील दुष्टपणाच काढून टाकता आला तर ! माणसांची मने बदलता आली पाहिजेत. कायद्याचा वचक हा हवाच, पण दुष्टांना सुधारण्याची संधी देऊन क्षमाही करायला हवे. अनेक लोक लोभाने, लालसेने भरकटतात. वाट चुकतात. मनावर नियंत्रण न राहिल्यानेही चुका होतात. चुकीचे मार्ग पकडले जातात, पण त्यांच्या चुकांना सुधारण्याची संधी द्यायला हवी.

प्रत्येक गोष्ट ही कायद्याने सुटतेच, असे नाही. काही गोष्टी तडजोडीने सोडविल्या जाऊ शकतात. चुकीला शासन हे व्हायलाच हवे, पण त्यांच्याकडून चूक का झाली, याचाही विचार व्हायला हवा. पुन्हा अशा चुका होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कारण या चुका इतरांकडूनही होऊ शकतात. यासाठी दुसऱ्यांकडून ही चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. असे प्रयत्न झाले तर, निश्चितच समाजात सुख-शांती नांदेल. नुसते कायदे कडक करून
किंवा त्यांच्या कडक अंमलबजावणीने सुख-शांती नांदते, असे नाही.

एखाद्याने जर स्वतःवर हल्ला केला तर त्याच्यावर प्रती हल्ला करून प्रश्न सुटत नाही. तो हल्ला त्याने का केला, याचा विचार व्हायला हवा. समाजातील आर्थिक असमानतेमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. नुसते कायदे करून हे प्रकार कमी होणार नाहीत. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा. ही आर्थिक असमानता कशामुळे निर्माण होते, यावर विचार व्हायला हवा.

सर्वांना समान अधिकार कसे देता येतील, हे पहायला हवे. प्रकाशाचे वाटप करताना सूर्य याला कमी, त्याला जास्त असा भेदभाव करत नाही. परिस्थितीनुसार प्रत्येकाला असा भेदभाव झाल्याचे वाटते. सद्गुरूही प्रत्येक भक्तावर असेच ज्ञानाचा अखंड वर्षाव करत असतात, पण भक्ताला त्याच्या स्थितीनुसार भेदभाव वाटतो. सद्गुरू सर्वांना समान लेखतात. दुष्टांनाही ते क्षमा करतात. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा कसा काढता येईल, यासाठी ते प्रयत्न करतात. सुधारला तर तोही आत्मज्ञानी होऊ शकतो.

Related posts

मौनातून आत्मज्ञान विकास

दानापूर येथे रविवारी मराठी बोली साहित्य संमेलन

नियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा

Leave a Comment